शाक्यकुल : प्राचीन कोसल देशातील एक राजवंश. त्याविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. पुराणांत इक्ष्वाकुवंशात शाक्य, शुद्धोदन, सिद्धार्थ, राहुल आणि प्रसेनजित अशी वंशावळ दिलेली असून त्यांची राजधानी अयोध्या, साकेत किंवा श्रावस्ती होती, असे म्हटले आहे. शुद्धोदननंतर त्याचा पुत्र सिद्धार्थ (गौतम बुद्ध) आणि त्याचा पुत्र राहुल ही वंशावळ बौद्ध साहित्यावरून समर्थित होते परंतु राहुलनंतर पुराणांत निर्दिष्ट केलेला प्रसेनजित हा सिद्धार्थाचा समकालीन होता आणि त्याची राजधानी कपिलवस्तू (विद्यमान तिलौरकोट) होती, हे बौद्ध वाङ्‌मयावरून स्पष्ट दिसते. प्रसेनजित आपण गौतम बुद्धाच्या देशातील आहोत, याचा अभिमान बाळगीत असे.

शाक्यांच्या राज्याच्या सीमा उत्तरेस हिमालय, पूर्वेस रोहिणी नदी आणि पश्चिम-दक्षिणेस राप्ती नदी अशा होत्या. त्यात कपिलवस्तूशिवाय आणखी नऊ नगरे असल्याचा उल्लेख बौद्ध साहित्यात आढळतो. शाक्यांच्या कुलांची संख्या ऐंशी हजार असून हे गणराज्य होते. कोसल देशाजवळ इतरही काही गणराज्ये होती. गौतम बुद्ध याच शाक्यकुलात जन्मला. शाक्य लोक धार्मिक, अहिंसावादी व आतिथ्यशील होते, असे चिनी प्रवासी ह्यूएनत्संग म्हणतो.

पहा : इक्ष्वाकु कपिलवस्तु कोसल बुद्ध.

संदर्भ : Majumdar, R. C. Pusalkar, A. D. Ed. The History and Culture of the Indian People, Vol 1,  The Vedic Age,

             London, 1990.

मिराशी, वा. वि.