ओम् (ॐ) :  हा अत्यंत पवित्र मंत्र आहे हे एकाक्षर ब्रह्म म्हणून निर्दिष्ट केले आहे. याचा ब्रह्म असा अर्थ उपनिषदांत व भगवद्‍‌गीतेत सांगितला आहे. ब्रह्म म्हणजे परमात्मा, परमेश्वर. पातंजलयोगसूत्रातही ओंकाराचा ईश्वर असा अर्थ सांगितला आहे. ओंकाराची प्रणव ही संज्ञा मुंडकोपनिषदात (२.२.४) आली आहे. या शब्दाचे ॐ असे लेखन करण्याची प्रथा आहे. वेदपठण, दान, तप इ. पवित्र धार्मिक कर्मांच्या प्रारंभी ओंकाराचा उच्चार करावयाचा असतो, असे उपनिषदांत व गीतेत संगितले आहे.मनुष्याला प्रणवाचा उच्चार करीत मरण आले, तर तो परमेश्वररूप होतो, असेही गीता  सांगते. ओंकार हे वेदांचे सार व आदिवेद होय, असे वेदांत, गीतेत व पुराणांत म्हटले आहे. ओंकाराचा जप हा ब्रह्मज्ञानाचे वा ईश्वरप्राप्तीचे साधन म्हणून कठ, मुंडक, प्रश्न इ. उपनिषदांत व गीतेत सांगितले आहे. मांडूक्योपनिषदातील ब्रह्मविद्या ही ओंकाराच्या विवेचनावरच आधारलेली आहे. मांडूक्योपनिषदातील विवेचनाचे सार असे : ओंकार हे अक्षरच परब्रह्म होय हा अंतरात्माच ब्रह्म होय.याचे चार पाद म्हणजे भाग : विश्व, तैजस, प्राज्ञ व चतुर्थ अद्वैत शिव. चतुर्थ म्हणजे तुरीय, चवथा. अंतरात्म्याच्या तीन अवस्थांना विश्व, तैजस, व प्राज्ञ अशा संज्ञा आहेत. अंतरात्माचे शुद्ध निरुपाधिक स्वरूप म्हणजे चतुर्थ किंवा तुरीय होय. ॐ हा ‘अ’, ‘उ’ व ‘म्’ या तीन वर्णांचा म्हणजे मात्रांचा बनला आहे जीवात्म्याचे जागृतीतील स्वरूप ‘विश्व’ म्हणजे ‘अ ’ ही मात्रा, स्वप्‍नातील स्वरूप ‘तैजस ’ म्हणजे ‘उ’ ही मात्रा व सुषुप्तीतील म्हणजे गाढ निद्रेतील स्वरूप ‘प्राज्ञ ’ म्हणजे ‘म् ’ ही मात्रा. जागृती, स्वप्‍न व सुषुप्ती या उपाधींशी अलिप्त असे आत्मस्वरूप चतुर्थ होय तोच अद्वैत परमात्मा होय मात्रारहित अखंड ओंकार तोच होय हे समजले म्हणजे जीवात्मा ब्रह्मरूप बनतो.

पुराणांत म्हटले आहे, की ‘अ’ म्हणजे विष्णू ,  ‘उ’  म्हणजे शिव व  ‘म्’ म्हणजे ब्रह्मा अखंड ओम्‌ने विष्णू , शिव व ब्रह्मा यांचे अद्वैत बोधित होते.

ओंकार ह्या मंत्राचे महत्त्व बौद्ध व जैनही तितकेच मानतात. ‘ओम् मणिपद्मे हुम्’ हा तिबेटी बौद्ध धर्माचा मुख्य मंत्र आहे आणि  ‘ओम् नमः सिद्धम्’ हा जैनांचा मंत्र आहे.

ओम् शब्द ‘अव्’ (पालन करणे ) या धातूपासून सिद्ध होतो, असे काहींचे म्हणणे आहे. परंतु संस्कृत भाषेत वेदकालपासून आतापर्यंत याचा होकारार्थी प्रयोग होत आला आहे. ‘होय’, ‘ठीक’, ‘मान्य ’, ‘आहे ’, ‘अनुमती आहे’ असा त्याचा अर्थ तैत्तिरीय उपनिषदात सांगितला आहे. मालतीमाधव  नाटकातही याचा हाकारार्थी  प्रयोग आला आहे. याच अर्थी ओम्‌शी सद्दश ‘आम् ’ असा प्रयोग संस्कृत भाषेत रूढ आहे. ॐ चा उच्चार मांगलिक म्हणजे मंगलकारक असतो, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे.

जोशी, लक्ष्मणशास्त्री