नियतविकास : एखाद्या प्राण्याच्या शरीरातील एखाद्या अवयवात प्रत्येक पिढीत एकाच धर्तीवर बदल होऊन तो अवयव मोठ्या प्रमाणात बदलतो. हा बदल फार झपाट्याने होऊन कित्येक वेळा मूळ अवयवापेक्षा हा बदललेला अवयव फारच वेगळा भासतो. केव्हा केव्हा हा बदल फार तीव्र स्वरूपाचा होऊन तो त्या प्राण्याच्या नाशाला कारणीभूत होतो. अशा प्रकारच्या एकाच धर्तीवर होणाऱ्या बदलास नियतविकास असे म्हणतात.

नियतविकास (ऑर्थोजेनेसीस) हा शब्दप्रयोग प्रथम डब्ल्यू. हॅके या शास्त्रज्ञांनी १८९३ साली उपयोगात आणला. नंतर थिओडोर आयमर यांनी १८९७ साली एका विशिष्ट जातीच्या फुलपाखरांच्या पंखांवरील नक्षीत होणाऱ्या बदलास हा शब्दप्रयोग वापरला. आयमर यांना सरड्यांच्या अंगावर आढळणारे उभे, आडवे व वेडेवाकडे लांबट रंगीत पट्टे आणि ठिपके, तसेच बाह्य रंग यांच्यात सुद्धा प्रत्येक पिढीत विविध बदल झाल्याचे आढळून आले. अशा अनेक उदाहरणांमुळे १८९७ सालानंतर नियतविकास हा शब्दप्रयोग रूढ झाला. एच्. एफ्. ऑस्‌बर्न, डब्ल्यू. के. ग्रेगरी वगैरे जीवाश्मविज्ञांनी (शिळारूप अवशेषांचे अध्ययन करणाऱ्या तज्ञांनी) पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या जीवाश्मविज्ञानातील कित्येक उदाहरणे नियतविकासाचे विवेचन करताना दिली आहेत (उदा., उंट, घोडा, हत्ती वगैरे प्राणी). प्राचीन काळी आढळणाऱ्या सॉरोपॉड, डायनोसॉर यांसारख्या प्राण्यांच्या शरीराच्या आकारमानात मध्यजीव महाकल्पाच्या (सु. २३–९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) पहिल्या भागात झपाट्याने वाढ होत गेली. हे प्राणी मूलत: जमिनीवर राहणारे होते परंतु झपाट्याने वाढणाऱ्या शरीरामुळे त्यांना चपळपणे हालचाल करणे कठीण होऊ लागले. त्यामुळे मध्यजीव महाकल्पाच्या दुसऱ्या भागात ते प्राणी मोठमोठ्या सरोवरांतील पाण्यात राहू लागले परंतु यामुळे त्यांच्या शरीराची हालचाल थोडी व मंदगतीने कोणत्याही तऱ्हेचा बाह्य अडथळा न होता होऊ लागली. तसेच जमिनीवरील इतर शत्रूंपासून त्यांना नैसर्गिक संरक्षण मिळाले परंतु त्याचबरोबर हे अजस्र प्राणी जमिनीवरील स्वैर संचाराला मुकले.

नियतविकासामुळे कित्येक वेळा प्राण्यांच्या शरीरात होणारे बदल फार मोठे असतात व यामुळे प्राण्यांच्या हालचाली मर्यादित होतात. वर दिलेले डायनोसॉरचे उदाहरण हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. अशाच प्रकारची इतर उदाहरणे म्हणजे हत्तीचे दात, सांबरांची शिंगे, रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या बोटांच्या संख्येतील घट वगैरे होत.

व्ही. एल्. केलॉग व त्यांच्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील स्टॅनफर्ड भागात आढळणाऱ्या डायाब्रोटिका सॉरॉस या मुग्यांच्या पंखावरील ठिपके व नक्षी यांचे संशोधन केले. त्यांना असे आढळून आले की, १० वर्षांच्या कालावधीत या कीटकांच्या पंखावरील नक्षीत बरेच बदल घडून आले. हे बदल नैसर्गिक निवडीमुळे (ज्या नैसर्गिक प्रक्रियेने योग्यतम किंवा बलिष्ठ प्राणी टिकाव धरतो आणि परिस्थितीशी ज्याचे योग्य प्रकारे अनुकूलन झालेले नसेल तो नाश पावतो त्या प्रक्रियेमुळे) झाले असण्याची शक्यता नसावी कारण बदललेल्या नक्षीचा या कीटकांना काहीच फायदा होत नव्हता. केलॉग यांच्या मते हा बदल नियतविकासाचे उदाहरण होय.

नियतविकासासंबंधी योग्य असे विवेचन करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. काही शास्त्रज्ञ नियतविकास हा त्या प्राणिवंशाच्या उपयुक्ततेसाठी होत असावा असे मानतात. आनुवंशिकीविज्ञांच्या मते शरीरात होणारे छोटे परिवर्तन किंवा बदल त्या प्राणिवंशास उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे परंतु शरीरात होणाऱ्या उपयुक्त बदलाबरोबरच एखाद्या अवयवात दुरुपयोगी बदल होण्याची शक्यता असते (उदा., शिंगांच्या विस्तृत वाढीमुळे सांबाराला चपळपणे हालचाल करता येत नाही).

नियतविकासाबद्दल अद्याप सविस्तर माहिती उपलब्ध झाली नसली, तरी अशा विकासामुळे एखाद्या अवयवाची होणारी वाढ सर्व शरीराच्या वाढीच्या ठराविक प्रमाणात होत असते, असे आढळून आले आहे.

ऑस्‌बर्न यांच्यासारखे शास्त्रज्ञ नैसर्गिक निवड व नियतविकास यांची सांगड घालतात परंतु कित्येक शास्त्रीय विवेचनांत त्यांनी ह्या दोन्हीमधील फरक विशद करून त्यांचे जीवसृष्टीवर स्वतंत्रपणे विविध परिणाम होतात, असे दाखवून दिले आहे. आपणास असे म्हणता येईल की, नियतविकास हे केवळ निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीररचनेत घडलेल्या बदलाचे वर्णन असून हा बदल कसा घडून आला, याबद्दल काहीही उलघडा होऊ शकत नाही.

पहा : नैसर्गिक निवड.

संदर्भ : 1. Gregory, K. G. Evolution Emerging, 2 Vols., New York, 1957.

2. Lull, R. S. Organic Evolution, New York, 1961.

रानडे, द. र.