ओपिटूस फोन बोबरफेल्ट, मार्टीन : (२३ डिसेंबर १५९७—२० ऑगस्ट १६३९). जर्मन कवी आणि समीक्षक. जन्म सायलिशियातील बुंट्सलाऊ येथे. शिक्षण ओडरकाठचे फ्रँकफर्ट आणि हायड्लबर्ग येथे. ट्रान्सिल्व्हेनियात काही काळ प्राध्यापक. त्यानंतर जर्मनीतील काही संस्थानांत राजाश्रयाने राहिला. दुसऱ्या फर्डिनँडने त्याला प्रथम राजकवी (१६२५) आणि त्यानंतर काही वर्षांनी उमराव केले. ‘Fruchtbringende Gesellschaft’ या जर्मनीतील भाषाविषयक ख्यातनाम अकादमीचा तो सदस्य होता. Teutsche Poemata (१६२४), Geistlichs Poemata (१६३८) आणि Weltliche Poemata (१६४४) हे त्याचे काव्यग्रंथ. कवी म्हणून तो फारसा महत्त्वाचा नाही. तथापि त्याच्या Buch Von der Deutschen Poeterey (१६२४, इं. शी. बुक ऑन जर्मन पोएट्री) ह्या ग्रंथातून त्याने जर्मन कवितेसंबंधी मांडलेले विचार हे त्याचे सर्वांत महत्त्वाचे वाङ्मयीन कार्य होये. जर्मन भाषेचे शुद्धीकरण आणि जर्मन साहित्याचे परिवर्तन घडवून आणण्यात त्याने पुढाकार घेतला. सेनीका आणि सॉफोक्लीझ यांच्या शोकात्मिकांचे अनुवाद करून अभिजात शोकात्मिकेचा आदर्श त्याने जर्मन साहित्यापुढे ठेवला. संगीतिका हा साहित्य प्रकार जर्मन साहित्यात त्यानेच आणला तसेच जर्मन कवितेत नवे छंद आणले. फ्रेंचमधील ‘अलेक्झांड्रिन’ ह्या वृत्ताचा त्याने विशेष पुरस्कार केला. कादंबरीचा आदर्श निर्माण करण्यासाठी जॉन बार्क्ले ह्या स्कॉटिश लेखकाच्या Argenis ह्या लॅटिन कादंबरीचा त्याने अनुवाद केला. सर फिलिप सिडनीच्या Arcadia चा अनुवाद करून जर्मन साहित्याला गोपकाव्याचा परिचय करून दिला. योहान गोट्शेटचे Critische Dichtkunst (१७३०) प्रसिद्ध होईपर्यंत त्याचा Buch Von der…. हा ग्रंथ आणि एकंदर वाङ्मयविचार प्रमाणभूत मानला जात होता. डॅन्झिग येथे तो प्लेगने मरण पावला.
कुलकर्णी, अ. र.