ओनेगा सरोवर : यूरोपातील दुसऱ्या क्रमांकाचे सरोवर. क्षेत्रफळ ९,८८० चौ. किमी. किनारा १,४०० किमी. खोली सु. १२० मी. २४० किमी. लांबीचे व ८० किमी. रुंदीचे हे सरोवर श्वेतसमुद्र व लॅडोगा सरोवर यांच्या दरम्यान असून त्याचा उत्तरभाग रशियाच्या कारेलिया राज्यात व दक्षिणभाग रशियाच्या व्होलग्डा विभागात आहे. याचा उत्तर किनारा बराच खडकाळ व दंतुर आहे. दक्षिण किनारा सखल व वालुकामय आहे. याला व्होडला, व्हिटिग्रा, आंदोमा, शुया, सुनाया नद्या मिळतात. स्वीर नदी याचे पाणी लॅडोगा सरोवरात वाहून नेते. ओनेगा नोव्हेंबर ते मे ह्या महिन्यांत गोठलेले असते. याच्या दक्षिण किनाऱ्याने जाणारा ७२ किमी. लांबीचा ओनेगा कालवा स्वीर व व्हिटिग्रा नद्यांस जोडतो. तो लेनिनग्राड-व्होल्गा-कॅस्पियन जोडणाऱ्या मारिईन्स्क कालवासंहतीचा भाग आहे. सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावरून मुरमान्स्क-लेनिनग्राड लोहमार्ग सुरू झाल्यापासून तेथील लोकसंख्या वाढू लागली आहे. सरोवराच्या आसमंतात मच्छीमारी, लाकडाचा व्यापार व खनिजांचे उत्पादन होते.
लिमये, दि. ह.