ऐजाल : ब्रह्मदेशाला लागून असलेल्या मिझोराम या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी. लोकसंख्या ३१,७४० (१९७१). लुशाई टेकड्यांनी व्यापलेला आसाम राज्यातील मिझो जिल्हा जानेवारी १९७२ मध्ये भारत सरकारने केंद्रशासित केला व जिल्ह्याचे ठाणे असलेले ऐजाल केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यालय बनले. हे आसाममधील सिलचर रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेस १९२ किमी. असले, तरी ऐजालला जाणारा रस्ता निबिड अरण्यातून आहे. ऐजालच्या सु. २० किमी. पश्चिमेकडून वाहणाऱ्या धालेश्वरी नदीमार्गे त्यामानाने वाहतूक सोपी आहे. समुद्रसपाटीपासून १,०६४ मी. उंचीवरील एका टेकडीवर ऐजाल वसले असून येथील हवा थंड व आल्हाददायक आहे. मिझो टोळीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे मध्यवर्ती ठिकाण असून टोळीवाल्यांच्या देवाण – घेवाणीचे हे मोठे केंद्र आहे. येथे आकाशवाणीचे केंद्र आहे.

शाह, र. रू.