एस्टोनिया : सोव्हिएट संघराज्यापैकी पश्चिमेकडील, बाल्टिक किनाऱ्यावरील एक राज्य. क्षेत्रफळ ४५,१०० चौ. किमी., लोकसंख्या १४,००,००० (१९७२). याच्या उत्तरेला फिनलंडचे आखात, पश्चिमेस बाल्टिक समुद्र, आग्‍नेयीस रीगा आखात, दक्षिणेस लॅटव्हिया राज्य आणि पूर्वेस पायपुस सरोवर व रशियाची मुख्य भूमी आहे. एस्टोनियाच्या पश्चिमेकडील सार्‍यिमा व हीउमा ही मोठी बेटे व सत्तर लहान बेटे एस्टोनियातच मोडतात. टाल्यिन ही राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन : प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने एस्टोनिया हे एक कमी उंचीचे पठार आहे. दक्षिणेकडे ते मुख्यत: डेव्होनियन काळातील रेतीखडक, कँब्रियन व सिल्यूरियन काळांतील चुनखडीच्या खडकांचे बनलेले आहे. या पठाराचा उत्तरेकडील बहुतेक भाग सपाट, रेतीयुक्त व दलदलीचा असला, तरी काही भाग कड्यासारखा असून तो समुद्रापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे येथे बरीच नैसर्गिक बंदरे झाली आहेत. बाल्टिक समुद्रातील अनेक बेटे ही याच पठाराच्या पश्चिमेकडील टोकाचे भाग आहेत. हिमनद्यांनी वाहून आणून टाकलेल्या कमीअधिक जाडीच्या गाळाने एस्टोनियाचा बहुतेक भाग व्यापलेला आहे. एस्टोनियाच्या दक्षिण भागात यांचा मोठा थर असून तेथील प्रदेशाची उंची ३००—५०० मी. पर्यंत गेलेली आहे. तथापि राज्याची सर्वसाधारण उंची समुद्रसपाटीपासून १०० मी.च्या आत आहे. नद्यांनी आणून टाकलेल्या गाळामुळे येथील जमिनीत जाड वाळूपासून ते भुसभुशीत मातीपर्यंत सर्व प्रकार आढळून येतात. परंतु वारंवार आढळून येणारे मोठे दगड हा सलग शेतीला येणारा एक मोठा अडथळा आहे. पार्नू ही १२५ किमी. लांबीची एकच मोठी नदी राज्यात असून ती रीगा आखातास मिळते. राज्यात अनेक द्रुतवाह असून त्यांवर जलविद्युत् निर्माण केली आहे. मध्यभागी वट्‌र्स-यार्व्ह सरोवर असून त्याचे पाणी येमयोगी नदी पायपुस सरोवरास नेते. पायपुसचे पाणी नार्वा नदी फिनलंडच्या आखातास नेते. नार्वा नदी रशिया व एस्टोनियाची हद्द असून ती ७७ किमी. लांब आहे. हिच्यावरील प्रपातावर मोठे विद्युत्-निर्मितिकेंद्र आहे. या प्रदेशाचे हवामान सौम्य खंडांतर्गत आहे. हिवाळ्यातील सरासरी तपमान – ५ से. ते – ८ से. तर उन्हाळ्यातील १५ ते १७ से. असते. सरासरी तपमानातील फरक पश्चिमेकडील किनारपट्टीवर कमी असून अंतर्गत भागात तो जास्त आढळून येतो. या फरकामुळे उत्तरेकडील किनारा वर्षातील १३० ते १४५ दिवस गोठलेला असतो, तर पश्चिमेकडील किनारा मात्र ५० ते ७५ दिवसच गोठलेला असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५६ – ७२ सेंमी. असून पाऊस प्रामुख्याने उन्हाळ्यात पडतो. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी २२ टक्के क्षेत्र रुंदपर्णी व सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलांनी व्यापलेले असून १५ टक्के प्रदेश दलदलीने व्यापलेला आहे.

इतिहास व राज्यव्यवस्था : नवव्या शतकात डेन व जर्मन लोकांनी एस्टोनिया जिंकून व्यापलेला होता. १३४६ मध्ये डेन्मार्कने त्याच्या ताब्यातील एस्टोनिया जर्मन लिव्होनियन सरदारांना विकला. त्यांच्याकडून तो स्वीडनकडे आला. १५५८ ते ८३ च्या दरम्यान झालेल्या युद्धात जरी पोलिश व रशियन सैन्यांनी एस्टोनियावर चढाई केली, तरी स्वीडनने एस्टोनियावरील आपला ताबा सोडला नाही. १७१० मध्ये पीटर द ग्रेटच्या सैन्याने टाल्यिन काबीज केले. १७२१ च्या न्यूस्टाड तहान्वये स्वीडनने एस्टोनिया रशियास दिला. स्वीडनच्या व रशियाच्या वर्चस्वाखाली एस्टोनिया असताना जर्मन उमरावांचाच वरचष्मा होता. १९१७ साली सरंजामशाही नष्ट झाली. १९१७ च्या क्रांतीनंतर जर्मन सरदारांचा कल प्रशियाबरोबर एक होण्याचा होता, तर के. पात्य व जे. पोस्का यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी स्वतंत्र होऊ पहात होते. १९१८ च्या जर्मन पाडावानंतर एस्टोनिया स्वतंत्र झाला. ३१ डिसेंबर १९१९ ला रशियाने स्वतंत्र एस्टोनियास मान्यता दिली. त्यानंतरच्या जमीन सुधारणेत निम्म्यापेक्षा जास्त सुपीक जमीन शेतकऱ्यांत विभागण्यात आली. १ डिसेंबर १९२४ चा कम्युनिस्ट उठाव तात्काळ मोडण्यात आला. १९३४ मध्ये मध्य यूरोपातील काही राष्ट्रांच्या धर्तीवर लोकसत्तेची जागा पोलादी सत्तेने घेतली. ऑगस्ट १९३९ च्या रशियन-नाझी गुप्त करारान्वये एस्टोनियात रशियन युद्धतळ पडले. जून-ऑगस्ट १९४० दरम्यान रशियाने दिलेल्या निर्वाणीच्या खलित्यास अनुसरून रशियास अनुकूल असे मंत्रिमंडळ अस्तित्त्वात आले व त्याने रशियाच्या संघराज्यात प्रवेश मिळविला. १९४१ ते १९४४ च्या दरम्यान जर्मनव्याप्त एस्टोनियात नाझींनी एस्टोनियातील जनतेचा छळ केला. सायबीरिया व उत्तर कझाकस्तानमध्ये मृत्युछावणीत हजारो लोक १९४० व १९४४ – ४९ या वर्षांत रशियाने पाठविले. अद्याप एस्टोनियाचे रशियातील सामिलीकरण अमेरिकेने मान्य केलेले नाही. १९७१ मधील निवडणुकीत एस्टोनियाच्या विधिमंडळावर १८३ सदस्य निवडून आले, त्यांपैकी ६१ स्त्रिया आहेत. रशियाच्या धर्तीवरच येथील शासनव्यवस्था आहे.

आर्थिक व सामाजिक स्थिती : रशियाची सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी ह्या प्रदेशात प्रामुख्याने शेती केली जात असे. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या अपरिमित हानीमुळे मात्र या भागातील अर्थव्यवस्थेची पुनर्रचना होऊन औद्योगिकीकरणावर भर देण्यात आला व आता एकंदर उत्पन्नापैकी ८० टक्के उत्पन्न उद्योगधंद्यांपासून मिळते. मुख्य उद्योगधंद्यांत खाणकाम असून, ईशान्येकडील ९० किमी. पट्ट्यातील उच्च प्रतीच्या शेल खडकांपासून तेल काढणे व गॅसनिर्मिती करणे हे महत्त्वाचे उद्योग आहेत. शेलतेलाखालोखाल येथे कापडधंदा महत्त्वाचा असून त्याशिवाय आगपेट्या, कागद, फर्निचर, यंत्रे, सिमेंट व धातुकाम हे येथील उद्योग होत. मच्छीमारीचा उद्योगही येथे महत्त्वाचा आहे. टाल्यिन हे महत्त्वाचे उद्योगकेंद्र असून तेथे जहाजे बांधणे, विद्युत् यंत्रसामग्री, कापड, कागद, फर्निचर, आटा, टेलिफोन व रेडिओ, दूधदुभत्यांची यंत्रसामग्री व शेतीची अवजारे होतात. राज्यात लहानमोठी २० बंदरे असली, तरी एकूण सागरीवाहतुकीपैकी ८०% टाल्यिनमधूनच होते. राज्यात १,१८० किमी. चे रेल्वेमार्ग असून २४,४०० किमी. च्या सडका आहेत. राज्यात १९७१ साली २१५ शेती समूह, २० मच्छीमारी-समूह व १६४ सरकारी समूह होते. शेतीवर २८,६०० ट्रॅक्टर वापरात होते. ८३% शेतीस वीज उपलब्ध होती. ओट, बार्ली, अंबाडी व शुगरबीट, बटाटे ही पिके येथे पिकविली जातात. अन्न उत्पादनापेक्षा गुरे पाळण्याच्या धंद्यास येथे जास्त महत्त्व आहे. १९७२ मध्ये येथे ७ लक्ष गुरे, १·७० लक्ष शेळ्यामेंढ्या, ७·२७ लक्ष डुकरे व ३·८ दशलक्ष कोंबड्या होत्या. एकूण लोकसंख्येपैकी ६८·२% एस्टोनियन, २४·७% रशियन व १·४% फिन होते. येथील शालेय अभ्यासक्रम ११ वर्षाचा असून १९७१ – ७२ मध्ये ७६६ प्राथमिक, माध्यमिक शाळांतून २,१२,००० विद्यार्थी शिकत होते. १६३२ साली तार्तू येथे स्थापन झालेले विद्यापीठ व इतर सहा उच्च शिक्षण-संस्था राज्यात असून १९४६ मध्ये शास्त्र अकादमी स्थापन झाली आहे. १९६८ मध्ये राज्यात ४३ वर्तमानपत्रे असून त्यांचा खप १०·२७ लक्ष होता. एस्टोनियन भाषेतील पहिले पुस्तक १५५३ मध्ये जर्मनीतील ल्यूबेक येथे छापले गेले. पूर्वीच्या काळातील लेखकांत धार्मिक ग्रंथाचे लेखक एच्. स्टॉल व शिक्षणतज्ञ वी. फॉर्सेलिनी यांचा समावेश होतो. एकोणिसाव्या शतकातील नाणावलेल्या लेखकांत साकालू  या एस्टोनियन भाषेतील वर्तमानपत्राचे संपादक सी. याकॉपसन तसेच प्रकाशक जे. यानसेन व त्यांची कन्या यांचा समावेश होतो. आधुनिक काळातील लेखकांत ए. जेकॉबसन, मारी उंडेर, ए. गेलिट यांचा समावेश होतो.

बाल्टिकवरील राज्य म्हणून एस्टोनियास महत्त्व आहे. राजधानीशिवाय तार्तू, पार्नू, नार्वा ही येथील इतर मुख्य शहरे होत.

वर्तक, स. ह.