इंटरलाकेन : स्वित्झर्लंडच्या बर्न कँटनमधील शहर, लोकसंख्या ४,७३५ (१९७०). हे आरे नदीवरील तून व ब्रीएंत्स या सरोवरांच्या दरम्यान, त्याच नदीकाठी, बर्नच्या आग्नेयीस ४२ किमी. आहे. येथून आल्प्सच्या युंगफ्राऊ शिखराचा सुंदर देखावा दिसतो. बर्नच्या परिसरातील हे सर्वांच मोठे विहारस्थल असून आल्प्समधील गिर्यारोहण व गिरिभ्रमण यांसाठी उन्हाळ्यात येथे हजारो प्रवासी येतात. मध्ययुगीन मठ व अठराव्या शतकातील किल्ला या इंटरलाकेनच्या ऐतिहासिक वास्तू आकर्षक आहेत. लोकरी कापड, मद्य, लाकूड-उद्योग, छपाई इ. व्यवसायांशिवाय येथे अनेक आरोग्यधामे व हॉटेले आहेत.

ओक, द. ह.