एशोल्ट्झिया कॅलिफोर्निका : (इं. कॅलिफोर्निया पॉपी कुल-पॅपॅव्हरेसी). शोभेकरिता बागेत लावली जाणारी एक खुजी पण काटक ओषधी [→ ओषधि] मूळची कॅलिफोर्नियातील (अमेरिका) असून ती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) परंतु वर्षायूप्रमाणे (एक वर्ष जगणाऱ्या वनस्पतीप्रमाणे) वाढविली जाते. उंची ३० — ४५ सेंमी., खोड बारीक पाने लांब देठाची, निळसर हिरवी, बरीच विभागलेली व गुळगुळीत फुले बहुधा एकेकटी, मोठी, ५—७ सेंमी. व्यासाची, विपुल व झाड लावल्यापासून सु. चार महिन्यांत येतात. ती बशीच्या आकाराची किंवा ⇨अफू व पिवळ्या धोतऱ्याच्या [→ धोत्रा, पिवळा] फुलांसारखी आणि संरचना साधारणत: तशीच [→ पॅपॅव्हरेसी] ती एकेरी, दुहेरी किंवा अर्धवट दुहेरी पाकळ्यांची, फिकट किंवा गडद पिवळी, लालसर, नारिंगी, गुलाबी इ. भिन्न रंगांची व काही झालरी सारख्या पाकळ्यांची असतात ती रात्री मिटतात व कोमेजल्यावर पाकळ्या गळून पडतात. बोंडे ७ — १० सेंमी. लांब, शेंगेसारखी लांबट व कटकयुक्त (शिखरयुक्त) बिया अनेक व लहान. बिया डोंगराळ भागात ऑगस्ट ते ऑक्टोबरात व सखल प्रदेशात सप्टेंबर ते ऑक्टोबरात पेरतात. हलकी व निचऱ्याची जमीन आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी, बागेत वाफ्यात किंवा वाफ्याच्या कडेने लावल्यास, झाडांची वाढ चांगली होऊन ती आकर्षक दिसतात. कुंड्यांत किंवा बागेतील खडकाळ जागेतही लावतात. कॅलिफोर्नियातील इंडियन लोक याची पाने कच्ची, शिजवून किंवा गरम दगडावर भाजून खात असत.
परांडेकर, शं. आ.
“