एल्ब: जर्मनीतील र्‍हाईनच्या खालोखाल महत्त्वाची व यूरोपातील एक प्रमुख नदी. हिचा उगम चेकोस्लोव्हाकियात कर्‌कॉनॉशे पर्वतात असून ती उत्तर समुद्रास मिळते. लांबी कुक्सहाफेनपर्यंत सु. १,१३० किमी. व हँबर्गपर्यंत सु. १,०३३ किमी. हँबर्गपासून सु. ८३ किमी. ब्रुन्सब्यूटेलकोख येथून कील कालवा सुरू होतो. एल्ब चेकोस्लोव्हाकियामधून लाबे या नावाने ३६३ किमी. व जर्मनीतून सु. ७६७ किमी. आलटून पालटून वायव्य व उत्तर दिशेने वाहते. चेकोस्लोव्हाकियात तिच्या काठी दूरक्रालोव्हे, ह्‌‍राडेट्सक्रालॉव्हे, कॉलीन, मेलनिक, उस्तिनादलाबेम व डेसिन ही शहरे असून जर्मनीत ड्रेझ्डेन, टॉर्गू, देसौ, मॅग्डेबर्ग व हँबर्ग ही शहरे आहेत. हिला ईगर, इल्मनाऊ, मुल्ड, साल, व्हल्टाव्हा, ब्‍लॅक एल्स्टर, एल्ड, हावेल व जिझेरा या उपनद्या मिळतात. ती वेझर व र्‍हाईन नद्यांशी मिट्‍ललँड कालव्यांनी, ओडरशी होहेनझॉलर्न मार्गे हावेलस्प्री जलमार्गाने, एल्ब ट्राव्हे कालव्याने बाल्टिकवरील ल्यूबेकशी व कील कालव्याने कीलशी जोडलेली आहे. हिच्या आसमंतातील प्रदेशात द्राक्षाचे मळे व फळबागा असून गहू, बीट, ओट, बटाटा ही उत्पन्ने होतात. दुभत्या गाई व मांसाकरिता डुकरांची पैदास होते. पाचव्या शतकापासून जर्मन लोकांचे वास्तव्य या नदीकाठी आहे. जुने किल्ले, राजवाडे व इतर कलाकृती हिच्याकाठी होत्या. १९४५ च्या बाँबवर्षावामुळे व आगीमुळे या नदीकाठच्या ७०० वर्षांच्या मानवी कलाकृतींचे नुकसान झाले.

कुमठेकर, ज. ब.