खस्वस्तिक : (शेखर शेखरबिंदू). पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणच्या निरीक्षकाच्या थेट माथ्यावरील खगोलाचा बिंदू म्हणजे खस्वस्तिक होय. खस्वस्तिक व ⇨ अध:स्वस्तिक हे दोन बिंदू म्हणजे क्षितिजाचे ध्रुवच होत. यामुळे क्षितिजावरील कोणताही बिंदू खस्वस्तिकापासून ९०० वर असतो. आकाशातील एखाद्या ताऱ्याचे स्थान दर्शविण्यासाठी त्याचे खस्वस्तिकापासूनचे कोनात्मक अंतर म्हणजे नतांश आणि क्षितिजपातळीत उत्तरेकडून पूर्वेकडे मोजलेले अंशात्मक अंतर म्हणजे ⇨ दिगंश सांगण्याचा प्रघात आहे. क्षितिजापासून वर मोजलेले ⇨ उन्नतांश व नतांश हे एकमेकांचे कोटिकोन असतात.
पहा : अध:स्वस्तिक ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति.
गोखले, मो. ना.