खवले : (शल्क). शरीराच्या पृष्ठभागावर किंवा पृष्ठभागाजवळ उत्पन्न होणाऱ्या लहान, कठीण, चकत्यांसारख्या कॅल्सीभूत (कॅल्शियममय झालेल्या) अथवा शृंगित (केराटीन नावाच्या प्रथिनाने युक्त असलेल्या) संरक्षक संरचनांना खवले अथवा शल्क हे नाव दिलेले आहे. ऊतक-रचना (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहाची रचना), आकार, परस्परसंबंध आणि सापेक्ष आकारमान या बाबतींत शल्कांमध्ये जरी फरक असले, तरी शरीराचे संरक्षण हे त्यांचे मूलभूत कार्य होय.
पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या प्रत्येक वर्गात जरी एखाद्या प्रकारचे शल्क आढळत असले, तरी विशेषेकरुन मासे आणि सरीसृप (सरपटणारे प्राणी) या दोन वर्गांतील प्राण्यांचे शल्क हे वैशिष्ट्य आहे. या दोन्ही वर्गांत ते अध्यावरणापासून (त्वचेपासून) उत्पन्न झालेले आहेत. पृष्ठवंशी प्राण्यांचे शल्क दोन प्रकारचे असतात. शरीराच्या बाह्य पृष्ठात उत्पन्न होणाऱ्या शृंगी बाह्यत्वचीय संरचनांना वरूथ म्हणतात आणि ऊतकांच्या आत असलेल्या त्वचीय अस्थिसदृश संरचनांना अस्थिशल्क म्हणतात.
अस्थिशल्क मुख्यत: जलीय पृष्ठवंशी प्राण्यांचे विशेष लक्षण आहे. अगदी सुरुवातीच्या जीवाश्मांत (जीवांच्या शिळारुप अवशेषांत) शरीरावर चर्मशल्कांचे (त्वचेच्या आतल्या स्तरापासून निघालेल्या शल्कांचे) ऐसपैस चिलखत आढळते. या शल्कांचा आतला थर घट्ट पटलित (पातळ तकटे असलेल्या) अस्थीचा असून
त्यावर छिद्रिष्ट (स्पंजासारखी छिद्रयुक्त रचना असलेल्या) अस्थीचा थर असतो याच्या बाह्य पृष्ठावर गुलिकांची (लहान वाटोळ्या उंचवट्यांची) एक श्रेणी असून त्या दंतिनासारख्या (दात ज्यापासून तयार होतात अशा कठीण कॅल्शियममय पदार्थासारख्या) एका पदार्थाच्या बनलेल्या असतात. या तऱ्हेच्या शल्कापासून अस्थिमत्स्यांमध्ये (ज्यांचा सांगाडा हाडांचा बनलेला आहे अशा माशांमध्ये) आढळणारे दोन प्रकारचे शल्क उत्पन्न होणे शक्य आहे. जीवाश्म क्रॉसॉप्टेरिजाय आणि फुप्फुसमीन (फुप्फुसासारखी श्वसनक्रियेत उपयोग होणारी हवायुक्त पिशवी असणारे मासे) यांत आढळणाऱ्या दशनाभ शल्कात (ज्याचा बाह्यस्तर कॉस्मिनाचा आणि आतला स्तर आयसॉपेडिनाचा असतो अशा खवल्यात) बाहेरच्या दंतिनासारख्या (कॉस्मीन) थराची संरचना जास्त गुंतागुंतीची असते आणि तो दंतवल्कासारख्या (कॅल्शियम व मॅग्नेशियम यांच्या लवणांच्या बनलेल्या कठीण पदार्थाच्या दातावर असलेल्या थरासारख्या) काचदंतिनाच्या (व्हिट्रोर्डेटिनाच्या) स्तराने झाकलेला असतो हल्ली अस्तित्वात असलेल्या फुप्फुसमिनात या शल्कांच्या ऱ्हासाने पातळ, परस्परव्यापी, तंतुमय चकत्या बनलेल्या असतात. आकाचक शल्कात (ज्याचा बाहेरचा स्तर गॅनॉइनाचा व आतला आयसॉपेडिनाचा बनलेला असतो अशा चतुष्कोणी खवल्यात) पटलित अस्थीचा आतला थर अतिशय संहत (घट्ट) असून त्याला आयसॉपेडीन म्हणतात कॉस्मिनाच्या थराचा ऱ्हास होतो आणि बाह्य पृष्ठ गॅनॉइनाच्या (दंतवल्कासारख्या एका चकचकीत पदार्थाच्या) आनुक्रमिक स्तरांनी झाकलेले असते. या प्रकारचे शल्क जिवंत पॉलिप्टेरस आणि लेपिडॉस्टियस यांच्यात असतात आणि त्यांचे अस्तित्व हे आद्य ॲक्टिनॉप्टेरिजायांचे एक विशेष लक्षण होय. तथापि, त्यांच्या बहुतेक वंशजांमध्ये ऱ्हसनामुळे या शल्कांचे स्वरूप अस्थीच्या पातळ चकत्यांसारखे झालेले असते. बहुधा या ऱ्हसित शल्कांचा पश्च काठ गोलसर असल्यामुळे त्यांना चक्राभ शल्क (ज्यांच्या मोकळ्या कडा सारख्या वाकलेल्या असतात असे शल्क) म्हणतात. असे शल्क कार्प आणि तत्सम माशांमध्ये आढळतात. पुष्कळ प्रगत अस्थिमत्स्यांमध्ये (पर्च, सूर्यमासा वगैरे) या शल्कांच्या पश्च काठावर फणीसारखे बारीक दाते असतात म्हणून त्यांना कंकताभ शल्क म्हणतात. आकाचक शल्क आणि त्यांची ऱ्हसित व्युत्पादिते (ऱ्हास पावून तयार झालेल्या रचना) यांची वाढ संकेंद्री वलयांच्या (एकाच मध्याभोवती एकाबाहेर एक असणाऱ्या वलयांच्या) निक्षेपणाने (साचण्याने) होते. हिवाळ्यात वाढ होत नसल्यामूळे शल्कांवर वृद्धिवलये (वाढ दाखविणारी वलये) तयार होतात आणि या वार्षिक वृद्धिवलयांमुळे माशांचे वय ठरविता येते.
दंताभ शल्क (दातांसारखे शल्क) हे उपास्थिमिनांचे (ज्यांचा सांगाडा उपास्थींचा म्हणजे मजबूत आणि लवचिक ऊतकांचा बनलेला आहे अशा माशांचे, काँड्रिक्थिजांचे) विशेष लक्षण होय. हे शरीराच्या सगळ्या पृष्ठभागावर असतात. प्रत्येक शल्काच्या मध्यभागी मगज (गरासारखा भाग) असून त्याच्याभोवती दंतिनाचा स्तर असतो. हा स्तर दंतवल्काने झाकलेला असतो. या शल्कांची टोके मागच्या बाजूकडे वळलेली असतात. हे शल्क मालपीगी स्तरापासून (बाह्यत्वचेच्या खोलवरच्या जीवद्रव्यापासून बनलेल्या व मालपीगी या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या स्तरापासून) तयार होत असल्यामुळे त्यांची वाढ झाल्यावर ते बाह्यत्वचेमधून बाहेर पडतात. शार्क आणि रे मासे यांचे दात मोठे झालेले व विशेषित दंताभ शल्क होत. दंताभ शल्क अत्यंत आद्य असून त्यांच्या सायुज्यनाने (एकीकरणाने) जास्त जटिल (गुंतागुंतीचे) प्रकार उत्पन्न झाले, हे एकेकाळचे मत हल्ली ग्राह्य नाही.
वरूथ फक्त भूचर प्राण्यांमध्ये आढळतात. सगळ्या आधुनिक उभयचरांत (पाण्यात व जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांत) शल्क नसतात. पण उष्ण कटिबंधातील पादहीन इक्थिऑफिसाच्या (सिसिलियन) त्वचेत शल्क पुरलेले असतात. सरीसृप आणि पक्षी यांचे वरूथ सारखेच असतात. सरीसृपांच्या वरुथांची उत्पत्ती मुख्यत: बाह्यत्वचेपासून झालेली असून ते केराटिनांचे बनलेले असतात. सरीसृपाचे सगळे शरीर त्यांनी झाकलेले असून त्यांची मांडणी घराच्या छपरांवरील कौलांप्रमाणे असते. सरडे, साप आणि मगर यांचे वरूथ शृंगी असून ते वेगवेगळ्या आकारमानांचे असतात. कासवाचे पृष्ठवर्म (पाठीवरील आच्छादक संरक्षक कवच) आणि उदरवर्म (खालच्या पृष्ठावर असणारे संरक्षक अस्थिमय कवच) वरुथांच्या एकीकरणाने तयार झालेले असतात. या वरुथांची बुडे जाड अस्थिपटांची असतात. पक्ष्यांच्या फक्त पायांवरच शल्क असतात ते शृंगी असून मुख्यत: केराटिनाचे बनलेले असतात. आर्मडिलो आणि खवल्या मांजर यांच्या शरीरावर कठीण, अस्थीचे बूड असलेल्या, बऱ्याच मोठ्या शृंगी वरुथांचे जवळजवळ पूर्ण आवरण असते. काटेरी मुंगीखाऊच्या शरीरावरील काटे हे रुपांतरित वरूथ होत. उंदीर, घूस, चिचुंदरी, बीव्हर यांच्यासारख्या पुष्कळ सस्तन प्राण्यांच्या फक्त शेपटीवर शल्क असतात.
पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणेच कित्येक अपृष्ठवंशी प्राण्यांतही, विशेषत: कीटकांत, शल्क आढळतात. कीटकांचे शल्क हे अतिविशेषित केस असतात. कीटकवर्गातील लेपिडॉप्टेरा या गणाचे शल्क असणे हे एक लक्षण आहे पण याखेरीज इतर कित्येक गणांतील काही कीटकांत शल्क आढळतात. फुलपाखरे आणि पतंग यांच्या पंखांवर व शरीराच्या इतर काही भागांवर सूक्ष्म, चपट्या शल्कांचे आवरण असते. हे शल्क अतिशय मोठ्या झालेल्या आणि बहिर्वलित (बाहेर वळलेल्या) अधस्त्वचीय (उपत्वचा उत्पन्न करणाऱ्या आणि तिच्या खाली असणाऱ्या कोशिकांच्या म्हणजे पेशींच्या स्तरातील) कोशिकांच्या स्रावापासून तयार होतात. या शल्कात बहुधा रंगदीप्त (पृष्ठभागावर रंगछटा निर्माण करणारे) रंजक (रंगद्रव्ये) असून त्यांच्यावरून प्रकाशाचे परावर्तन झाल्यामुळे पंखाचे चकचकीत रंग दिसतात. कित्येक लहान कीटकांचे (उदा., खवले कीटक) शरीर एकाच शल्काने झाकलेले असते.
कर्वे, ज. नी. कुलकर्णी, स. वि.
“