कुंडली : व्यक्तीच्या जन्माच्या वेळेचा किंवा कोणत्याही क्षणाचा क्रांतिवृत्तस्थ (सूर्याच्या वार्षिक भासमान गतिमार्गावरील) ग्रहस्थितीचा स्थूलमानाचा नकाशा म्हणजे कुंडली होय. कुंडलीमध्ये बारा घरे असतात. या घरांना नावे दिलेली असतात. ती आकृतीमध्ये दिलेली आहेत. आकृतीत दुहेरी रेषांनी दाखविलेल्या स्थानास लग्न म्हणतात. क्रांतिवृत्ताच्या बारा
राशींपैकी जी कोणती तरी एक राशी पूर्व क्षितिजावर (उदित बिंदूवर) असेल ती राशी म्हणजे लग्न होय. मेषादी बारा राशींना एक ते बारा आकडे क्रमाने दिलेले असतात. जी राशी पूर्व क्षितिजावर असेल त्या राशीचा क्रमांक लग्न या घरात लिहितात. नाव लिहीत नाहीत. त्यानंतर बाणांनी दाखविलेल्या म्हणजे अपसव्य दिशेने ओळीने राशींचे आकडे लिहीत जातात. उदा., कर्क ही राशी जर उदित बिंदूवर आकाशात असेल, तर ४ हा आकडा लग्न या पहिल्या घरात लिहितात. तेथून पुढे ५, ६,…१२, १, २ व ३ असे आकडे लिहितात. पंचांगामध्ये लग्नसारिणी हे कोष्टक दिलेले असते, त्यावरून कोणत्याही वेळेचे लग्न समजते. त्यानंतर जन्मकाळी कोणत्या राशीत कोणता ग्रह आहे, हे त्या त्या वर्षाच्या पंचांगात दिलेले असते त्यावरून त्या त्या घरात ते ते ग्रह लिहितात. बुध, शुक्र, मंगळ, गुरू व शनी हे दृश्य ग्रह रवी व चंद्र, राहू, केतू आणि हल्ली प्रजापती वरुण व कुबेर असे सर्व ग्रह कुंडलीत दाखवितात.
जन्मकाळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तीची रास म्हणतात. हा राशीचा अंक तनुस्थानी लिहिला व त्याप्रमाणे पुढे राशींचे आकडे लिहिले तर ती राशिकुंडली होते.
आकृतीत घरांना जी नावे दिली आहेत त्यांवर व इतर काही गोष्टींवर त्या राशींचा, ग्रहांचा व ग्रहांच्या दृष्टींचा प्रभाव असतो आणि बऱ्यावाईट घटना आणि आयुष्याची वाटचाल हा त्यांचाच परिणाम आहे, अशी शेकडो वर्षांपासून लोकांची समजूत आहे. जन्मकुंडली हे ⇨ फलज्योतिषाचे प्रमुख साधन असून तीवरून व्यक्तीचे भविष्य वर्तविता येते.
कुंडली तयार करण्यासाठी स्थानिक जन्मवेळ अचूक माहीत असावी लागते. कारण एक लग्न संपून दुसरे लग्न सुरू होण्याची ती वेळ असली, तर एक दोन मिनिटांनीसुद्धा लग्न व म्हणून कुंडली बदलेल. जन्मस्थळाच्या अक्षांश – रेखांशांवरसुद्धा लग्न अवलंबून असते.
ग्रहांनाही स्वत:चे गुणधर्म असल्याचे गृहीत धरलेले आहे व विशिष्ट कोनांना विशिष्ट शुभाशुभ दृष्टी असतात. ग्रहांचे स्वामित्व विशिष्ट राशीवर असून ते विशिष्ट राशीत असले तर उच्चीचे म्हणून मानतात. असेच स्वामी कुंडलीतील स्थानांनाही असतात. ग्रहाच्या उच्च राशीपासून सातवी रास नीच समजतात.
ग्रहांचे स्वामित्व व उच्च राशी |
||
ग्रह |
स्वामित्व |
उच्च राशी |
चंद्र |
कर्क |
वृषभ |
रवी |
सिंह |
मेष |
बुध |
मिथुन, कन्या |
कन्या |
शुक्र |
वृषभ, तूळ |
मीन |
मंगळ |
मेष, वृश्चिक |
मकर |
गुरू |
धनू, मीन |
कर्क |
शनी |
मकर, कुंभ |
तूळ |
संपातचलन लक्षात घेऊन तयार केलेली ती सायन कुंडली व लक्षात न घेता केलेली ती निरयन कुंडली होय [→ संपातचलन]. पंचांग कोणत्या पद्धतीवर आधारित आहे त्यावरूनसुद्धा कुंडलीत थोडा फरक पडतो. निरयन अगर सायन पंचांग वापरले असेल त्याप्रमाणे ती कुंडली निरयन अगर सायन असते. तसेच शुद्ध निरयन (टिळक) किंवा जुने पंचांग कुंडली करताना वापरले, तर कुंडलीत थोडासा फरक पडतो.
मांडणीच्या पद्धतीनुसार होरा कुंडली, नवमांश कुंडली वगैरे कुंडलीचे विविध प्रकार आहेत.
ग्रहांच्या स्थानांचा व लग्नाचा सूक्ष्म म्हणजे अंशाचासुद्धा विचार केला, तर ग्रह शेजारच्या घरात सरकू शकतात व भविष्य पालटते. म्हणून कुंडलीच्या सोबत प्रत्येक ग्रहाचे व लग्नाचे अंशात्मक सूक्ष्म स्थान दिलेले असते.
संदर्भ: 1. Margaret, E. The Modern Text Book of Astrology, London, 1962.
२. पटवर्धन, रघुनाथशास्त्री, कुंडलीविज्ञान, पुणे.
फडके, ना. ह. कोळेकर, वा. मो.
“