के. (कपिलवायी), रामनाथशास्त्री: (? १९००–? मे १९३५). तेलुगू रंगभूमीवरील एक अत्यंत लोकप्रिय गायक नट. विजयवाड्याजवळील मनतेन येथे जन्म. ‘रंगमार्तंड’ ही गौरवाची पदवी त्यांस लोकांनी दिली होती. ‘बालभारती समाज’ उर्फ ‘मायलावरम् कंपनी’ या विजयवाड्याच्या व्यावसायिक नाट्यसंस्थेतील ते एक प्रमुख नट असून एक दशकभर त्यांनी तेलुगू रंगभूमी गाजविली. महाराष्ट्राचे जसे बालगंधर्व तसे आंध्र प्रदेशाचे के. रामनाथशास्त्री. फरक एवढाच, की त्यांनी फक्त पुरुषभूमिकाच केल्या ‘नारद’, ‘विप्रनारायण’ व ‘अर्जुन’ या त्यांच्या तेलुगू नाटकांतील अत्यंत लोकप्रिय भूमिका होत. संगीत तेलुगू रंगभूमीच्या इतिहासात कपिलवायी शैली म्हणून त्यांची गायकी परंपराप्रवर्तक ठरली. जाणकार प्रेक्षकांपासून संगीताचा गंध नसलेल्या  सामान्य प्रेक्षकापर्यंत या नटाची गायनी कळा लोकप्रिय होती. त्यांच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिकांनी त्या काळी विक्रीचा उच्चांकच गाठला होता. म्हणूनच ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ कंपनीकडून त्यांच्या कुटुंबियांना पहिल्यांदाच निवृत्तिवेतन देण्यात आले. त्यांच्या लोकप्रियतेमुळे एकाच रात्री त्यांना अनेक नाटकांत व निरनिराळ्या स्थळीदेखील काम करावे लागे. ‘गजारोहण’ व ‘कनकाभिषेक’ यांचा सन्मान मिळविणारा आंध्रमधील हा पहिलाच गायक नट होय. आपल्या उभ्या हयातीत त्यांनी अपार पैसा मिळविला पण मदिरा व मदिराक्षीच्या आसक्तीमुळे जीवनाच्या अखेरीस मात्र त्यांना दारिद्र्यात खितपत पडावे लागले व ऐन उमेदीत म्हणजे वयाच्या पस्तिसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

चक्रवर्ती, श्रीनिवास (इं.) जाधव, रा. ग. (म.)