कोहळा, भुई : (हिं. बिलाइकंद गु. भोंय कोहळू क. निळकुंबळा सं. भूमिकुष्मांड, स्वादु विदारीकंद लॅ. आयपोमिया डिजिटॅटा कुल-कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी). ही वेल जमिनीवर वर्षानुवर्षे राहते. मुळ्या लांबट व ग्रंथिल (गाठाळ) असून जमिनीत लांब व खोलवर जातात.भुई कोहळा : फुलांसह फांदीहिचा प्रसार उष्ण कटिबंधातील आशिया, आफ्रिका, अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथील ओलसर हवामानाच्या प्रदेशांत आहे. भारतात समुद्रकिनाऱ्याच्या आसपासचा जंगल प्रदेश, विशेषतः कोकण आणि कारवार, ठाणे, वेंगुर्ले इ. ठिकाणी आहे. पाने मोठी, साधी, बहुधा लांबीपेक्षा रुंदीला अधिक व हस्ताकृती ५–७ खंड शिरा ठळकपणे दिसतात. फुले मोठी व पानांच्या बगलेत लांब देठाच्या मिश्रपरिमंजऱ्यांवर जुलै ते सप्टेंबरात येतात. पुष्पमुकुट जांभळा व साधारण घंटेसारखा  [→ कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी]  किंजपुट चार कप्प्यांचा [→ फूल] व बोंडात पिंगट लहान केस असलेल्या अनेक बिया असतात. या वेलाची ग्रंथिल मुळे, पाने व फुले औषधी आहेत. मूळ पौष्टिक, वाजीकर (कामोत्तेजक), शामक व आरोग्य पुनःस्थापक आहे. मद्याबरोबर चूर्ण दिल्यास दुग्धवर्धक असते. मुलांची दुर्बलता आणि पचनशक्तीची क्षीणता यांवर चूर्ण उपयुक्त आहे प्लीहा-रोगात (पानथरीच्या रोगात) रेचक व यकृताच्या तक्रारीवर गुणकारी आहे. 

टिळक, शा. त्रिं.