केप व्हर्द बेटे : अटलांटिक महासागरातील ५ जुलै १९७५ पर्यंत पोर्तुगालच्या आधिपत्याखालील बेटे. क्षेत्रफळ ४,०३३ चौ. किमी. लोकसंख्या २,४४,८०० (१९७० अंदाज). १४० ४८′ उ. ते १७० १२′ उ. व २२० ५२′ प. ते २५० २२′ प. या दरम्यान अर्धचंद्राकृती पसरलेली ही बेटे सेनेगलमधील डाकारपासून सु. ६००–८७५ किमी. पश्चिमेस आहेत. यांतील नऊ बेटांवर लोकवस्ती असून अनेक छोटी बेटे निर्मनुष्य आहेत. बोआ व्हीश्ता (६०६ चौ. किमी.), साल (२२५),साऊँ, निकूलाऊ (३५०), सँता लूझीआ (४७), साऊँ व्हिसेन्ते (१९५), सँतू ॲन्ताऊँ (६८९) इ. उत्तरेकडील बेटांना विंडवर्ड अथवा बार्लाव्हेंतो म्हणतात, तर मायू (२१२), साऊँ त्यागू (९३०), फोगू (४१२), ब्राव्हा (६२), रोंबू अथवा सेकुश इ. दक्षिणेकडील बेटांना लीवर्ड अथवा सोताव्हेंतो नाव आहे. साऊँ त्यागूवरील प्राईया (लोकसंख्या १३,१४२) ही राजधानी आहे.
ही बेटे ज्वालामुखीनिर्मित असून बहुतेक डोंगराळ आणि खडकाळ आहेत. २,८२९ मी. उंचीचे सर्वोच्च शिखर फोगूवर आहे. बेटांना अधून मधून भूकंपाचे धक्के जाणवतात १८४७ चा फोगूवरील भूकंप मोठा होता. बहुतेक बेटांच्या किनारपट्ट्या कड्यांनी युक्त असल्याने फार थोडी उत्तम बंदरे आहेत. ईशान्य व्यापारी वाऱ्यांच्या टापूमध्ये ही बेटे येत असली, तरी जंगलतोडीमुळे फक्त १०–२५ सेंमी. वार्षिक पर्जन्य पडतो. हवा उष्ण (१७० ते ३०० से.) व कोरडी असते. काही आफ्रिकी व आंबा, ताड, गोरखचिंच इ. उष्णकटिबंधीय वृक्षप्रकारांशिवाय येथे ७० तद्देशीय वनस्पती आढळतात. कॉफी, मका, तंबाखू, ऊस, नारिंगे, कापूस, केळी, बटाटे, एरंड, घेवडा इत्यादींची पिके काढली जातात. मासेमारी हा बेटांवरील महत्त्वाचा उद्योग आहे. याशिवाय अन्नपदार्थ, कपडे, सिगारेट, पादत्राणे, हॅट, साबण, फेझोलोना खडकापासून सिमेंट बनविणे, मीठ बनविणे इ. छोटे उद्योग येथे आहेत.
पंधराव्या शतकाच्या मध्यास पोर्तुगीज खलाशांना या बेटांचा शोध लागला तेव्हा ही बेटे निर्मनुष्य होती. आफ्रिकेतील गुलामांचा व्यापार वाढला तेव्हा आफ्रिकेतून अमेरिकेकडे अथवा यूरोपकडे जाण्या-येण्याच्या मार्गावर असल्याने या बेटांना महत्त्व आले. १४९५ मध्ये या बेटांवर पोर्तुगीजांनी आपला अंमल चालू केलागोऱ्यांच्या वसाहती वसवून गुलामांच्याकडून शेती करवून घेतली. इंग्रज, डच व फ्रेंच लोकांनी बेटांवरील संपत्ती लुटण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. १७९५ मध्ये बेटांवर गव्हर्नर जनरल नेमण्यात आला. गुलामांच्या व्यापारावर बंदी, अवर्षण, दुष्काळ, रोगराई आणि गैरकारभार यांमुळे ही बेटे मागे पडली. दोन्ही महायुद्धांमुळे मात्र आंतरराष्ट्रीय दळणवळणामधील टप्पा म्हणून बेटांचे पुन्हा थोडे महत्त्व वाढले. १२ जिल्हे व ३१ परगण्यांमध्ये ही बेटे विभागली असून सर्वोच्च न्यायालय व धर्मपीठ लिस्बनला आहे. लोकसंख्येपैकी ७० टक्के मिश्र (मुलेटो) आहेत. रोमन कॅथलिक हा अधिकृत धर्मपंथ असला, तरी बेटांवरील अनेक लोक जडप्राणवादी आहेत. केप व्हर्दला पोर्तुगालपासून स्वतंत्र करण्यासाठी आफ्रिकेतील राष्ट्रांमध्ये राहून अनेक राष्ट्रभक्त चळवळ करीत होते. पोर्तुगीज भाषेचीच सोपी बनविलेली भाषा बेटांवर बोलली जात असून साक्षरता २५ टक्के आहे. १९६८ मध्ये येथे २३३ प्राथमिक शाळांतून २६,९९० मुले, ६ माध्यमिक शाळांतून २,७१८ मुले व ५ तांत्रिक शाळांतून ४८५ मुले शिक्षण घेत होती. सर्व बेटांवर मिळून फक्त १,४०० किमी. चे रस्ते होते. साल बेटावरील इश्पार्गू येथे उत्तम हवाईतळ असून साऊँ व्हिसेन्तेवरील मींडेलू हे उत्तम बंदर आहे.
शाह र. रू.
“