केप ऑफ गुड होप : आफ्रिकेच्या दक्षिणेचे सुप्रसिद्ध भूशिर. हे छोटेसे द्वीपकल्प टेबल मौंटनच्या दक्षिणेस असून, त्याच्या पूर्वेस फॉल्स बे आखात आहे. आग्नेयीस १६० किमी. वर आफ्रिकेचे अगदी दक्षिण टोक केप अगुल्हास आहे. पोर्तुगीज समन्वेषक बारथॉलोम्यू डीअश याने १४८८ मध्ये हे शोधिले व तेथील वादळी हवेवरून त्याला केप ऑफ स्टॉर्म्स नाव दिले परंतु पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन याने या मार्गाने हिंदुस्थानला जाण्याची सागरी वाट सापडेल या आशेने त्याला केप ऑफ गुड होप हे नाव दिले होते. त्याने वास्को द गामाच्या वडिलांची ही वाट शोधण्यावर नेमणूक केली. परंतु ते साध्य होण्यापूर्वीच दोघेही मरण पावले. नंतरचा राजा पहिला मॅन्युएल याने वास्कोकडे ती कामगिरी दिली. त्याने १४९७ मध्ये त्या भूशिराला वळसा घालून १४९८ मध्ये हिंदुस्थानच्या भूमीवर पाय ठेवून ती पार पाडली. या द्वीपकल्पावरील आकर्षक पुळणी व सुंदर रस्ते प्रसिद्ध आहेत. दक्षिण आफ्रिकेचे लोक याला ‘केप पॉइंट’ किंवा ‘द पॉइंट’ म्हणतात. दक्षिण आफ्रिका संघराज्याच्या केप प्रांताचे नावही केप ऑफ गुड होप आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रजांनी या भागाचा बळाने ताबा घेतला.
कुमठेकर, ज. ब.