केदारनाथ मंदिर

केदारनाथ : उत्तर प्रदेशाच्या मध्य कुमाऊँ भागातील अखिल भारतीय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चारी धामांपैकी एक असून, गढवाल जिल्ह्यात पौडीपासून वायव्येस ७२ किमी., ३,६४३ मी. उंचीवर आहे. याच्या मागील महापंथ मार्गावर ६ किमी. भैरवझापी कड्यावरून पूर्वी भाविक देहत्याग करीत असत. ७,९१३ मी. उंचीचे केदारनाथ शिखर मंदिरामागे १३ किमी. आहे. येथील वस्ती २५–३० घरांची असून तीही अक्षय्यतृतीयेपासून दिवाळीपर्यंत असते त्यानंतर मंदिर बंद होऊन लोक उखीमठ येथे जातात. मुख्य पुजारी अथवा रावळ नेहमी दक्षिणेतला असतो. येथे मंदाकिनीचे उगमस्थान व आद्य शंकराचार्यांची समाधी आहे. स्वयंभू पिंडीवरचे केदारनाथाचे सध्याचे देऊळ अहिल्याबाईने जीर्णोद्धार केलेले आहे. पंचकेदारांपैकी इतर चार तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर व कल्पेश्वर यांची स्थाने आसपासच आहेत.     

ओक, शा. नि.