केंब्रिज–२ : अमेरिकेच्या मॅसॅचूसेट्स संस्थानात बॉस्टन शहराच्या उत्तरेस असलेले शैक्षणिक व औद्योगिक शहर. लोकसंख्या १,००,३६१ (१९७०). येथे साबण, पाव बिस्किटे, रबरी वस्तू, गोड खाऊ, यंत्रे व त्यांचे सुटे भाग, पोलादी पत्रा, विजेची यंत्रे, छपाई व प्रकाशन धंद्याला उपयुक्त वस्तू, पादत्राणे, लाकडी वस्तू, कपडा वगैरेंचे उत्पादन होते. हार्व्हर्ड विश्वविद्यालय, रॅडक्लिफ महाविद्यालय, मॅसॅचूसेट्स तंत्र निकेतन वगैरे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्रे येथे असून हे सुप्रसिद्ध आंग्लकवी लाँगफेलो याचे वसतिस्थान व जेम्स रसेल लोएल याचे जन्मग्राम आहे. १६३९ मध्ये अमेरिकेतील पहिला छापखाना येथे सुरू झाला. १७७५ मध्ये वॉशिंग्टन ह्याने अमेरिकन सैन्याचे नेतृत्व येथे स्वीकारले.

लिमये, दि. ह.