क्लोदेल, पॉल : (६ ऑगस्ट १८६८–२३ फेब्रुवारी १९५५). फ्रेंच कवी, नाटककार आणि गद्यलेखक. जन्म व्हीलनव्ह स्यूर फेर येथे. शिक्षण पॅरिसला. फ्रेंच परराष्ट्र खात्यात त्याने बरीच वर्षे नोकरी केली. राजदूत आणि वाणिज्यदूत म्हणून अनेक देशांत काम केले.
आरंभीच्या काळात त्याच्यावर प्रतीकवाद्यांचा प्रभाव होता. रँबोच्या Les Illuminations ह्या काव्यसंग्रहातील कवितांनीही त्याच्यावर संस्कार केले होते. १८८६ मध्ये त्याने कॅथलिक पंथाचा स्वीकार केले होते. त्याच्या लेखनावर कॅथलिक पंथीय कडव्या धर्मनिष्ठेचा परिणाम तीव्रतेने जाणवतो.
Cing grandes odes… (१९१०), Corona benignitatis anni Dei (१९१४), Poemes de guerre… (१९२२) हे त्याचे काही उल्लेखनीय काव्यग्रंथ.
संपन्न आणि वैविध्यपूर्ण प्रतिमासृष्टी, आवेगपूर्ण भावनाविष्कार आणि प्रत्ययकारी धर्मनिष्ठा ही क्लोदेलच्या काव्याची लक्षणीय वैशिष्ट्ये होत. काव्यरचनेसाठी एक नवे वृत्त निर्माण करून फ्रेंच छंदसंग्रहात त्याने महत्त्वाची भर घातली. ह्या लवचिक छंदप्रकाराचे नियंत्रण कोणत्याही काटेकोर नियमांनी होत नसून श्वासोच्छ्वासाप्रमाणे नैसर्गिकपणे ते होत असते, असे क्लोदेलचे म्हणणे होते. आपल्या नाट्यकृतींतही त्याने ह्या छंदाचा परिणामकारक वापर केला. Tete d’ or (१८९०), La Ville (१८९३), Partage de midi (१९०६), L’ Otage (१९११), L’Annonce faite a Marie (१९१२) आणि Soulier de satin (लेखनकाळ, १९२५–२८) ह्यांसारखी नाटके त्याने लिहिली. त्यांतील L’ Otage आणि L’ Annonce ही विशेष यशस्वी ठरली. ऐहिक सुखात गुरफटून देवाचे प्रेम नाकारणारी व्यक्ती अखेरीस ईश्वरासाठी सर्वस्वाचा त्याग करायला सिद्ध होते, असे तो अनेकदा दाखवितो. Connaissance de l’ est (१९००) ह्या नावाने प्रसिद्ध झालेली त्याची गद्यकाव्ये फ्रेंचमधील उत्कृष्ट गद्यकाव्ये मानली जातात. Art Poetique (१९०७) मध्ये त्याने आपली काव्यविषयक भूमिका विशद केलेली आहे. १९४६ मध्ये फ्रेंच अकादमीवर त्याची निवड झाली. पॅरिसमध्ये तो निधन पावला.
टोणगावकर, विजया