गाठी वनस्पतींच्या : वनस्पतीच्या एखाद्या भागाची अपसामान्य (अस्वाभिक) वाढ किंवा अधिवृद्धी (अत्यधिक वाढ) अशी वनस्पतीच्या गाठीची व्याख्या करता येईल किंवा वनस्पतींच्या गाठी म्हणजे त्यांच्या एखाद्या भागावर येणारे स्थानिक स्वरूपाचे फुगवटे व कीटक, कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती), व्हायरस इ. कारणांमुळे वनस्पतीच्या एखाद्या भागातील ऊतके (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींचे समूह) उत्तेजित होऊन होणारी अपसामान्य अधिवृद्धी होय. वनस्पतींच्या अशा गाठींचे वर्गीकरण ज्या जीवोपजीवीमूळे (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणाऱ्या जीवामूळे) त्या उद्‍भवतात त्यावरून करता येते. उदा., कीटकजन्य गाठी, सूक्ष्मजंतूजन्य गाठी इत्यादी. वनस्पतीच्या ऊतकातील फक्त जीवोपजीवींनी उत्पादन केलेल्या विशिष्ट रासायनिक क्षोभक द्रव्यांमुळेही गाठी येतात व त्यामुळे कोशिकांची (पेशींची) प्रमाणाबाहेर वाढ  होण्यास चालना मिळते. ह्या क्षोभकांची क्रियावैज्ञानिक क्रिया ही सामान्यतः वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या वृद्धिनियामक हॉर्मोनाप्रमाणे (उत्तेजक अंतर्गत स्रावाप्रमाणे) असते. आपल्या जातिवैशिष्ट्यानुसार जीवोपजीवी गाठी तयार करतात. वनस्पतींच्या गाठींचे स्वयंसीमित व अस्वयंसीमित असे दोन प्रकार आहेत.

स्वयंसीमित गाठी : वनस्पतींच्या अपसामान्य वाढीच्या विविध रीती व प्रकार आहेत. अशा गाठीची होणारी वाढ अस्वयंसीमित गुल्माप्रमाणे न होता जीवोपजीवीने तयार केलेल्या क्षोभक पदार्थाच्या सततच्या अस्तित्वावर अवलंबून असते. सामान्यतः स्वयंसीमित गाठी विशिष्ट आकाराच्या व संरचनेच्या असतात, पण काही वेळा त्यांचे अतिम आकारमान हे वनस्पतीच्या दूषित ऊतकातील जीवोपजीवीच्या संख्येवर अवलंबून असते.

आल्याच्या मुळावरील गाठ

जर स्वयंसीमित गाठींच्या पानावरील व विशेषतः मुळावरील संख्येत बरीच वाढ झाली, तर मात्र त्यांचा वनस्पतीवर ताण पडतो अन्यथा ह्या स्थानिक अधिवृद्धी वनस्पतींना मारक नसतात. याला अर्थात अपवादात्मक उदाहरणे म्हणजे कोबीच्या मुळावरील गाठी व सूत्रकृमींमुळे (नेमॅटोडांमुळे) होणाऱ्या गाठी होत. कोबी व ब्रॅसिका  वंशातील वनस्पतींच्या मुळांवर प्‍लास्मोडियोफोरा ब्रॅसिकी  या कवकामुळे मुळावर गाठी येतात. ह्या अधिवृद्धीचा आकार मध्यभागी फुगीर व टोकांना निमुळता असतो. ही अधिवृद्धी रोगकारक कवकाच्या संक्रामणामुळे (प्रादुर्भावामुळे) झालेली असते. काही वेळा एक किंवा दोन प्राथमिक संक्रामणांमुळे झालेली अधिवृद्धी एकमेकींत मिसळून एक संयुक्त गाठ तयार होते व अशा गाठीचा आकार अनियमित असतो. या गाठीमुळे वनस्पतींची मुळे जमिनीतून पोषक द्रव्ये व पाणी शोषून घेऊ शकत नाहीत त्यामुळे रोपांची वाढ खुंटून ती अकाली मरतात.

सूत्रकृमीच्या मेलायडोगाइन वंशातील जातींमुळे पुष्कळ पिकांच्या व जंगली वनस्पतींच्या मुळावर गाठी आलेल्या आढळतात. मुळावर आढळणारी अपसामान्य वाढ काही वेळा लहानशा फुगवट्याप्रमाणे असते. काही वेळा सर्व मुळे दूषित होऊन मोठ्या आकारमानाच्या गाठी तयार झालेल्या आढळतात व त्या वनस्पतींना मारक ठरतात.

 

आ. २. गुलाबाच्या खोडावरील गाठ

कीटकजन्य गाठी : कीटक व माइट (एक प्रकारची कीड) यांच्यामुळे होणाऱ्या गाठी ह्या विशेष कुतुहलजनक स्वयंसीमित गाठी आहेत. कोलिऑप्टेरा, लेपिडॉप्टेरा, हेमिप्टेरा, डिप्टेरा, हायमेनॉप्टेरा इ. गणांतील कीटकांमध्ये गाठी करण्याची प्रवृत्ती आढळते. कीटकजन्य गाठी ह्या यांत्रिक अथवा रासायनिक उत्तेजकामुळे होतात. गुलाबावरील गाठी या कीटकांच्या यांत्रिक उत्तेजकामुळे येतात. कीटकामुळे होणाऱ्या गाठींचे आकार-वैज्ञानिक (रचना व आकार याबाबतींत सजीवांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाच्या दृष्टीने असलेले) रूप हे कोणत्या जीवोपजीवी कीटकामुळे त्या तयार झाल्या आहेत यावर  अवलंबून  असते. एखाद्या कीटकाच्या जातीने तयार केलेल्या गाठींचे आकार वैज्ञानिक रूप इतके वैशिष्ट्यपूर्ण असते की, कीटकांमधील त्याच्या जवळपासच्या जाती ओळखण्यासाठी त्यांचा उपयोग करतात. काही शास्त्रज्ञ तर प्रौढ कीटकाच्या आकारवैज्ञानिक लक्षणापेक्षाही गाठीचे वैशिष्ट्य जास्त विश्वासार्ह मानतात. गाठीचे आकारवैज्ञानिक रूप ती गाठ वनस्पतींच्या कोणत्या भागावर येते त्यावर अवलंबून नसते. काही कीटक निरनिराळ्या जातींच्या वनस्पतींवरसुद्धा सारख्याच दिसणाऱ्या गाठी तयार करतात. यावरून कीटकापासून विशिष्ट रासायनिक पदार्थ निर्माण होऊन त्याचा वनस्पतीच्या ऊतकावर विशिष्ट परिणाम होत असाधा असे दिसून येते.

कीटकजन्य गाठींचे दोन प्रकार पडतात. (अ) साध्या गाठी :  ह्यांमध्ये गाठीत एक कीटक अथवा त्यांची वसाहत वनस्पतीच्या एकाच भागावर असते. ( आ) संयुक्त गठी : ह्या तयार होण्यासाठी वनसपतीच्या पुष्कळशा भागांचा अंतर्भाव झालेला आढळतो.

करंजाच्या पानांवरील गाठी

साध्या गाठींचे संरचनेवरून (१) फेल्ट (नमदा) गाठ, (२) प्रावरण (आवरण) गाठ आणि (३) घन गाठ हे उपप्रकार आढळतात.

फेल्ट गाठी :  सामान्यतः फेल्ट गाठी माइटामुळे होतात. त्यांची हिरव्या पानाच्या खालच्या बाजूवर व खोडावर मऊ व कापसासारखी  वाढ आढळते. फेल्ट गाठी तयार होताना सामान्यतः नलिकाकृती असणाऱ्या अपित्वचीय (पाने व कोवळी खोडे यांच्या पृष्ठभागांवरील आवरणासारख्या थराच्या ) कोशिका माइटाच्या चेतनेमुळे लांब होऊन त्यांचे गदाकार नलिकांत रूपांतर होते. अशा गाठी सामान्यतः हॉर्स चेस्टनट, लिंडेन इ. वनस्पतींच्या पानांवर आढळतात.

प्रावरण गाठी  : गॉल (गाठी) माइट, मावा, खवले कीटक हे जीवोपजीवी पानाच्या पृष्ठभागावर राहतात. या कीटकांनी स्रवलेल्या पदार्थामुळे पानांच्या विशिष्ट कोशिकांची वाढ होण्यास चालना मिळते. ह्या नवीन वाढीमुळे त्यांची वसाहत प्रावरणाप्रमाणे झाकली जाते.

घन गाठी  : यांमध्ये कीटक वनस्पतीच्या ऊतकाला भोसकून त्या जखमेत आपली अंडी घालतात. याचे उदाहरण म्हणजे गांधील माश्यांमुळे येणाऱ्या ‘ओक ॲपल’ आणि ओकच्या ‘संगमरवरी गाठी’ होत.

 

 

 

बकाणा निंबाच्या खोडावरील गाठी.अस्वयंसित गाठी : (वनस्पती गुल्मे).  वनस्पतींच्या पुष्कळ गाठी ह्या अस्वयंसीमित गाठी किंवा गुल्मे असतात व त्यांना लाक्षणिक आकारमान किंवा संरचना नसते. ही खरी गुल्मीय वाढ होय. अशा प्रकारची गुल्मीय वाढ प्राण्यांतही आढळून येते. ही गुल्मीय वाढ बदललेल्या प्रचुरोद्‍भवी कोशिकांची झालेली असते. या कोशिकांची पुनरोत्पत्ती गुल्म-कोशिकांप्रमाणेच होते व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आश्रयी (ज्यावर जीवोपजीवी  जगतो  त्या ) वनस्पतीमध्ये नसते. रोगट कोशिका स्वायत्त असतात व ही स्वायत्तता मूलभूत स्वरूपाची असते. हेच गुल्म-समस्येचे खरे कारण आहे.

वनस्पति-गुल्माची बरीच लक्षणे प्राणि-गुल्मासारखी असल्याने सामान्यतः गुल्म-समस्येचे संशोधन करताना वनस्पति-गुल्मे मूलभूत स्वरूपाचा विषय म्हणून गणली गेली आहेत. गुल्म-समस्या ही मूलतः कोशिकीय समस्या असल्यामुळे आणि प्राण्यांतील तसेच वनस्पतींमधील  कोशिका व कोशिकीय प्रक्रिया यांमध्ये साधर्म्य असल्यामुळे पुष्कळ वनस्पति-गुल्मांचा प्रायोगिक ⇨ अर्बुदविज्ञानात परीक्ष्य विषय म्हणून उपयोग केला जात आहे. गुल्म-कोशिकेची अनियमित आणि स्वायत्त रीतीने होणारी वाढ हे सर्वांत आवश्यक लक्षण आहे. व ते कोशिकेचे वैशिष्ट्य असल्यामुळे ते उच्च जीवांमध्ये तितक्याच बरोबरीने व्यक्त होते.

अस्वयंसीमित गाठीमुळे होणाऱ्या वनस्पतींच्या तीन रोगांचा प्रामुख्याने अभ्यास करण्यात आला आहे. तिन्ही रोगांची कारणे मात्र वेगवेगळी आहेत. हे तीन रोग म्हणजे (१) सूक्ष्मजंतूंमुळे होणारी माथा गाठ, (२) व्हायरसजन्य जखम गुल्म व (३) जननिक गुल्म.

(१) माथा गाठ : ही सूक्ष्मजंतुजन्य असून ॲग्रोबॅक्टिरियम ट्युमिफेसियन्स  या सूक्ष्मजंतूंमुळे होते. या सूक्ष्मजंतूंचा प्रादुर्भाव जवळजवळ १४२ गणांतील व ६१ कुलांतील निरनिराळ्या वनस्पतींवर होतो. या सूक्ष्मजंतूंमुळे अल्पकाळात साध्या कोशिकेचे गुल्म-कोशिकेमध्ये रूपांतर होऊ शकते. अशा तऱ्हेने निर्माण झालेल्या गुल्म-कोशिकेच्या ठिकाणी चेतना देणारे सूक्ष्मजंतू नसतानाही अखंड अपसामान्य वाढ आणि विशेषतः अनियमित वाढ होण्याची क्षमता येते. ह्या गुल्मीय कोशिकांची स्वायत्त रीतीने वाढ  होऊन पोषक वातावरणात तर ही वाढ ५० किग्रॅ. पर्यंत झालेली आढळते. काही वनस्पतींमध्ये उदा., सूर्यफूल, पॅरिस डेझी इ. पुष्कळ वेळा प्राथमिक संक्रामणाव्यतिरिक्त द्वितीयक संक्रामण आढळते. ज्या सूक्ष्मजंतूमुळे संक्रामण होते तो या द्वितीयक संक्रामणात मात्र आढळत नाही. अशा गुल्मीय कोशिका निर्जंतुक गुल्मापासून घेऊन  त्यांचे पोषक संवर्धकावर प्रतिरोपण केले असता त्यांची वाढ होते, असे आढळले आहे.

(२) जखम गुल्म : हे गुल्म व्हायरसजन्य असून ते कीटकांमार्फत होते. रोगकारक व्हायरसाची कीटक आणि वनस्पतीमध्ये वाढ होते. या व्हायरसामुळे पुष्कळशा वनस्पतीमध्ये आकारजननिक क्षोभ लक्षणे आढळतात. अशा लक्षणांमध्ये पानाच्या शिरा अनियमितपणे मोठ्या होणे, मुळावर गाठी येणे, पाने वळणे, विकृत होणे, शिरांवर गुल्मे येणे, वृंतांमध्ये (देठांमध्ये) विकृती, कांडी लहान होणे इत्यादींचा समावेश होतो. या सर्व विकृतींमुळे रोगट झाडे खुजी राहतात.

या रोगाचा प्रादुर्भाव होऊन गुल्मे `होण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते : (१)  रोगकारक व्हायरसाचा प्रादुर्भाव, (२) जखम व (३) आश्रयी वनस्पतीची आनुवंशिकता.

(३) जननिक गुल्म : अस्वयंसीमित गुल्माची वाढ काही वेळा कोणत्याही संक्रामक कारकाशिवाय काही वनस्पतींवर आढळते. अशा वनस्पतींमधील कोशिकेची जननिक (आनुवंशिक लक्षणांच्या दृष्टीने असणारी) संरचना महत्त्वाची असते. या प्रकारची जननिक गुल्मे निकोटिआनाच्या संकरित वाणांत आढळतात. या संकरित वाणांची पूर्ण वाढ झाल्यावर त्यांच्या बऱ्याच भागावर गुल्मे आढळतात. अशा वनस्पतींमधील कोशिकांना नैसर्गिक कारणांनी अगर क्षोभाने चेतना मिळाली असता ती स्वायत्त प्रकारची कोशिका बनते.

काही वेळा रासायनिक क्षोभानेसुद्धा गुल्मे तयार होतात. काही  वनस्पतींवर टर्पेंटाइन इ. रसायने फवारली असता फवारलेल्या जागी गुल्मे तयार झालेली आढळतात.

उपयोग : वनस्पति-गुल्मांत विविध उपयोगी महत्वाचे पदार्थ असतात. पश्चिम आशियातील व पूर्व यूरोपातील  ‘अलेप्पो’ गुल्म ख्रि. पू. पाचव्या शतकापासून औषधी द्रव्य म्हणून वापरले जात असे. ते उत्तम वनस्पतिजन्य स्तंभक (आकुंचन करणारे), शक्तिवर्धक व विशिष्ट विषावर उतारा आहे. इतर काही गुल्मांचा उपयोग रंजक म्हणून होतो. प्राचीन ग्रीक अलेप्पो गुल्माचा उपयोग लोकर, केस व त्वचा रंगवण्यासाठी करीत. दीर्घकाल टिकाऊ शाई बनविण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.

उपयुक्त गाठींमध्ये शिंबी (शेंगा येणाऱ्या) वनस्पतींच्या मुळांवर येणाऱ्या गाठी प्रमुख आहेत. त्या ऱ्हायझोबियम वंशातील सूक्ष्मजंतूंमुळे येतात व त्यांच्या सहजीवी नायट्रोजन स्थिरीकरणामुळे आश्रयी  वनस्पती आणि मानव यांचा खूपच फायदा झालेला आढळून येतो [→ नायट्रोजन ].

संदर्भ : 1. Horsefall, J. G. Diamond, A. G. Plant PsthologyAn Advance Treatise, Vol. I,

London, 1959.

2. Mani, M. S. Ecology of Plant Galls, The Hague, 1964.

3. Metcalf, C. L. Flint, W. P. Destructive and Useful Insects : Their Habits  and Control,

Tokyo, 1962.

जमदाडे, ज. वि.