गॅलेना : (लेड ग्लान्स, गॅलेनाइट, ब्ल्यू लेड). खनिज स्फटिक घनीय. सामान्यतः घन फलक, अष्टफलक किंवा या दोघांचे संयोजन असलेले स्फटिक आढळतात. यमलन (जुळेपणाचे) पृष्ठ (111) संस्पर्शी (चिकटलेले) वा अन्योन्यवेशी (घुसलेले) यमल (जुळे स्फटिक) असतात [→स्फटिकविज्ञान]. कणमय, संपुंजित व तंतुमय राशीही आढळतात. पाटन : (001) अत्युत्कृष्ट [→पाटन]. कठिनता २.५ वि. गु. ७·४-७·६. चमक धातूसारखी, रंग व कस शिशाप्रमाणे काळसर करडा. रा. सं. PbS. यात इतर सल्फाइडे, चांदी, सिलिनियम आणि क्वचित सोनेही असते. याच्या ⇨ऑक्सिडीभवनाने
सेऱ्युसाइट, अँग्लिसाइट यांसारखी खनिजे तयार होतात. गाळाचे खडक, जलतापीय (उच्च तापमान असलेल्या जलीय विद्रावांनी बनलेल्या) शिरा, पेग्मटाइट, चुनखडक, डोलोमाइट इ. खडकांमध्ये स्फॅलेराइट, पायराइट, कॅल्कोपायराइट या खनिजांच्या जोडीने आढळते. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, रशिया, मेक्सिको, पेरू, कॅनडा, यूगोस्लाव्हिया वगैरे देशांमध्ये आणि भारतात बिहार, राजस्थान, तमिळनाडू, आंध्र प्रदेश इ. राज्यांत गॅलेना सापडते. हे शिशाचे सर्वांत सामान्य आणि महत्त्वाचे धातुक (कच्ची धातू) असून त्याच्यापासून शिसे व बरीच चांदीही मिळवितात. रंग, काच, दारूगोळा, मिश्रधातू, विद्युत् घटमाला, किरणोत्सर्ग-संरक्षक (विशिष्ट पदार्थांतून बाहेर पडणा ऱ्या भेदक किरणांपासून संरक्षण करणारी) कवचे, इलेक्ट्रॉनीय उपकरणे इत्यादींमध्ये गॅलेनाचा उपयोग होतो. सर्व प्रकारच्या खडकांमध्ये आढळत असल्याने खडकांची वये निश्चित करण्यासाठी त्याच्यातील शिशाच्या किरणोत्सर्गी समस्थानिकांचा (एकच अणुक्रमांक परंतु भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचा) उपयोग होतो. प्लिनी यांनी याला ‘काळे शिसे’ असे नाव दिले होते. शिशाच्या धातुकाचे मूळ नाव गॅलेना असल्यामुळे तेच नाव पडले. मातीच्या भांड्यांच्या झिलईसाठी वापरले जाणारे भरडकणी गॅलेना हे ‘पॉटर्स ओअर’ म्हणून ओळखले जाते.
पहा : शिसे.
ठाकूर, अ. ना.
“