शिलाविज्ञान : शिलाविज्ञान ही भूविज्ञानाची एक शाखा आहे. हिच्यात खडक, त्यांचा नैसर्गिक आढळ व वाटणी, रासायनिक संघटन, वयन (पोत), संरचना आणि उत्पत्ती यांचा अभ्यास केला जातो. मुख्यतः खडकाचे तपशीलवार बिनचूक वर्णन व पद्धतशीर वर्गीकरण यांच्या अभ्यासाला शिलावर्णन म्हणतात. शिलाविज्ञानात मुख्यत्वे शिलाजननाचा म्हणजे खडकाच्या उत्पत्तीचा अभ्यास करतात आणि हा अभ्यास भौतिक व रासायनिक परिस्थिती आणि भूवैज्ञानिक प्रक्रिया यांच्या संदर्भात करतात.

उत्पत्तीनुसार खडकांचे अग्निज खडक, गाळाचे खडक व रूपांतरित खडक हे तीन प्रमुख प्रकार केले जातात. या तीन प्रकारांच्या खडकांचे प्रत्यक्ष क्षेत्रात व प्रयोगशाळेत अध्ययन करण्याचे काम शिलाविज्ञानात केले जाते. खडकाचे नैसर्गिक स्थान, स्थिती व वाटणी यांचा अभ्यास क्षेत्रीय अध्ययनात करतात. खडकाच्या एखाद्या गटाची स्थिती, लक्षण, संरचना, खनिजविज्ञान, रासायनिक संघटन व उत्पत्तीविषयक सूचक बाबी यांचाही अभ्यास शिलाविज्ञानात करतात. त्या गटाचे काळजीपूर्वक मानचित्रण करतात व त्यातून शिलावैज्ञानिक संशोधनासाठी लागणारे खडकाचे प्रातिनिधिक नमुने मिळविण्यात येतात. खडकांच्या प्रकारांची प्रादेशिक प्रतवारी कशी झाली आहे, तेही क्षेत्रीय अध्ययनातून समजू शकते. संबंधित अनुपलब्ध माहिती यातून अन्य मार्गांनी कळू शकते.

शिलाविज्ञान हे ⇨ खनिजविज्ञानाची तत्त्वे व पद्धती यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. कारण बहुतेक खडक खनिजांचे बनलेले असून या दोन्हींची उत्पत्ती एकाच परिस्थितीत झालेली असते. खडक व खनिजे भूपृष्ठाखाली विविध खोलींवर व भूपृष्ठावरही निर्माण झालेली असतात. प्रायोगिक शिलाविज्ञानात अशी नैसर्गिक परिस्थिती प्रयोगशाळेत निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. (उदा., खोल भागात असणारी उच्च दाब व तापमानाची परिस्थिती). अशा प्रयोगांमधून खडकांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांची बदलत्या परिस्थितींमधील माहिती मिळते. तसेच खडक कोणत्या रासायनिक व भौतिकीय परिस्थितीत निर्माण झाले असावेत याविषयीची माहितीही अशा प्रयोगांतून मिळू शकते. पृथ्वीची उत्पत्ती व विकास यांच्याविषयीचे दुवे मिळण्यासाठीही ही माहिती उपयुक्त ठरू शकते. खडकांतील खनिजे ओळखण्यासाठी खडकांच्या पातळ चकत्यांचा विशिष्ट सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने अभ्यास करतात. या सूक्ष्मदर्शकाला शिलावर्णनविषयक सूक्ष्मदर्शक म्हणतात आणि त्यात ध्रुवित (एकाच प्रतलात कंप पावणाऱ्या) प्रकाशाचा उपयोग केला जातो. खडकातील खनिजे ठरविण्यासाठी रासायनिक तंत्रांचाही उपयोग करतात.

पहा : अग्निज खडक खडक खनिजविज्ञान गाळाचे खडक ग्रॅनाइट चुनखडक पट्टिताश्म बेसाल्ट भूविज्ञान रूपांतरित खडक वालुकाश्म सुभाजा.

ठाकूर, अ. ना.