गॅमो,जॉर्ज : (४ मार्च १९०४–१९ ऑगस्ट १९६८). रशियन-अमेरिकन भौतिकीविज्ञ आणि ज्योतिर्विद. अणुकेंद्रीय भौतिकी, ज्योतिषशास्त्र व जीवविज्ञान या विषयांत महत्त्वाचे कार्य. तसेच शास्त्रीय विषयांवरील सामान्य वाचकाला समजू शकेल अशा सुबोध स्वरूपाच्या पुस्तकांचे लेखन. त्यांचा जन्म रशियातील ओडेसा येथे झाला. लेनिनग्राड विद्यापीठातून १९२८ मध्ये पदवीधर झाल्यानंतर कोपनहेगन येथे नील्स बोर यांच्या मार्गदर्शनाखाली (१९२८-२९) व केंब्रिज येथे रदरफर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली (१९२९-३०) त्यांनी संशोधन केले. १९३१–३३ या काळात ते लेनिनग्राड विद्यापीठात प्राध्यापक होते तसेच त्यांनी तेथील ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसमध्ये संशोधनही केले. त्यानंतर ते पॅरिस ल लंडन येथील विद्यापीठांत (१९३३-३४), तसेच अमेरिकेतील मिशिगन (१९३४) व जॉर्ज वॉशिंग्टन या विद्यापीठांत प्राध्यापक होते. त्यानंतर १९५६ पासून ते कोलोरॅडो विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक होते.
द कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲटॉमिक न्यूक्लियस अँड रेडिओॲक्विव्हिटी (१९३१), स्ट्रक्चर ऑफ ॲटॉमिक न्यूक्लियाय अँड न्यूक्लियर ट्रॅन्सफॉर्मेशन (१९३७) आणि थिअरी ऑफ ॲटॉमिक न्यूक्लियस अँड न्यूक्लियर एनर्जी सोर्सेस (१९४९) या शास्त्रीय व सैद्धांतिक स्वरूपाच्या ग्रंथांबरोबरच गॅमो यांनी शास्त्रीय विषयांवरील बरीच सुबोध पुस्तकेही लिहिली. त्यांपैकी स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियाय (१९३१) द बर्थ अँड डेथ ऑफ द सन (१९४०) बायॉग्राफी ऑफ द अर्थ (१९४१) ॲटॉमिक एनर्जी इन कॉस्मिक अँड ह्यूमन लाइफ (१९४६) वन, टू, थ्री, ……., एनफिनिटी (१९४७) द मून (१९५६) पझल मॅथ (१९५८) मॅटर, अर्थ अँड स्काय (१९५८) इ. विशेष प्रसिद्ध आहेत. या त्यांच्या लोकप्रिय शास्त्रीय ग्रंथलेखनाबद्दल त्यांना १९५६ चे युनेस्कोचे कलिंग पारितोषिक देण्यात आले. ते अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे व रॉयल डॅनिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. कोलोरॅडोतील बोल्डर येथे ते मृत्यू पावले.
भदे, व. ग.