अनंत काकबा प्रियोळकर

प्रियोळकर, अनंत काकबा : (५ सप्टेंबर १८९५-१३ एप्रिल १९७३). श्रेष्ठ मराठी संशोधक व लेखक. जन्म गोव्यातील प्रियोळ ह्या गावचा. शिक्षण गोवा, धारवाड आणि सांगली येथे झाले.सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात शिकत असताना विख्यात भाषाशास्त्रज्ञ डॉ. पां. दा. गुणे ह्यांच्याशी प्रियोळकरांचा निकटचा संबंध आला. त्यांच्या सहवासामुळे भाषाशास्त्र आणि पाठचिकित्साशास्त्र ह्या विषयांकडे प्रियोळकर ओढले गेले. मराठी हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची परीक्षा ते १९२३ मध्ये उत्तीर्ण झाले. ह्या परीक्षेच्या निमित्ताने मुंबईस असताना त्यांनी विविधज्ञानविस्तार ह्या विख्यात मराठी मासिकाच्या संपादनकार्यात मदत केली. पुढे काही काळ शिक्षकाची नोकरी केल्यानंतर १९२५ साली विविधज्ञानविस्ताराचे काम पाहण्यासाठी ते मुंबईस आले. १९२६ मध्ये मुंबई नगरपालिकेत त्यांनी नोकरी धरली. ती सांभाळून विविधज्ञानविस्ताराच्या संपादकीय खात्यात ते काम करीत होतेच. १९४८ साली ‘मराठी संशोधन मंडळा’च्या उपसंचालकपदी त्यांची नेमणूक झाली १९५० पासून ते ह्या मंडळाचे संचालक झाले. मंडळाचे संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी १९५३ पासून मराठी संशोधन पत्रिका हे त्रैमासिक ते प्रकाशित करू लागले. मंडळाच्या संचालकपदावरून १९६६ च्या अखेरीस ते निवृत्त झाले. ह्या मंडळाच्या द्वारे मराठी संशोधनकार्याला त्यांनी निश्चित स्वरूपाची बैठक दिली आणि गतीही आणली. पीएच्.डी.च्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रियोळकरांनी साक्षेपीपणे संपादिलेल्या विविध ग्रंथांत रघुनाथपंडितकृत दमयंती स्वयंवर (१९३५) आणि मुक्तेश्वरकृत महाभारताचे आदिपर्व (खंड १ ते ४ १९५१, १९५३, १९५६ आणि १९५९) हे विशेष उल्लेखनीय होत. आधुनिक पाठचिकित्साशास्त्राचा अवलंब करून, अनेक हस्तलिखितांच्या आधारे, प्रियोळकरांनी त्यांच्या संहिता निश्चित केल्या आणि त्या निमित्ताने आधुनिक, शास्त्रीय पाठचिकित्सेची तत्त्वे आणि मराठीतील ग्रंथांच्या संदर्भात पाठचिकित्सेसमोर उपस्थित होणारे प्रश्न ह्यांची चर्चा केली. दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे आत्मचरित्रही ज्यांनी संपादिले (१९४७). दादोबांच्या आत्मचरित्रात त्यांच्या जीवनातील १८४७ पर्यंतच्याच घटना आलेल्या असल्यामुळे प्रियोळकरांनी ह्या आत्मचरित्राला पूरक म्हणून दादोबांचे चरित्र लिहिले. हे चरित्र म्हणजे सटीप आणि साधार चरित्रलेखनाचा एक लक्षणीय नमुना होय. त्यांच्या अन्य संपादित ग्रथांत जगन्नाथशास्त्री क्रमवंत, गंगाधरशास्त्री फडके आणि बाळशास्त्री घगवे ह्या शास्त्रीत्रयाने रचिलेले महाराष्ट्र भाषेचे व्याकरण (१९५४), प्रा. केरूनाना छत्रे ह्यांची टिपणवही (१९५८), परशुरामपंततात्या गोडबोले ह्यांच्या नवनीताचा पहिला भाग (१९५७), दुसरा भाग (१९६४) आणि लोकहितवादीकृत निबंधसंग्रह (प्रथमांश, १९६७) ह्यांचा समावेश होतो. काही ख्रिस्ती मराठी साहित्यही त्यांनी संपादिले आहे. त्यात पाद्री टॉमस स्टीव्हेंझकृत दौत्रिम क्रिस्तां (१९६५), सेंट पीटरच्या जीवनावर एका फ्रेंच जेझुइटाने लिहिलेले मराठी पुराण (३सर्ग, १९६५), तसेच फादर अँटोनिओ द साल्दॅन्या ह्याने लिहिलेली सांतु आंतोनिची जिवित्वकथा (१९५४) ह्यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. मराठी मुद्रणकलेच्या आरंभकालातील मराठी ग्रंथांची यादी मराठी दोलामुद्रिते ह्या नावाने त्यांनी केली आहे (१९४९).

ग्रंथसंपादनाबरोबरच मौलिक असे इंग्रजी-मराठी ग्रंथलेखनही प्रियोळकरांनी केलेले आहे. द प्रिंटिंग प्रेस इन इंडिया (१९५८), गोवा री-डिस्कव्हर्ड (१९६७), द गोवा इंक्विझिशन (१९६१), ग्रांथिक मराठी भाषा आणि कोंकणी बोली (१९६६) हे असे काही ग्रंथ होत. विविध भारतीय भाषांतील मुद्रणाच्या आरंभीच्या अवस्थांचे एक विहंगमावलोकन द प्रिंटिग प्रेस इन इंडियात आढळते. गोव्याकडे आणि त्याच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाकडे पाहण्याचे उचित यथादर्शन (पर्‌स्पेक्टिव्ह) मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी गोवा री-डिक्सव्हर्डमध्ये केलेला आहे. सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी गोव्यातील हिंदूंना सक्तीने करावयास लावलेल्या धर्मांतराची विस्तृत माहिती द गोवा इंक्विझिशनमध्ये आलेली आहे. मराठी बोली, ग्रांथिक भाषा व बोली, मराठी बोलीचे यथोच्चार लेखन, कोकणी बोलीची नामांतरे, कोकणी – मराठी भेदभावाचा उद्‌भव व फैलाव इ. विषय ग्रांथिक मराठी भाषा आणि कोंकणी बोलीमध्ये विवेचिलेले आहेत. कोकणी ही मराठीहून वेगळी भाषा आहे, हे मत प्रियोळकरांना मान्य नव्हते. कोकणी-मराठी वादात त्यांनी मराठीचा हिरीरीने पुरस्कार केला. जेझुइटांनी कोश, व्याकरणे, ओवीबद्ध पुराणे आदींची रचना करून मराठीची जी सेवा केली, तिच्याबद्दल प्रियोळकरांना आदर होता गोव्यातील ख्रिस्ती आणि हिंदू ह्या दोन समाजांतील भावनात्मक एकात्मता हा त्यांचा ध्यास होता.

एक श्रेष्ठ संशोधक म्हणून प्रियोळकर प्रसिद्ध असले, तरी आरंभी त्यांनी कविता, कादंबरी असे काही ललित लेखन केलेले आहे. प्रिय आणि अप्रिय (१९६५) ह्या त्यांच्या लेखनसंग्रहातूनही लालित्याचा प्रत्यय येतो. १९७१ मध्ये त्यांनी लिहिलेले डॉ. भाऊ दाजी लाड ह्यांचे चरित्र प्रसिद्ध झाले. डॉ. भाऊ दाजी लाड ह्यांच्या चरित्राबरोबरच त्यांच्या कालखंडाचे जिवंत दर्शन प्रियोळकरांनी घडविलेले आहे. आयुष्याच्या अखेरीअखेरीस त्यांनी आपले आत्मचरित्र लिहावयास घेतले होते. ह्या आत्मचरित्रात १९२५ पर्यंतचाच काळ आला आहे. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे पुढील भाग ते लिहू शकले नाहीत. डॉ. सुभाष भेंडे संपादित अ. का. प्रियोळकर स्मृतिग्रंथात हे आत्मचरित्र समाविष्ट आहे. प्रियोळकरांच्या समग्र साहित्याची सूची डॉ. सु. रा. चुनेकर ह्यांनी तयार केली आहे (१९७३).

१९५१ साली कारवार येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मुंबई येथे ते निवर्तले.

अदवंत, म. ना.