क्रोकोआइट : (रेड लेड ओअर). खनिज. स्फटिक एकनताक्ष लांबट व बारीक प्रचिन [ → स्फटिकविज्ञान]. स्फटिकांवर उभ्या रेखा असतात. संपुंजित, कणमय व स्तंभाकार रूपांतही असते. पाटन : (110) अपूर्ण [→ पाटन]. कठिनता २·५–३. वि. गु. ६·१. दुधी काचेसारखे पारभासी. चमक हिऱ्यासारखी. रंग गडद तांबडा, केशरी किंवा नारिंगी. कस पिवळट नारिंगी. रा. सं. PbCrO4. हे द्वितीयक (नंतरच्या क्रियांनी बनलेले) खनिज असून क्रोमाइटयुक्त खडकांना छेदणाऱ्या शिशाच्या शिरांच्या ऑक्सिडीभूत [→ ऑक्सिडीभवन] पट्ट्यांत आढळते. हे पायरोमॉर्फाइट, सेर्युसाइट इ. खनिजांच्या बरोबर सापडते. टॅस्मेनिया, उरल, रूमानिया, ॲरिझोना इ. प्रदेशांत आढळते. अत्यल्प प्रमाणात सापडत असल्याने त्याचा उपयोग होत नाही, परंतु क्रोमियम सर्वप्रथम क्रोकोआइटात सापडल्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. तसेच दुर्मिळ व दिखाऊ असल्याने क्रोकोआइटला खनिज संग्रहालयांकडून मागणी असते. याला बर्थियर यांनी क्रोकॉइज (१८३८) व डेना यांनी क्रोकॉइसाइट (१८४४) अशी नावे दिली होती, परंतु १८६८ साली त्याच्या रंगामुळे त्याला केशरी अर्थाच्या ग्रीक शब्दावरून क्रोकोआइट नाव पडले.
ठाकूर, अ. ना.