खोरट : (हिं. विलायती लसण, किरथ, गंदिना इं. लीक लॅ. अलियम पोरम कुल – लिलिएसी). कांदा व लसूण यांच्या वंशातील ही लहान द्विवर्षायू (दोन वर्षे जगणारी)] ओषधी  मूळची पूर्व भूमध्यसामुद्रिक प्रदेशातील असून यूरोप व ब्रिटिश बेटे येथे फार प्राचीन काळापासून ती उपयोगात आहे व अनेक देशांत हल्ली लागवडीत आहे.

खोरट (लीक) : कंद व पानांचा तळभाग.

कंद लांब व सरळ खोडावर हिरवी, सपाट, रेषाकृती पाने उंच दंडाकृती पुष्पबंधाक्षावर (फुलोऱ्याच्या दांड्यावर) गोल, चामरकल्प [→ पुष्पबंध] दाट फुलोरा येतो व त्यात घंटाकृती गुलाबी फुले येतात. हे पीक साधारणतः ६२० मी. उंचीवरच्या प्रदेशात खोल, सुपीक, ओलसर व खतावलेल्या जमिनीत चांगले येते. पांढरे कंद व पानांचे देठ सार व उकडलेल्या किंवा शिजवलेल्या पदार्थांत (मांस, भाजी इ.) स्वादाकरिता घालतात कांद्याप्रमाणे बियांपासून लागवड होते पीक सावकाश येते. याचे (लीकचे) फूल वेल्सचे राष्ट्रीय पुष्प आहे. सेंट डेव्हिड दिनानिमित्त (१ मे) ते राष्ट्रीय चिन्ह म्हणून हॅटमध्ये वापरतात. कंद उत्तेजक व गळू जलद पुवाळून फुटण्यास वापरतात तो स्कर्व्हीनाशक (आहारातील क जीवनसत्त्वांच्या अभावामुळे निर्माण होणारी स्थिती नाहीशी करणारा) आहे.

पहा : लिलिएसी.

जगताप, अहिल्या पां.