क्रुसीफेरी : (मोहरी कुल). फुलझाडांतील (आवृतबीज द्विदलिकित वर्गातील) ऱ्हीडेलीझ या गणात या वनस्पति-कुलाच समावेश होतो. या कुलात शूल्टसे यांच्या मते ३५० वंश व सु. २,५०० जाती (विलिस यांच्या मते ३७५ वंश व ३,२०० जाती) असून त्यांचा प्रसार जगभर असला, तरी विशेषतः उत्तरेकडील समशीतोष्ण कटिबंधात व भूमध्य समुद्रालगतच्या प्रदेशात तो अधिक आहे. यातील बहुतेक सर्व वनस्पती वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक किंवा अनेक वर्षे जगणाऱ्या), केसाळ, ⇨ ओषधी किंवा क्षुपे (झुडपे) असून बुहतेकांत पाणी अथवा तिखट रसाचे प्रमाण अधिक असते. शरीरात (विशेषतः पानांत) मायरोसीन या ग्‍लुकोसाइडयुक्त कोशिका (पेशी) फार असतात. पाने एकाआड एक, साधी असून कडांवर अनेक प्रकारचे दाते असतात किंवा ती अंशतः  खंडित असतात. फुलोरा अकुंठित व फुले द्विलिंगी, नियमित, अरसमात्र, अवकिंज व चतुर्भागी संदले व प्रदले प्रत्येकी चार, सुटी व पाकळ्यांची मांडणी क्रुसाकार असते. एकूण सहा केसरदलांपैकी बाहेरील दोन खुजी व आतील दोन (पुन्हा विभागल्यामुळे चार) उंच म्हणून यांना चतुरोन्नत म्हणतात किंजदले दोन व जुळलेली किंजपुटात साध्या पडद्यामुळे (छद्मपट) दोन कप्पे (पुटके) होतात [→ फूल] व बीजके दोन्हींमध्ये दोन ठिकाणी किंजपुटाच्या भिंतीवर (तटलग्न) चिकटून असतात. शुष्क फळ दोन्ही शिरांवर खालून वर तडकते (सार्षप) व पडदा मध्येच राहून बीजे त्याला चिकटून राहतात. ते लांब [→ मोहरी], आखूड (सार्षपक, उदा., कँडिटफ्ट), क्वचित न तडकणारे [→ मुळा] किंवा बोंडासारखे असते. बीजातील दलिकांत तेल असून स्वतंत्र पुष्क (बीजातील गर्भाच्या पोषणास मदत करणारा पेशीसमूह) नसतो. फुलात मधुरसाचे प्रपिंड (ग्रंथी) असून परागण (परागसिंचन) कीटकांद्वारे होते. या संरचनेत अनेक अपवाद आढळतात. स्वपरागण व बंद फुलेही आढळतात. उपयुक्ततेच्या दृष्टीने हे कुल फार महत्त्वाचे आहे. यात कोबी, फुलवर, नवलकोल, मोहरी, मुळा, अहाळीच इ. खाद्य मोहरी हे औषधी व कँडिटफ्ट, नॅस्टर्शियम, वॉलफ्लॉवर इ. बागेतील शोभेच्या वनस्पती समाविष्ट आहेत. या कुलाची अनेक लक्षणे ध्यानात घेऊन ते बरेच प्रगत आहे असे मानण्यात येते. त्याच गणातील ⇨ पॅपॅव्हरेसी, ⇨ कॅपॅरिडेसी  व फ्युमॅरिएसी या त्याच गणातील इतर कुलांशी त्याचे जवळचे नाते आहे व याला सार्षपादी कुल असेही म्हणतात. या कुलाचा क्रमविकास (उत्क्रांती) या गणातील पहिल्या दोन्ही कुलांपैकी कॅपॅरिडेसी या कुलापासून झाला असावा याबद्दल पुरावा आहे. रॅनेलीझ या प्रारंभिक गणातील काही कुलांतील (रॅनन्क्यूलेसी, मॅग्नोलिएसी इ.) पूर्वजनांपासून पुढे पॅपॅव्हरेसी, कॅपॅरिडेसी इ. कुले विकसित झाली असावी असे मानले जाते. हचिन्सन यांनी क्रुसीफेरीला गणाचा दर्जा देऊन क्रुसीएलीझ असा स्वतंत्र गण मानला आहे व त्याचा उगम रॅनेलीझमधूनच घेतला आहे. प्रथम या कुलाची गणना परायटेलीझ या गणात केली जात असे (बेंथॅम व हूकर).

पहा : फूल वनस्पतींचे वर्गीकरण.

क्षीरसागर, ब. ग.