गल्स्ट्रांड, आल्व्हार : (५ जून १८६२–२८ जुलै १९३०). स्वीडिश नेत्ररोगतज्ञ आणि १९११ सालच्या वैद्यकाच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. ते लांतस्क्रूना येथे जन्मले. अप्साला, व्हिएन्ना आणि स्टॉकहोम येथे त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी १८८८ मध्ये वैद्यकीय पदवी घेतली व १८९० मध्ये नेत्ररोग विषयाची डॉक्टरेट मिळविली. त्यानंतर ते स्टॉकहोम येथील कॅरोलीन इन्स्टिट्यूटमध्ये नेत्ररोगाचे व्याख्याते झाले. १८९४ ते १९१३ पर्यंत अप्साला विद्यापीठात त्याच विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १९१४ पासून त्याच विद्यापीठात ते भौतिक प्रकाशकी (प्रकाशाच्या विविध भौतिक गुणधर्मांचा अभ्यास करणारे शास्त्र) व शरीरक्रियात्मक (शरीरातील क्रिया व कार्य यांवर आधारित) प्रकाशकी या विषयांचे प्राध्यापक व संशोधन प्रमुख झाले.
निरनिराळ्या पारदर्शक माध्यमांतील– विशेषेकरून डोळ्यातील माध्यमातील– प्रकाशाचे प्रणमन (प्रकाशकिरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना त्याच्या दिशेत होणारा बदल, वक्रीभवन), डोळा व प्रकाश विसरण (विखुरणे) यांचे संबंध आणि डोळ्यांतील प्रकाशीय प्रतिमांच्या गुंतागुंतीची उकल हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. नेत्ररोग तपासणीकरिता वापरात असलेली ‘रेखाछिद्र दीप’ आणि ‘परावर्तनरहित नेत्र-परीक्षक’ ही साधने त्यांनीच शोधून काढली.
त्यांनी आपल्या संशोधनाच्या आधारे लिहिलेली तीन पुस्तके प्रख्यात आहेत. १९१२ मध्ये त्यांना डब्लिन विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट पदवी दिली. ते स्टॉकहोम येथे मरण पावले.
कानिटकर, बा. मो.