गर्भारपणा : गर्भधारणा झाल्यानंतर प्रसूती होईपर्यंतच्या मधल्या काळाला गर्भारपणा किंवा गर्भिणी-अवस्था असे म्हणतात. मानवात ही कालमर्यादा एकूण २८० दिवसांची असते. शेवटच्या पाळीच्या पहिल्या दिवसापासून नऊ महिने मोजून त्यांत सात दिवस मिळविले की ती सर्वसाधारणपणे प्रसूतीची तारीख असते (उदा., पाळीचा पहिला दिवस १ ऑगस्टला असेल तर प्रसूतीची तारीख ८ मे). काही वेळेला प्रसूतीच्या या तारखेत १०–१२ दिवसांचा फरक पडतो. यापेक्षा जास्त दिवस गेले तर कधी कधी प्रसूती अवघड होण्याचा संभव असतो व मग अशा वेळी प्रसूती लवकर होण्यासाठी कृत्रिम उपाय योजावे लागतात.

गर्भधारणा होणे हे पूर्ण वाढ झालेल्या (वयात आलेल्या) स्त्रीच्या आयुष्यातील शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक अशा चौफेर दृष्टींनी एक अत्यंत महत्त्वाचे स्थित्यंतर आहे. ऋतुप्राप्ती होणे आणि त्यानंतर नियमित मासिक पाळी येणे हे स्त्रीच्या पूर्ण वाढीचे प्रमुख लक्षण आहे. वय १३ ते १५ (क्वचित १७ वर्षे) ही निरोगी स्त्रीच्या पूर्ण वाढीची मर्यादा असते. प्रथम गर्भधारणा होण्याचे योग्य वय १८ ते २० वर्षाच्या दरम्यानचे मानले जाते. ऋतुप्राप्तिकालापासून ऋतुनिवृत्तिकालापर्यंतच्या दरम्यानचा काळ म्हणजे वय १४ ते ४० पर्यंतचा (ही वयोमर्यादा क्वचित मागे-पुढे होऊ शकते) मधला काळ हा गर्भधारणेचा खरा काळ असतो. त्यांतही वयाच्या पस्तीस वर्षांपर्यंतचा काळ गर्भधारणेस विशेष अनुकूल असतो.

मासिक पाळी चुकली म्हणजे गर्भधारणाच झाली असे मात्र नाही. अनियमित मासिक पाळी अन्य कारणांमुळेही होऊ शकते [→ ऋतुस्राव व ऋतुविकार]

लक्षणे : गर्भधारणेमुळे मासिक पाळी चुकली की, प्रथम विशिष्ट भावना होऊ लागतात. मळमळणे, उलट्या होणे, डोहाळे लागणे (म्हणजे विशिष्ट पदार्थांवर वासना जाणे आणि विशिष्ट पदार्थांवरची वांच्छा उडणे), वरचेवर लघवी होणे, मलावरोध होणे या सुरुवातीच्या भावना आणि लक्षणे असतात. काहींना डोहाळे अजिबात लागत नाहीत. दुसरा महिना सरत आला की, स्तने घट्ट वाटू लागतात. ती ठुसठुसू लागतात. स्तनाग्रे फुगीर होऊन पुढे येतात. स्तनाग्रांच्या भोवतालची जागा (कुचपरिमंडल) काळसर होऊन त्यावर बारीक बारीक ठिपके दिसू लागतात. काही स्त्रियांत डोळ्यांखालची जागाही काळसर दिसू लागते. तिसरा महिना संपत आला की, मळमळ, उलट्या होतात. डोहाळे कमी होतात. क्वचित चौथ्या महिन्यापर्यंत उलट्या थांबतात. तिसऱ्या महिन्याच्या शेवटी स्तने दाबल्यास त्यांतून किंचित पाण्यासारखा स्राव निघतो. ही  सगळी लक्षणे आणि भावना काही वेळा गर्भधारणा नसूनसुद्धा काही मानसिक विकृतीत आणि विशिष्ट शारीरिक रोगात दिसून येतात. अशा वेळी गर्भधारणेचे निश्चित निदान (१) ॲशेम झॉण्डेक, (२) फ्रिडमन किंवा (३) हॉगबेन यांपैकी कुठल्याही पद्धतीच्या जैव परीक्षेने करता येते. आणखीही अनेक पद्धती प्रचलित आहेत. उदा., प्रतिरक्षा-परीक्षा (प्रतिकारशक्तीनिदर्शक रक्तरसातील ग्‍लोब्युलिनाची म्हणजे पाण्यात न विरघळणाऱ्या पण लवण विद्रावात विरघळणाऱ्या एक प्रकारच्या प्रथिनाची परीक्षा) व हॅम्‍नोन-परीक्षा.  ॲशेम झॉण्डेक परीक्षेमध्ये संशयित गर्भवतीचे मूत्र मादी उंदरास टोचल्यानंतर त्याच्या अंडाशयात होणाऱ्या विशिष्ट फरकावरून गर्भधारणा, दृश्य चिन्हे दिसण्यापूर्वी दीड महिन्यातच निश्चित ओळखता येते. फ्रीडमन परीक्षेमध्ये हेच मूत्र सशास टोचतात. हॉगबेन परीक्षेमध्ये ते बेडकात टोचतात.

तिसऱ्या महिन्याच्या शेवटी पोट तपासल्यास विस्तारित (वाढलेले) गर्भाशय हाताला जाणवण्यास सुरुवात होते. वाढत्या गर्भाबरोबर गर्भाशयाची वाढ होत राहिल्याने पोटही हळूहळू मोठे होऊ लागते. साडेचार महिन्यांच्या सुमारास गर्भवतीला आतील गर्भाची हालचाल समजू लागते. पाचव्या महिन्यात गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात. यावेळी ते अतिशय जलद, अस्पष्ट आणि अनियमित असतात. सहाव्या महिन्यात गर्भाचे अवयव हाताला लागण्यास सुरुवात होते. महिन्यागणिक वाढत्या गर्भाबरोबर गर्भाशयाचा आकारही वाढत जातो. सहाव्या महिन्यात तो बेंबीच्या पातळीला येऊन पोहोचतो. या महिन्यात (डोहाळे, उलट्या यांखेरीज पूर्वीची इतर लक्षणे असतातच) गर्भाशयाच्या वाढत्या आकारामुळे पोटावरती त्वचा ताणत जाते व त्यावर काळसर चकचकीत उभ्या रेषा उमटतात. सातव्या महिन्यात गर्भाची हालचाल विशेष जाणवते. गर्भाशयाची पातळी बेंबीच्या वर जाते. आठव्या महिन्यात वरील सर्व लक्षणे असतात आणि गर्भाशयाची पातळी उरोस्थीच्या (छातीच्या मध्यरेषेवरच्या चपट्या हाडाच्या) खाली सु. ५ सेंमी. असते. नवव्या महिन्यात ही पातळी उरोस्थीच्या खालच्या टोकाला जाऊन भिडते.

पूर्ण दिवस भरत आले की, एक दिवस अचानक गर्भाचे डोके खाली कटिर भागात उतरते. गर्भाशयाचा आकार लहान होतो, त्याची पातळी पुन्हा खाली येते आणि गर्भवतीला एकदम हलके वाटू लागते. ही क्रिया पहिलटकरणीत नवव्या महिन्याच्या मध्यावर (प्रसूतीच्या आधी तीन आठवडे) घडते. त्यानंतरच्या सगळ्या खेपांच्या वेळी ही क्रिया प्रसूतिवेदना सुरू झाल्यावर घडते.

विशेष काळजी : गर्भारपणी निरोगी स्त्रीच्या शरीरातील अंतःस्रावी (ज्यांचा स्राव नलिकेवाटे अगर छिद्रातून न स्रवता सरळ रक्तात मिसळला जातो अशा) ग्रंथी व इतर इंद्रिये आपआपली कामे जास्त वेगाने करीत असतात. त्यामुळे या अवस्थेत गरोदर स्त्री अधिक टवटवीत दिसते. तरीसुद्धा सर्वसामान्यपणे आहार, व्यायाम, विश्रांती इ. बाबतींत विशेष काळजी घेणे आवश्यक असते. रोजच्या आहारात प्रथिने, वसामय (स्‍निग्ध) पदार्थ, पिष्ठ, लवणे, जीवनसत्त्वे इ. आवश्यक घटक भरपूर प्रमाणात पाहिजेत. अन्न साधे, सहज पचेल असे, पण पौष्टिक असावे. पालेभाज्या, मोड आलेल्या कडधान्यांच्या (वाफलेल्या) उसळी, कच्च्या कोशिंबिरी, फळे इ. भरपूर प्रमाणात घ्यावीत.तेलकट, तळकट, गरम मसाला आणि झणझणीत तिखट जेवणात असू नये. कडक चहा अगर कॉफीसारखी उत्तेजक पेये फार घेऊ नयेत. यांखेरीज गर्भाच्या वाढीसाठी लोह, कॅल्शियम (विशेषत: पहिल्या सात महिन्यांपर्यंत) आणि जीवनसत्त्वे ही जास्त प्रमाणात लागतात. आहारातून याचा योग्य तो पुरवठा होत नसेल, तर हे घटक असलेल्या गोळ्या घ्याव्यात. मांसाहारी गर्भवतीने डॉक्टरच्या सल्‍ल्याने त्या आहाराचे प्रमाण ठरवावे. अतिरिक्त (वाजवीपेक्षा जास्त) प्रमाणात मांसाहार घेतल्यास मूत्रपिंडांवर ताण पडून लघवीत दोष निर्माण होण्याचा धोका असतो. योग्य आहार आणि भरपूर पाणी घेतल्याने गर्भारपणी होणारे मलावरोध, पांडुरोग (ॲनिमिया), सांधेदुखी, हाडांचा ठिसूळपणा आणि त्यातून निर्माण होणारे अस्थिमार्दवासारखे रोग, मूत्रपिंडाचे रोग इ. अनेक व्याधी टाळता येतात.

गर्भवतीने आपली नित्याची कामे करण्यास हरकत नाही. पण जड वजन उचलणे आणि फार शारीरिक श्रम होतील अशी कामे टाळावीत. विशेषत: पूर्वी जर गर्भपात झाले असतील, तर अशा गर्भवतीने फार काळजी घ्यावी. सायकलवर बसणे उड्या मारणे टेनिस, बॅडमिंटन खेळणे शिवणाच्या पायमशिनवर फार वेळ बसणे अशा गोष्टी टाळाव्यात. रोज सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरायला जावे. गर्भवतीला रोज रात्री कमीत कमी आठ तास तरी शांत झोप मिळाली पाहिजे. दुपारीही एक तासभर तिने स्वस्थ पडून रहावे. पुष्कळ वेळा पायांच्या पोटर्‍यांत गोळे येण्याने, अगर गर्भाच्या वाजवीपेक्षा जास्त हालचालीने झोपेत अडथळा येतो.

गर्भारपणी– विशषतः शेवटच्या दोन महिन्यांत– स्तनांची काळजी घेणे आवश्यक आहे. स्तनाग्रे रोज साबणाने स्वच्छ धुवावीत, हलक्या हाताने पुढे ओढावीत व त्यांना व्हॅसलीन लावून ठेवावे. असे केल्याने प्रसूतीनंतर मुलाला अंगावर पिणे सुलभ जाते आणि त्या काळात स्तनांना चिरा पडत नाहीत.

गर्भवतीचे वजन गर्भाच्या वाढीबरोबर नियमित वाढत राहिले पाहिजे. पण नऊ महिन्यांच्या काळात ते १० किग्रॅ. वर वाढूनही उपयोगी नाही. एकाएकी वजन वाढणे ही (१) उल्बद्रव (गर्भाभोवतील एका पातळ आवरणात असणारा द्रव) वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात वाढणे, (२) जुळे गर्भ, (३) मूत्रपिंडाचे विकार यांची संभाव्य लक्षणे होत.

गर्भारपणी लैंगिक संबंध शक्यतो टाळावेत. विशेषत: शेवटचे तीन महिने पृथक्‌शय्या असावी.


विकृती व तक्रारी : मूळची प्रकृती निरोगी असली आणि गर्भ राहिल्यानंतर कितीही काळजी घेतली, तरी कित्येक वेळा नवीन तक्रारी उद्‌भवण्याचा संभव असतो. त्यासाठी गर्भधारणा काळात सातव्या महिन्यापर्यंत दर महिन्याला नियमित वैद्यकीय तपासणी करवून घेऊन त्यांच्या सल्‍ल्याप्रमाणे वागावे. शेवटच्या तीन महिन्यांत दर पंधरा दिवसांनी तपासणीसाठी जावे. अगदी आवश्यक असल्याशिवाय क्ष-किरण परीक्षा टाळावी.

गर्भारपणी अनेक लहानमोठ्या तक्रारी उद्‌भवतात. त्यांपैकी मलावरोध, अपस्फीत नीला (लांब, फुगीर आणि वेड्यावाकड्या शिरा), मूळव्याध, धुपणी, पायांच्या पोटऱ्यांना गोळे येणे, पायांवर सूज येणे, अपचन होणे, छातीत जळजळणे या प्रमुख तक्रारी असतात.

मलावरोध झाला असताना कुठच्याही प्रकारचे कडक रेचक घेऊ नये. मनुका, सोनामुखी, मिल्क ऑफ मॅग्‍नेशिया, द्रव पॅराफीन यांसारखी सौम्य औषधे घ्यावीत व आहारात पालेभाज्या, फळे घ्यावीत. झोपताना व सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यावे. इतर तक्रारींवर डॉक्टरांच्या सल्‍ल्याने उपचार करावेत. या तक्रारींचे स्वरूप सौम्य असते.

पण पुष्कळ वेळा तीव्र स्वरूपाची आणि वेळीच लक्ष न दिले, तर गंभीर रूप धारण करणारी दुखणी निर्माण होतात. त्यांतील प्रमुख पुढीलप्रमाणे आहेत.

तीव्र स्वरूपाच्या उलट्या : सु. ५० टक्के स्त्रियांत पहिल्या तीन महिन्यांत उलट्यांचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी गर्भवतीने दिवसातून दोनच वेळा जेवण्याऐवजी वरचेवर आणि थोडे थोडे खावे. विशेषतः पाव, बिस्किटे, भाकरी यांसारखे कोरडे पदार्थ खावेत. खाण्याच्या आधी व नंतर थोडा वेळ पडून रहावे. जेवणानंतर उलट्या होत असतील, तर खाण्याचा सोडा अगर सोडामिंटच्या गोळ्या घ्याव्यात. अशा उलट्यांवर ब गटातील जीवनसत्त्वे असलेली औषधे गुणकारी ठरतात. आहारात अम्‍ल पदार्थ कमी झाल्यास अपचन होते. अशा वेळी लिंबाचे सरबत घ्यावे. काही वेळा या उपचारांनी उलटी थांबत नाही. प्रमाण वाढत राहते. पोटात पाणीसुद्धा ठरत नाही. डोकेदुखी सुरू होते. झोप येत नाही. अशक्तपणा येतो. तापमान कमी होते. लघवीचे प्रमाण फारच कमी होते. त्यात श्वेतक (एक प्रकारचे प्रथिन, अल्‍ब्युमीन) दिसू लागते. रक्तदाब कमी होतो. नाडी जलद होते. अशा अवस्थेत स्त्रीला रुग्‍णालयातच ठेवणे योग्य ठरते. उलट्यांच्या अशा गंभीर स्वरूपात आहार बंद ठेवून, नीलेवाटे द्राक्षशर्करा (ग्‍लुकोज)- लवण द्रावण (सलाइन) तसेच ब आणि ब जीवनसत्वयुक्त औषधे देतात. काही वेळेस या उपायांचासुद्धा फारसा परिणाम होत नाही. क्वचित गर्भ काढून टाकणे हाच एक उपाय असतो.

श्वेतकमूत्रता : (मूत्रातून अल्‍ब्युमीन जाणे). गर्भवती अवस्थेत सगळ्याच इंद्रियांवर विशेषत: मूत्रपिंड, हृदय, यकृत यांवर अधिक ताण पडतो व त्यातून त्या त्या इंद्रियांच्या विकृती निर्माण होतात. मूत्रपिंडावर फाजील ताण पडला, तर मूत्रोत्सर्गाचे प्रमाण कमी होते व त्यात श्वेतक जाऊ लागते. विशेषत: सहाव्या महिन्यापासून या ‘श्वेतकमूत्रते’ची लक्षणे दिसू लागतात. पायांवर सूज येते. सकाळच्या वेळी डोके जड होते. ही लक्षणे दिसू लागताच लघवी व रक्तदाब यांची तपासणी करून घ्यावी. सुरुवातीच्या उपचारात भरपूर पाणी प्यावे, त्याचप्रमाणे आहारात शक्यतो सगळे द्रव पदार्थ (सूप वगैरेंसारखे), ताक, बार्लीचे पाणी घ्यावे. अधूनमधून सौम्य रेचक (विशेषतः मॅग्‍नेशियम सल्फेटासारखे) घ्यावे. त्यांखेरीज कॅल्शियम आणि ब जीवनसत्त्वयुक्त औषधे अगर अंतःक्षेपणे (इंजेक्शने) आणि भरपूर विश्रांती या उपचारांनी हा दोष नाहीसा होतो. कित्येक वेळा काही दिवसांपर्यंत रुग्‍णालयात राहणे जरूर असते.

पण यांबाबतीत निष्काळजीपणा झाला आणि श्वेतकमूत्रता वाढत गेली तर त्यातून (१) गर्भिणी विषबाधा नावाची विकृती उद्‍भवते, (२) कित्येक वेळा मूत्रपिंडे कायमची अधू होतात किंवा (३) काही वेळा गर्भ गर्भाशयातच मृत होतो.

गर्भिणी विषबाधा : (एक्लाम्पशिया). गरोदर काळात उद्‌भवणाऱ्या सर्व विकृतींत ‘गर्भिणी विषबाधा’ ही विकृती अतिशय गंभीर स्वरूपाची आणि तितकीच धोक्याची असते. या विकृतीत रोग्याला झटके येतात, रक्तदाब वाढतो (निरोगी गर्भवतीचा रक्तदाब १२०/८० असतो), तत्पूर्वी डोके दुखते (विशेषतः कपाळ दुखते), पायावर, तोंडावर, हातावर व मग सगळ्या शरीरावर अशा क्रमाने सूज येते आणि वाढत जाते. लघवीचे प्रमाण फारच कमी होते. या प्राथमिक अवस्थेत काही उपचार झाले नाहीत तर मग झटके (फिट्‌स) सुरू होतात.

गर्भिणी विषबाधेच्या प्राथमिक अवस्थेत उपचार करताना पुढच्या धोक्याची अवस्था येऊ नये म्हणून प्रतिबंधक उपचारावर भर ठेवणे आवश्यक असते. वर श्वेतकमूत्रतेवर सांगितलेले उपचार हेच प्राथमिक अवस्थेतील उपचार होत. शिवाय रोजच्या रोज लघवीचे प्रमाण मोजणे, त्याची तपासणी करणे, रक्तदाब कमी करणे हे प्रमुख उपचार होत. लघवीचे प्रमाण वाढविण्यासाठी औषधे दिली जातात. रोजचे लघवीचे प्रमाण वाढू लागले, त्यातील श्वेतक कमी होऊ लागले, रक्तदाब हलके हलके उतरू लागला म्हणजे निश्चित सुधारणा होत आहे, धोका टळला, असे समजावयास हरकत नाही.

या अवस्थेची प्राथमिक लक्षणे जाणवूनही (गरोदरपणी हे असेच होते असे मानून) तज्ञाकडून तपासणी करवून घेण्याकडे दुर्लक्ष झाले, तर मग ही विकृती विकोपाला जाऊन झटके सुरू होतात. काही वेळेला पूर्व अवस्थेतली लक्षणे आणि झटके एकदम सुरू होतात. हे झटके मोठे वैशिष्ट्यपूर्ण आणि सूचक असतात. चेहऱ्याचे स्नायू ताठतात. डोळ्यांची बुबुळे फिरतात. हातापायांना आचके येतात आणि मग पाहता पाहता सगळ्या शरीराला आचके येतात व सगळे स्‍नायू ताठ होतात. चेहरा निळसर पडतो. दातखिळी बसते, जीभ दातखिळीत सापडते. ही अवस्था तीन-चार मिनिटे टिकते. त्यानंतर झटके थांबतात. सगळे स्‍नायू ढिले पडतात, श्वासोच्छ्‌वास घोरल्यासारखा होतो. दातखिळी सुटते. जीभ चावल्यामुळे रक्तमिश्रित फेसाळ लाळ गळू लागते. गर्भिणी बेशुद्ध पडते. अशा वेळी रक्तदाब बराच वाढलेला २५० मिमी./ ११० मिमी. पर्यंत चढलेला असतो. तापमानही ३८° ते ४०° से. पर्यंत चढते. लघवीचे प्रमाण खूप कमी होते. मूत्रपिंडाची कार्यक्षमता अगदी क्षीण होते. या विकृतीत पुष्कळ वेळा यकृत बिघडते आणि काविळीची लक्षणे दिसू लागतात. झटक्यांचा मेंदूवर तात्पुरता परिणाम होतो. क्वचित कायमचा होतो आणि विस्मृती जडते. हे झटके गरोदरपणी तर केव्हा प्रसूतीच्या वेळी अगर क्वचित प्रसूतीनंतर लगेच येतात.

या विकृतीचे स्वरूप तीव्र असले तर रोगी दगावतो. हा मृत्यू विविध कारणांनी येतो. (१) झटक्यानंतरच्या बेशुद्धावस्थेत रक्तमिश्रित लाळ श्वासनलिकेत उतरते आणि गुदमरून मृत्यू येतो. (२) कधीकधी मेंदूत रक्तस्राव होतो त्यामुळे रोगी दगावतो. या विकृतीच्या गंभीर अवस्थेत गर्भ बहुधा आतच मृत होतो.

झटके सुरू होताच जीभ चावली जाऊ नये म्हणून चमचा अगर तत्सम कठीण पदार्थ कापसात वा कपड्यात गुंडाळून दातांमध्ये ठेवावा. डोके एका बाजूला कलते ठेवावे, म्हणजे लाळ मागे घशात न उतरता बाहेर पडून जाईल. झटक्यांची तीव्रता कमी करण्यासाठी मॉर्फीया, क्लोरल हायड्रेट, पोटॅशियम ब्रोमाइड यांसारखी गुंगीची औषधे देतात. औषधोपचारांनी या अवस्थेत सुधारणा झाली, गर्भाची स्थिती  चांगली असली तरी सतत डॉक्टरच्या नजरेखाली  राहणे अत्यंत आवश्यक ठरते.

उपचारांचा इष्ट तो परिणाम होत नसेल, तर मात्र ताबडतोब प्रसूती होण्यासाठी कृत्रिम उपाय योजावे लागतात. काही वेळेला पोटावर शस्त्रक्रिया करून मूल काढावे लागते आणि आईचा जीव वाचवावा लागतो. गर्भिणी विषबाधा, श्वेतकमूत्रता या विकृती पहिलटकरणीत विशेष प्रमाणात दिसतात. अलीकडे गरोदरपणी वैद्यकीय तपासणी करवून घेण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे, ती अत्यंत इष्ट अशीच आहे. त्यामुळे गरोदरपणी निर्माण होणाऱ्या लहानमोठ्या सगळ्या तक्रारी, संभाव्य धोके टाळता येतात. वेळीच उपचार मिळतात आणि म्हणूनच अलीकडे गर्भिणी विषबाधेचे प्रमाण बरेच झाले आहे. पण एकदा या विकृती झालेल्या असल्या की, पुढच्या खेपी पुन्हा तीच अवस्था उद्‍भवू नये (तशी शक्यता असते) म्हणून दुसऱ्या खेपेला सुरुवातीपासूनच तज्ञाच्या देखरेखीखाली राहणे आवश्यक असते.

रक्तस्राव : गर्भारपणी कधी कधी रक्तस्राव होतो आणि मग रक्तस्रावाच्या कमीजास्त प्रमाणानुसार काही वेळेला धोका निर्माण होण्याची परिस्थिती उद्‌भवते. गर्भारपणी सहा महिन्यांपूर्वी रक्तस्राव झाला तर ते गर्भापाताचे सूचक चिन्ह मानावे व त्यानुसार उपचार करावेत. पण सातव्या महिन्यानंतर जर रक्तस्राव (प्रसूतिपूर्व रक्तस्राव) झाला, तर मातेच्या आणि गर्भात वाढत असलेल्या बालकाच्या दोघांच्याही जीविताच्या दृष्टीने ही परिस्थिती धोकादायक असते. म्हणून अशा रक्तस्रावाचा प्रकार पारखून मग त्याप्रमाणे रक्तस्राव थांबण्याचे ताबडतोब उपाय करावे लागतात. या रक्तस्रावाचे कारण गर्भाशयाच्या आतल्या बाजूस घुमटाकारी भागात (बुघ्नात) जेथे वार (अपरा) वाढलेली आणि चिकटलेली असते, तिथून तिचा काही भाग निखळतो आणि त्या निखळलेल्या  भागातून हा रक्तस्राव होऊ लागतो.

या रक्तस्रावाचे दोन प्रकार आहेत. (१) या प्रकारात वार नेहमीप्रमाणे गर्भाशयाच्या वरच्या घुमटाकारी बुघ्‍न भागात असते. काही कारणामुळे गर्भाशयाला बाहेरून धक्का बसला, जड वजन उचलण्याचा ताण पडला तर, त्याखेरीज श्वेतकमूत्रता या विकृतीत, मूत्रपिंडाच्या चिरकारी (दीर्घकालीन) रोगात वारेचा काही भाग निखळतो. तेथून रक्तस्राव सुरू होतो आणि तो योनिमार्गातून बाहेर येतो. अशा प्रकारच्या रक्तस्रावाला अपघाती रक्तस्राव असे म्हणतात. बहुतेक यात रक्तस्राव योनिमार्गातून बाहेर येत असल्यामुळे दिसू शकतो व त्यामुळे उपाययोजना त्वरित होऊ शकते. (२) कित्येक वेळा हा रक्तस्राव बाहेर न पडता आतल्या आतच गोठून गर्भाशयातच राहतो. अशा रक्तस्रावाला प्रच्छन्न (अदृश्य) अपघाती रक्तस्राव असे म्हणतात. रक्तस्राव बाहेर मुळीच येत नाही. पण रोग्याच्या इतर लक्षणांवरून आत रक्तस्रावहोत आहे याचे निदान करावे लागते. ही लक्षणे पुढीलप्रमाणे असतात. रोग्याचा चेहरा, निस्तेज होत जाऊन पांढरे फटफटीत दिसताे. हातपाय गार पडतात. ओठ, नखे निळसर होतात. सर्वांगाला दरदरून घाम सुटतो. जीव कासावीस होतो. नाडी जलद चालते. क्वचित उलटी होते. गर्भाशयाची वरून तपासणी केली तर त्याचा आकार मोठा झालेला दिसतो. पोटाचे स्‍नायू ताठ होतात. तपासताना पोटावर पडणारा हाताचा हलका दाबही रोग्याला सहन होत नाही. गर्भाच्या हृदयाचे ठोके चांगले असूनही ऐकू येत नाहीत. त्वरित उपचार झाले नाहीत, तर अतिरिक्त रक्तस्रावामुळे गर्भवती दगावते.

रक्तस्राव पहिल्या प्रकारचा आणि अल्प प्रमाणात असेल, तर रोग्याला संपूर्ण विश्रांती घ्यावी. झोपवून ठेवावे. घाबरलेले मन स्वस्थ करण्यासाठी सौम्य शांतक औषधे अगर जरुरीप्रमाणे शायक (झोप आणणारी) सौम्य औषधे घ्यावीत. कॅल्शियम, ग्‍लुकोज त्याचप्रमाणे रक्तस्राव बंद करणारी औषधे घ्यावीत. रक्तस्राव बंद होण्यासाठी योनिमार्ग कधीही धुऊ नये. त्याचप्रमाणे कडक रेचक अगर बस्ती देणे टाळावे. कारण त्यामुळे गर्भाशयाची आकुंचने सुरू होऊन अकाली प्रसूती होण्याचा धोका असतो. एवढ्या उपायांनी रक्तस्राव थांबला नाही अगर जास्त प्रमाणात होऊ लागला अगर प्रसूती वेदना सुरू झाल्या, तर रोग्याला त्वरित रुग्‍णालयात हलवावे. दिवस पूर्ण भरलेले असतील, तर अशा वेळी कृत्रिम उपायांनी प्रसूती लवकर करता येते व पुढचा धोका टाळता येतो. पण अशा वेळी रक्तस्राव होताच डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बहुतेक वेळी अशा गर्भिणीला त्वरित रुग्‍णालयात नेणे फायद्याचे ठरते.

रक्तस्राव जेव्हा प्रच्छन्न असतो तेव्हा रक्त गर्भाशयात गोठून राहते, तेव्हा कृत्रिम उपायांनी लवकर प्रसूती करणे धोकादायक ठरते. अशा वेळी पोटावर शस्त्रक्रियाच करावी लागते.


गर्भवाढीतील विकृती : गर्भारपणी क्वचित वेळी गर्भवाढीत विकृती निर्माण होते. अशा वेळी गर्भवाढीत धारणेच्या सुरुवातीला मासिक पाळी चुकणे, डोहाळे लागणे, उलट्या होणे वगैरे नित्याची लक्षणे होतात. चौथ्या अगर पाचव्या महिन्यात मधूनमधून योनिमार्गे रक्तस्राव होतो. पोटाचा आकार गर्भारपणाच्या काळाच्या मानाने मोठा असतो. बाह्य तपासणीत गर्भाचे अवयव हाताला लागत नाहीत. गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत नाहीत. म्हणजेच गर्भ आत असल्याची कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळून येत नाहीत. पण गर्भाशयाचा आकार मात्र नेहमीच्या गरोदरपणासारखा वाढत जातो. हातपायांवर सूज येते. अधूनमधून रक्तस्राव होतच असतो. त्या रक्तस्रावात द्राक्षासारखे बारीक बारीक फुगे आढळतात. या विकृतीला द्रवार्बुदीय (मोलर) गर्भधारणा म्हणतात. गर्भाशयात गर्भाऐवजी द्राक्षाच्या घडासारखा गोळा वाढत असतो. या विकृतीचे निदान झाल्यावर तो काढून टाकून गर्भाशय मोकळे करावे लागते.

गर्भधारणा नेहमी गर्भाशयात होते. पण क्वचित ती गर्भाशयात न होता ती उजव्या अगर डाव्या अंडवाहिनीमध्ये (स्त्री बीजांड वाहून नेणाऱ्या नलिकेमध्ये) होते. असा अंडवाहिनीत राहिलेला गर्भ पुऱ्या महिन्यांपर्यंत वाढू शकत नाही. गर्भधारणा झाल्याबरोबर-सहाव्या आठवड्यातच-याची विशेष लक्षणे सुरू होतात. ओटीपोटात एका बाजूला (ज्या बाजूच्या अंडवाहिनीत गर्भधारणा झाली असेल त्या बाजूला) अधूनमधून विलक्षण दुखू लागते. थोडा थोडा रक्तस्राव होऊ लागतो. हा स्राव काळपट असतो. कधीकधी अंडवाहिनी फुटून रक्तस्रावाच्या गाठी बनतात. शस्त्रक्रिया करून तो भाग काढून टाकणे हाच यावर उपचार आहे.

क्वचित वेळी अंडवाहिनीतील गर्भ नलिकेच्या बाहेरच्या तोंडातून सुरक्षितपणे बाहेर पडतो आणि तेथेच आसपास सहज मिळेल त्या भागाला– विशेषतः गर्भाशयाची बाहेरची बाजू, आतडे, पर्युदर (उदरातील इंद्रियांवरील पडद्यासारखे आवरण), विस्तृतबंध (गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंस असलेली पर्युदराची बंधनात्मक दुहेरी घडी)– यांपैकी कशाला तरी चिकटून वाढू लागतो. काही वेळेला पुर्‍या महिन्यांचे बालक गर्भाशयात आहे की, बाहेर आहे याचे निदान करणे पुष्कळ वेळा जड जाते. गर्भाशयाची आतून तपासणी केली तर, गर्भाशयाची छोटी पिशवी हाताला लागते. क्ष-किरण परीक्षेने निश्चित निदान होऊ शकते.

गर्भधारणेच्या या प्रकारात वारेचा भाग निखळून आतल्या आत फार रक्तस्राव होतो व जीवाला धोका निर्माण होतो. या प्रकारात पुरे महिने होऊन गेले, तरी आपोआप प्रसूती होत नाही अगर प्रसूतीची काही लक्षणे दिसून येत नाहीत आणि याच कारणासाठी गर्भवती स्त्री डॉक्टरकडे तपासणीसाठी जाते. बहुधा अशा तपासणीतच या प्रकारची गर्भधारणा गर्भाशयाबाहेर आहे हे प्रथम कळून येते. अशा प्रकारे वाढलेले बालक आत कधी जिवंत असते, तर कधी मृत झालेले असते. पोटावर शस्त्रक्रिया करून बालक बाहेर काढणे हात फक्त यावर एक उपाय असतो.

ज्या स्त्रियांना हृदयविकार, मूत्रपिंडाचे रोग, पांडूरोग किंवा यकृताची विकृती पूर्वी झालेली असेल अशा स्त्रियांनी गर्भारपणी कटाक्षाने अगदी सुरुवातीपासूनच काळजी घेणे आवश्यक असते.

हृदयविकार : गरोदरपणी सगळ्या इंद्रियांवर कामाचा ताण विशेष पडतो. हा ताण पेलण्यासाठी हृदयाच्या स्‍नायूंची तात्पुरती अधिवृद्धी (अवास्तव वाढ) होते. प्रसूतीनंतर पुन्हा ते पूर्वस्थितीला जातात. पण गरोदरपणापूर्वी आधी केव्हातरी हृदयाची विकृती जडलेली असेल, तर वाढत्या गर्भाचा ताण– विशेषतः सातव्या महिन्यानंतर– पेलण्याची शक्ती हृदयात उरत नाही. ते बंद पडते आणि मृत्यू अटळ होतो. अर्थात हृद्‌रोगाचा कुठला विशिष्ट प्रकार आहे आणि तो किती प्रमाणात आहे यावरच हा मृत्यूचा धोका अवलंबून असतो. हृद्‌रोगात विविध कपाटांच्या (झडपांच्या) जुन्या विकृती असतात. त्यांपैकी द्विदल-कपाटाचा (खंडात्मक भाग असलेल्या झडपेचा) संकोच हा प्रकार विशेष धोकादायक असतो. रोगी हृदयाची शक्ती वाढत्या महिन्यागणिक क्षीण होत जाते आणि त्याच्या कार्यशक्तीची कमाल मर्यादा संपली की ते विस्तारित होऊन बंद पडते. क्वचित प्रसूतीचे दिवस भरेपर्यंत अशा हृदयाने कसाबसा तग धरला, तरी प्रसूतीच्या वेळी कळा घेण्याच्या वेळी जो जादा ताण त्यावर पडतो, गर्भाशयाची जी आकुंचने होत असतात, त्यांमुळे रक्तदाब विशेषतः रोहिणीतील रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे प्रसूतीच्या दरम्यान मृत्यू येतो. काही वेळा अशी स्त्री प्रसूतीवेदनांतून बाहेर पडते, सुखरूप प्रसूत होते पण प्रसूती झाल्याबरोबर ताबडतोब मृत्यू येतो. याचे कारण प्रसूती दरम्यानचा कळा घेण्याचा ताण एकदम कमी होतो, रक्तदाब एकदम उतरतो व परिणामी हृदयाची क्रिया बंद पडते.

हृद्‌रोग असणाऱ्या गरोदर स्त्रीला डॉक्टरच्या सतत देखरेखीखाली ठेवणे आवश्यक असते. गरोदरपणी काळजी घ्यावी लागतेच, पण विशेषतः प्रसूतीच्या वेळी फार जपावे लागते. प्रसूती वेदना सुरू झाल्या की, रोग्याला हालचाल करू देऊ नये. हृदयावरचा ताण कमी करण्यासाठी गर्भाशयाची आकुंचने शक्यतो मंद करतात. भूल देऊन, चिमटे लावून सुटका करतात.

क्षय आणि उपदंश (गरमी) हे दोन संसर्गजन्य रोग म्हणजे गरोदर स्त्रीचे शत्रूच होत. केवळ मातेच्या प्रकृतीच्या दृष्टीने नव्हे, तर बालकाच्या जीविताच्या आणि त्याच्या भावी आयुष्याच्या दृष्टीनेही हे फार घातूक रोग आहेत.

उपदंश : उपदंशित मातेचा तिच्या गर्भात उतरलेला संसर्ग फार दूरगामी असतो. म्हणून हा रोग अधिक घातक आहे. गर्भावर या रोगाच्या होणाऱ्या परिणामाची कमीजास्त तीव्रता या रोगाचा संसर्ग केव्हा झाला यावर अवलंबून असते. गर्भधारणा होण्यापूर्वीच स्त्रीला जर हा रोग झालेला असेल, तर दर खेपी गर्भपात होतो. या गर्भपातांचे एक वेगळे वैशिष्ट्य असे की, हे गर्भपात दर खेपी वाढत्या महिन्यांचे होतात. सुरुवातीचे गर्भपात ३-३·५ महिन्यांचे, नंतरचे ४-६ महिन्यांचे, त्यानंतरच्या खेपी ७-८ महिन्यांचे अपुरे मृत बालक, त्यानंतरची खेप पुऱ्या महिन्यांची होते. पण बहुधा बालक मृतावस्थेतच जन्मते. जिवंत जन्मले तर थोड्या वेळाने ते मृत होते. जर जगले वाचले आणि निरोगी दिसेल, तरी चार ते सहा आठवड्यांत त्याच्यात उपदंशाची लक्षणे दिसू लागतात. काही वेळेला जन्मतः बालकाच्या सबंध शरीरावर लाल पुटकुळ्या दिसतात. उपदंशित मातेचे बालक नेहमीच उपदंशित असते.

या रोगाचा संसर्ग जर गर्भधारणेच्या वेळी अगर गर्भधारणा झाल्यानंतर सुरुवातीच्या महिन्यांत झाला, तरीसुद्धा बालकात हा रोग उतरतो. पण जर गर्भधारणेच्या शेवटच्या दोन-तीन महिन्यांत संसर्ग झाला, तर मात्र बालक या संसर्गापासून आपोआप बचावू शकते.

कुठल्याही अन्य कारणाशिवाय गर्भपात झाले, तर ताबडतोब मातापिता या दोघांचीही उपदंशासाठी असलेली विशिष्ट रक्त तपासणी करवून घ्यावी. वेळीच जर उपचार केले, तर हा रोग नाहीसा होतो [→ उपदंश].

क्षय : क्षय झालेल्या स्त्रीने तो रोग संपूर्णपणे  बरा होईपर्यंत गर्भधारणा टाळावी. गरोदरपणी त्रास झाला नाही, तरी प्रसूतीनंतर हा रोग विशेष बळावतो. यात गर्भपाताची भीती नसते. दिवस पुरे जातात. जन्मलेले मूल सर्वसाधारणपणे चांगले निरोगी असते. काही वेळेला मात्र बालक गर्भात असतानाच त्याला या रोगाचा रक्तावाटे संसर्ग होतो. पण सामान्यतः निरोगी बालकाला क्षयी मातेजवळ सतत ठेविल्यामुळे, तिच्या स्तनपानामुळे संसर्ग होतो. म्हणून बालकाला क्षयरोग झालेल्या मातेपासून जन्मत:च दूर ठेवावे. स्तनपान केव्हाही देऊ नये.

गर्भारपणी मातेचा हा रोग बळावला असेल, तर काही वेळेला गर्भ काढावा लागतो. पूर्व दिवस भरले असल्यास प्रसूती नेहमीप्रमाणे होऊ द्यावी [→ क्षयरोग].

पहा : ऋतुस्राव व ऋतुविकार गर्भपात गर्भाशय जनन तंत्र प्रसूतिविज्ञान वार स्त्रीरोगविज्ञान.

संदर्भ: 1. Guttmacher, A. F. Pregnancy and Birth: Book for Expectant Parents, New York, 1957.

2. Hylten, F. E. Leitch, I. The Physiology of Human Pregnancy, 1964.

3. Miller, J. S. Childbirth: A Manual of Pregnancy and Delivery, New York, 1963.

4. Rovinsky, J.J. Guttmacher, A. F. Ed., Medical, Surgical and Gynecologic Complications of Pregnancy, Baltimore, 1965.

5. Weiser, E. Pregnancy: Conception and Heredity, New York, 1965.

क्षेत्रमाडे, सुमति