गर्भाधान संस्कार : प्रथमगर्भाच्या आधानासाठी म्हणजे विवाहानंतर ऋतू प्राप्त झाल्यानंतर प्रथमसंभोगाच्या प्रसंगी हिंदू जो धार्मिक विधी करतात, त्यास गर्भाधान संस्कार म्हणतात. हा क्षेत्रसंस्कार असल्यामुळे प्रथम एकदाच करावा, प्रत्येक गर्भाच्या वेळी करू नये. धर्मशास्त्रात त्रैवर्णिकांकरिता सोळा संस्कार सांगितले आहेत त्यांपैकी हा आद्य संस्कार आहे. गृह्यसूत्रे व स्मृतिग्रंथ यांतून या संस्काराचा उल्लेख आहे. स्त्री ऋतुस्नात झाल्यानंतर सोळा दिवसांपर्यंत शुभ दिवशी गर्भाधान संस्कार करावा. हा संस्कार करण्यात स्त्रीक्षेत्राचे शुद्धीकरण व सुप्रजानिर्मिती, असा दुहेरी उद्देश आहे. सुप्रजानिर्मितीची इच्छा असणाऱ्याने ऋतुकाली निषिद्ध तिथी व ग्रहणासारखे दुष्ट काल सोडून स्त्रीसमागम करावा, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.
जोशी, रंगनाथशास्त्री