गर्भधारणा व गर्भबाहुल्य : अंड (स्त्री-प्रजोत्पादक पेशी) आणि शुक्राणू (पुं-प्रजोत्पादक पेशी) यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. विविध प्राण्यांमध्ये गर्भधारणेचा काळ वेगवेगळा असतो. मानवामध्ये तो २९० दिवसांच्या आसपास असतो. कधीकधी एकाच वेळी एकापेक्षा अधिक गर्भ तयार होऊ शकतात. त्या प्रकाराला ‘गर्भबाहुल्य’ असे म्हणतात. प्रस्तुत नोंदीत मानवी गर्भधारणेचे आणि गर्भबाहुल्याचे वर्णन केले आहे. इतर प्राण्यांतील गर्भधारणेचे वर्णन भ्रूणविज्ञान नोंदीत केलेले आहे. अंडज प्राण्यांच्या गर्भधारणेचे वर्णन ⇨ अंडे या नोंदीत केलेले आहे.
प्रत्येक ऋतुचक्राच्या (एका मासिक पाळीपासून पुढच्या मासिक पाळीपर्यंतच्या काळाच्या) मध्यकाळी अंडाशयातून एक अंड बाहेर पडते व ते अंडवाहिनीमार्गे गर्भाशयाकडे जात असताना त्या वाहिनीच्या पार्श्वटोकापाशीच त्याची व शुक्राणूची गाठ पडून त्या दोघांच्या केंद्रकांचा (पेशींतील कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजांचा) संयोग झाला म्हणजे ‘गर्भधारणा’ अथवा ‘निषेचन’ (फलन) झाले असे म्हणतात. हा संयोग होताना अंड आणि शुक्राणूमध्ये अनेक भौतिक व रासायनिक बदल घडून येतात. शुक्राणूच्या संयोगामुळे अंडाच्या पुढील वाढीला प्रेरणा मिळते. अंडाच्या बाह्य स्तरातील कणीय (कणयुक्त) आणि पुटिका (सूक्ष्म पिशवीसारख्या भागातील) द्रव्याची हालचाल सुरू होऊन त्याच्या विद्युत्विसरण (एकमेकांत मिसळणे) आणि श्यानता (दाटपणा) या गुणधर्मांत बदल होऊन तेथे अनेक एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिनयुक्त पदार्थ) तयार होतात.
अंडाचा स्पर्श होताच शुक्राणूच्या डोक्यावरील अग्रपिंडाचे (एक प्रकारच्या उंचवट्याचे) विघटन होऊन त्याचे तंतूत रूपांतर होते व तो तंतू अंडाच्या बाह्यस्तराचा भेद करून अंडात शिरतो. जेथे शुक्राणू अंडात प्रवेश करतो तेथे उंचवटा निर्माण होऊन शुक्राणूचा अग्रपिंड अंडात शिरतो. शुक्राणूचा उर्वरित मध्य आणि पुच्छ भाग अपकृष्ट (ऱ्हास) होऊन त्यांचे अभिशोषण होते.
शुक्राणू व अंडाणू यांच्या केंद्रकांचा संयोग होऊन त्या दोघांचेही गुण गर्भात उतरतात. तेच आनुवंशिक गुणधर्म होत.
प्रत्येक प्राण्याच्या कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) विशिष्ट संख्या असलेली गुणसूत्रे (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक) असतात. मानवी कोशिकांमध्ये त्यांची संख्या ४६ असते. यांपैकी ४४ सामान्य व दोन लिंग लक्षणे असलेली गुणसूत्रे असतात. पुरुषामध्ये दोन लिंग गुणसूत्रांपैकी एक X प्रकारचे व दुसरे Y प्रकारचे (X पेक्षा आकारमानाने लहान असलेले) गुणसूत्र असते. स्त्रीमध्ये दोन्ही लिंग गुणसूत्रे X प्रकारचीच असतात. अंड आणि शुक्राणू यांचा विकास होत असताना एकूण गुणसूत्रांची संख्या निम्मी होते [→ भ्रूणविज्ञान]. म्हणजे प्रत्यक्ष गर्भधारणेच्या वेळी अंड आणि शुक्राणूमध्ये तेवीसच गुणसूत्रे असतात. त्यांपैकी अंडाच्या गुणसूत्रांमध्ये २२ साधारण (सामान्य) गुणसूत्रे आणि एक X गुणसूत्र असते. शुक्राणूच्या गुणसूत्रांमध्ये २२ सामान्य व एक Y किंवा २२ सामान्य व एक X अशी मिळून २३ गुणसूत्रे असतात. गर्भधारणेच्या वेळी अंडज २३ आणि शुक्राणुज २३ अशी गुणसूत्रे एकत्र येऊन मानवी वैशिष्ट्याप्रमाणे भ्रूणामध्ये ४६ गुणसूत्रे तयार होतात व युग्मनज (अंड आणि शुक्राणू यांच्या संयोगाने तयार होणारी कोशिका) तयार होतो. युग्मनज प्रथम एक-कोशिकीय असून ह्या कोशिकेच्या ४,८,१६ अशा विभाजनाने कोशिकांची संख्या त्वरेने वाढत जाते आणि त्यापासून भ्रूणाचा मूलपुंज तयार होतो. शुक्राणूच्या गुणसूत्रांपैकी जर X गुणसूत्राचा संयोग अंडज गुणसूत्राशी झाला, तर उत्पन्न होणारी प्रजा स्त्रीलिंगी होते जर शुक्राणूच्या गुणसूत्रांपैकी Y गुणसूत्राचा संयोग झाला, तर प्रजा पुल्लिंगी होते. मूलपुंजापासूनच पुढे भ्रूण आणि गर्भ तयार होऊन त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रसूती होऊन मूल जन्माला येते. ही वाढ कसकशी होत जाते ते भ्रूणविज्ञान या नोंदीत विस्ताराने दिलेले आहे. पृष्ठवंशी आणि स्तनी प्राण्यांमध्ये जशी गर्भाची वाढ व विकास होतो तशीच वाढ व विकास मानवी गर्भाचा होत असतो.
गर्भबाहुल्य : एकाच वेळी एकापेक्षा अधिक गर्भ गर्भाशयात विकसित होणाऱ्या अवस्थेस गर्भबाहुल्य म्हणतात. बहुतेक सस्तन प्राण्यांमध्ये एका वेळी जन्मणाऱ्या अपत्यांची संख्या ठराविक असते. ही संख्या प्राण्याचा शरीराकार, गर्भधारणाकाल, सर्वसाधारण आयुर्मान, गर्भाशय रचना व चुचुकसंख्या (स्तनाग्रांची संख्या) यांवर अवलंबून असते. ज्या प्राण्यांमध्ये गर्भधारणाकाल १५० दिवसांपेक्षा जास्त असतो, ज्यांच्या माद्यांत दोन स्तन असतात व एकच साधे गर्भाशय असते. त्यांच्यामध्ये एका वेळी बहुधा एकच गर्भ असतो. मानवासकट सर्व वानरवर्गीय प्राण्यांचा समावेश यामध्ये होतो. कुत्रा, मांजर, डुक्कर यांच्यासारख्या लहान आकाराच्या प्राण्यांत गर्भबाहुल्य नेहमीच आढळते. ऑपॉस्सम नावाच्या उत्तर अमेरिकेतील जंगली प्राण्याला एका वेळी १८ अपत्ये होतात. याउलट गाय, उंट व घोडा या प्राण्यांमध्ये बहुधा एकच गर्भ असतो.
गर्भबाहुल्य आनुवंशिक असावे असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. काही घराण्यांतून जुळी किंवा तिळी अधिक आढळतात. मानवामध्ये गर्भबाहुल्याचे प्रमाण फार कमी आढळते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा व ग्रेट ब्रिटन या देशांत जुळ्यांचे प्रमाण दर ८३·४ प्रसवांत १ असे आहे. ते सबंध जगामध्ये ७० : १ ते १४५ : १ एवढे आहे. दोनापेक्षा अधिक गर्भ उदा., तिळे, चतुष्क, पंचक इ. फारच कमी प्रमाणात आढळतात. तिळ्यांचे प्रमाण ७,८६९ प्रसवांत १, चतुष्कांचे प्रमाण ६,५८, ५०२ प्रसवांत १, तर पंचकांचे ५,७०,००,००० प्रसवांत १ एवढे म्हणजे जवळजवळ असंभवनीयच असते.
सर्वसाधारण जुळे दोन प्रकारचे असते : (१) एकांडज किंवा एकयुग्मजीय व (२) द्विअंडज किंवा द्वियुग्मजीय. यांपैकी दुसरी संज्ञा अधिक योग्य आहे. कारण तीमध्ये माता-पित्यापासून येणाऱ्या आनुवंशिक घटकांचा समावेश दर्शविला जातो.
एकयुग्मजीय जुळी नेहमी समलिंगी असतात. ती एकाच अंडापासून तयार होतात. मात्र त्या अंडामध्ये दोन जनन कोष्ठ (गुणसूत्रांची संख्या निम्मी होण्यापूर्वी असणारे मोठे पिशवीसारखे केंद्रक) असणे आवश्यक असते. अशा जुळ्यांना ‘एकसम जुळे’ असेही म्हणतात. त्यांच्यामध्ये विलक्षण साम्य असते. त्यामुळे त्यांना एकमेकांपासून ओळखणेही कठीण असते. गर्भावस्थेत त्यांना एकच गर्भवेष्ट (गर्भाच्या भोवती असणारे दोनपदरी वेष्टण) असतो दोन उल्बीय (वारेच्या गर्भाकडील भागावर असलेले पारदर्शक, भक्कम, पातळ पडद्याचे) कोश (पिशव्या) असतात एकच परंतु मोठी अपरा (वार) असते व त्यांच्या अपरेतील रक्तवाहिन्यांची सरमिसळ झालेली असते (आ.१). एकसम जुळी केवळ बाह्यसदृश असतात असे नव्हे, तर त्यांचा रक्तगट एकच असतो व एकमेकांमध्ये ऊतक-प्रतिरोपण (शस्त्रक्रिया करून ऊतक म्हणजे कोशिकासमूह काढून दुसऱ्यामध्ये बसवून एकजीव करणे) किंवा अवयवप्रतिरोपण बहुधा यशस्वी होते.
गर्भाशयात एकसम जुळ्याच्या विकसनात विकृती उत्पन्न झाल्यास, ‘द्विराक्षस’, ‘सयामी जुळे’ इ. विकृत प्रकार प्रसवतात. द्विराक्षसासारखे अपसामान्य (नेहमीचे नसलेले) प्रकार सहसा जिवंत राहत नाहीत. सयामी जुळे हे नाव एका चिनी दांपत्यास सयाममध्ये झालेल्या जुळ्यावरून रूढ झाले आहे. हे पुल्लिंगी जुळे इ.स. १८११–७४ पर्यंत जिवंत होते. बर्मन सर्कसमध्ये एक नवल म्हणून ते दाखविण्यात येई. एन्ग व चांग अशी नावे असलेल्या या जुळ्यांनी लग्न केले होते व त्यांना एकूण २२ अपत्ये झाली होती. ते एकमेकांस कमरेजवळ जोडले गेलेले होते. दोघे दोन तासांच्या फरकाने मरण पावले. सयामी जुळी कमर, छाती आणि पोट यांपैकी एका ठिकाणी जोडलेली असतात. अनेक वेळा त्यांचे महत्त्वाचे अवयव म्हणजे जठर, आंत्रमार्ग (आतड्याचे मार्ग) किंवा यकृतही जोडलेले असतात. डोके जोडलेल्या सयामी जुळ्यांना ‘क्रेनिओपेगस’ म्हणतात आणि त्यांच्यामध्ये मस्तिष्कही (मेंदूही) जोडलेले असते.
द्वियुग्मजीय जुळे दोन अंड व दोन शुक्राणूंपासून तयार होते. एकयुग्मजीय जुळ्यांपेक्षा त्यांचे प्रमाण सहा पटींनी अधिक असते. त्यांची लिंगे बहुधा निरनिराळी असतात. द्वियुग्मजीय जुळ्यांमध्ये २५% दोन्ही मुलगे, २५% दोन्ही मुली व ५०% एक मुलगा व दुसरी मुलगी असते. त्यांना दोन स्वतंत्र अपरा असून रक्तपुरवठाही स्वतंत्र असतो. गर्भवेष्ट व उल्बीय कोश निरनिराळे असतात. अशा जुळ्यांना ‘भ्रात्रीय जुळी’ अशीही संज्ञा देतात.
जुळी मुले सर्वसाधारण मुलांपेक्षा गर्भावस्थेत आकाराने व वजनाने लहान असतात. मात्र दोघांचे मिळून वजन एका गर्भापेक्षा बहुधा अधिक असते. आनुवंशिकता व परिसर यांच्या मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचे संशोधन करण्याकरिता जुळ्यांचा अभ्यास फार उपयुक्त आहे. एकसम जुळी जन्मानंतर लगेच निरनिराळ्या परिस्थितींत वाढविल्यास त्यांच्या मानवी गुणवैशिष्ट्यांमध्ये फरक झालेला आढळतो. १९३४ मध्ये रशियन शास्त्रज्ञांनी एकसम जुळ्यांच्या अभ्यासास सुरुवात केली होती पण तो अपूर्णच राहिला.
तिळे व चतुष्क एकसम किंवा भ्रात्रीय असू शकतात. चतुष्क पाच प्रकारचे असू शकते
पंचक वरीलप्रमाणे १ ते ५ युग्मजीय असू शकते. १९३४ मध्ये कॅनडामधील डिऑन कुटुंबामध्ये जन्मलेले पंचक एकयुग्मजीय असावे असे अभ्यासानंतर ठरविण्यात आले. या पाच मुली होत्या व त्यांचे जन्मवेळीचे एकत्र वजन फक्त ६·०६७ किग्रॅ. होते. कॅनडियन लोकसभेने ठराव करून या पंचकाची राजाश्रित म्हणून देखभाल करण्याचे ठरविले. त्यांची राहण्याची, जेवण्याची तसेच इतर परिसरीय व्यवस्था एकसारखीच ठेवली होती. वैद्यक व जननशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करण्याचा त्यामागे उद्देश होता. एकाच व्यक्तीची डावी व उजवी बाजू ज्याप्रमाणे सारखी असत नाही, त्याप्रमाणे एकयुग्मजीय असूनही या पाच मुली सारख्या राहिल्या नाहीत. वाढत्या वयाबरोबर त्यांच्यामधील बारीकसारीक फरक स्पष्ट होत गेले. १० वर्षे सरकारी पाहुणचारानंतर त्या मातापित्याच्या ताब्यात देण्यात आल्या.
नोंद केलेल्या पहिल्या प्रमाणभूत ५३ पंचकांमध्ये फक्त तीनच एकयुग्मजीय असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या शंभर वर्षांत एकाच वेळी पाच मुले झाल्याच्या फक्त पन्नासच नोंदी अधिकृत मानलेल्या आहेत. त्यांपैकी फक्त सहाच पंचके जगली अशी नोंद आहे. काही षष्टके जन्मल्याची नोंद आहे. १९६७ मध्ये मेक्सिको शहरात गेनारो व टेरेसा सेपूल्व्हेदा या दांपत्यास एकाच वेळी चार मुली व चार मुलगे (अष्टक) झाल्याची नोंद आहे. परंतु त्यांपैकी एकही १४ तासांपेक्षा जास्त काळ जिवंत राहिले नाही.
गुरांमध्ये एक चमत्कृतिपूर्ण प्रकार आढळतो. दोन जुळ्या वासरांपैकी एक पुल्लिंगी व दुसरे परावर्तित वंध्य स्त्रीलिंगी असते. या दुसऱ्याला वंध्ययमी असे संबोधितात. गर्भावस्थेत एक पुल्लिंगी व एक स्त्रीलिंगी गर्भ सुरुवातीस असतात. विकसनकालामध्ये दोन्हींच्या अपरांची सरमिसळ होते व त्यामुळे त्यांच्या रक्तपुरवठ्याचे मिश्रण होते. त्यांचा परिणाम स्त्रीलिंगी गर्भाच्या जननेंद्रियाच्या विकृत वाढीत होतो व ते पुल्लिंगसदृश दिसू लागतात. ही जुळी नेहमी भ्रात्रीय प्रकारचीच असतात. पुल्लिंगी गर्भाचे स्त्रीलिंगीकरण कधीही होत नाही. एकसम जुळ्यांच्या विकसनाच्या वेळी एकमेकांच्या रक्तमिश्रणाचा लिंगावर परिणाम घडून येत नाही. कारण सुरुवातीपासूनच ती दोन्ही पुल्लिंगी किंवा दोन्ही स्त्रीलिंगी असतात.
ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.
“