कूरीतीव्हा : कूरीतीबा. ब्राझीलच्या पाराना राज्याची राजधानी. लोकसंख्या ६,१६,५४८ (१९६८). सोन्याच्या खाणीकरिता केंद्र म्हणून १६५४ मध्ये हे वसले परंतु विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जर्मन, इटालियन व स्लाव्ह आप्रवाशांनी राज्यातील शेती व बागा फुलविण्यात सुरुवात करीपर्यंत यास महत्त्व नव्हते. तेव्हापासून हे कॉफी चहाप्रमाणे वापरले जाणारे माते, लाकूड व पशुधन इत्यादींच्या निर्यातीचे तसेच कागद, फर्निचर, कापड, सिमेंट, आगपेट्या, तंबाखू इत्यादींचे केंद्र झाले आहे. १९५० नंतर येथे विद्यापीठ, ग्रंथालय, राजभवन वगैरे इमारती झाल्या. ९१४ मी. उंचीवर असल्याने येथील हवा शीतल व प्रसन्न असते.

शहाणे, मो. ज्ञा.