कूपर, सर ॲस्टली पॅस्टन : (२३ ऑगस्ट १७६८–१२ फेब्रुवारी १८४१). ब्रिटिश शस्त्रवैद्य व शरीररचनाशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म नॉरफोकमधील ब्रूक येथे झाला. सुरुवातीस कूपर यांनी शरीररचनाशास्त्राचे तज्ञ व प्रख्यात शस्त्रवैद्य जॉन हंटर यांच्या मार्गदर्शनाखाली व नंतर सेंट टॉमस हॉस्पिटलमध्ये अध्ययन केले. १७८९ मध्ये त्या विषयाचे प्रयोगनिर्देशक म्हणून त्यांची नेमणूक झाली. हेन्‍री क्लाइन या शस्त्रवैद्यांच्या हाताखाली शस्त्रक्रियेचा अभ्यास केल्यानंतर त्या विषयाचे अधिव्याख्याते म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८०० मध्ये त्यांची ‘गाय’ रुग्णालयात शस्त्रवैद्य म्हणून नेमणूक झाली.

ग्रसनी-कर्णनलिका (तोंड, नाक, घसा व कानाचा पडदा यांमध्ये संबंध प्रस्थापिणारी नलिका) बंद पडून येणाऱ्या बहिरेपणावर कर्णपटलाला छिद्र पाडण्याची यशस्वी शस्त्रक्रिया शोधिल्याबद्दल रॉयल सोसायटीने १८०२ मध्ये त्यांना कॉप्ली पदक दिले. रोहिणी विस्फार (रक्तवाहिनीचे वेज मधेच मोठे झाल्यामुळे रक्ताने भरलेली पिशवी तयार होणाऱ्या) रोगात रोहिणीबंधन शस्त्रक्रिया त्यांनी १८०८ मध्ये प्रथम केली. त्यांनी उदरस्थ महारोहिणीवरील (हृदयापासून निघणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीवरील) पहिली शस्त्रक्रिया १८१७ मध्ये केली. १८२० मध्ये चौथ्या जॉर्ज राजावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांना ‘सर’ हा किताब मिळाला. १८२७ व १८३६ मध्ये ते रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे अध्यक्ष होते व १८३० मध्ये रॉयल सोसायटीचे उपाध्यक्ष होते.

स्तनीय तंतुप्रधान प्रवर्धांना (स्तनावर झालेल्या तंतुमय निरुपयोगी वाढींना), उदर भित्तीतील आतील बाजूच्या प्रावरणीला (तंतुमय स्तराला) तसेच त्यांनी केलेल्या काही शस्त्रक्रियांना कूपर यांचे नाव दिले जाते.

कूपर यांनी लिहिलेले ॲनॉटमी अँड सर्जिकल ट्रिटमेंट ऑफ हार्निया (१८०४), डिसलोकेशन्स अँड फ्रॅक्चर्स (१८२२), ॲनॉटमी अँड डिसीझेस ऑफ द ब्रेस्ट (१८२९ – ४०) व ॲनॉटमी ऑफ द थायमस ग्‍लँड (१८३२) हे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. ते लंडन येथे मृत्यू पावले.

कानिटकर, बा. मो.