कुलू खोरे

कुलू : अधिकृत सुलतानपूर. हिमाचल प्रदेशातील कुलू जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ८,९६६ (१९७१). हे पठाणकोटपासून सु. २८३ किमी. पूर्वेस, १,२४० मी. उंचीवर बियास नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. बियास खोऱ्याच्या या भागाला कुलू खोरे म्हणतात. हे अतिशय निसर्गसुंदर असून येथील हवा आरोग्यप्रद आहे. खोऱ्यात होणाऱ्या गहू, मका, बार्ली, बटाटे, भाजीपाला, फळे, चहा तसेच देवदार, चीड, विलो, बांबू, सबाई गवत, तुतीची झाडे, औषधी वनस्पती इत्यादींच्या उत्पादनांची ही बाजारपेठ आहे. लोक बळकट व स्वरूपसुंदर असून मध, लोकर, टोपल्या, हातमाग यांचे उद्योग करतात. या भागात आरोग्यकारक उष्मोदकाचे झरे असल्याने विहार व विश्राम यांसाठी कुलूला प्रवासी पुष्कळ येतात. येथील प्राचीन हिंदू मंदिरांवरील शिल्प प्रेक्षणीय आहे. कुलूपासून मनाली (१,७९८ मी.) पर्यंतच्या सृष्टिसौंदर्याच्या विविध रूपांनी नटलेल्या प्रदेशाच्या संस्मरणीय प्रवासात हिमालयाची रम्य दर्शने चढत्या श्रेणीने होत जातात.

ओक, शा. नि. कुमठेकर, ज. ब.