कुरुक्षेत्र : हरयाणा राज्यातील पुरातन यज्ञभूमी, धर्मक्षेत्र व रणक्षेत्र. कर्णालच्या ईशान्येस ३२ किमी., २९० १५’ उ. ते ३०० उ. ते ३०० उ. व ७६० २०’ पू ते ७७० पू. यांदरम्यानच्या या भूमीस उत्तर रेल्वेच्या दिल्ली–कालका मार्गावरील दिल्लीच्या उत्तरेस १५६ किमी. कुरुक्षेत्र प्रस्थानकाहून जाता येते. येथील वस्ती थानेसर या २९,५५५ (१९७१) वस्तीच्या गावात समाविष्ट आहे. फाळणीनंतर पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांसाठी या सु. २५७ किमी. घेराच्या भूमीवर मोठी छावणी उघडली होती. हल्ली येथे शासकीय प्रशिक्षण संस्था, कुरुक्षेत्र विद्यापीठ (स्था. १९५६) व वन्य पक्ष्यांसाठी अभयक्षेत्र आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी येथील तीर्थात स्नान करण्यासाठी मोठी यात्रा जमते.
सरस्वती व द्दशद्वती नद्यांमधील ही भूमी प्रथम कुरू राजाने नांगरली आणि मोठे तप करून ती धर्मक्षेत्र व कुरुक्षेत्र म्हणून विख्यात होईल असा वर मिळविला. अनेक देवर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी यांनी येथे यज्ञ केले. येथे काम्यकारी सात वने, सात प्रवाह, ब्रह्मसरादी पाच सरोवरे व चंद्रकूप, विष्णुकूप, रुद्रकूप व देवाकूप असे चार कूप होते. ज्योतिसरोवराजवळ कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितलीपरशुरामाने येथे स्यमंतपंचक नावाचा तलाव निर्माण केला अशा अनेक धार्मिक आख्यायिकांशी तसेच शिवपूजा, सूर्योपासना इत्यादींशी संबंधित ३६० स्थळे कुरुक्षेत्री आहेत. ब्राह्मणे, आरण्यके, श्रौतसूत्र, यजुर्वेद, पुराणे इत्यादिकांत कुरुक्षेत्राचे गौरवपूर्ण वर्णन आहे. भारतीय युद्धाशिवाय स्थानेश्वर, पानिपत, कैथल, कर्णाल इ. ठिकाणच्या इतिहासप्रसिद्ध लढाया या परिसरातच झाल्या. भारताच्या वायव्येकडून येऊन गंगेच्या मैदानात शिरण्याच्या मार्गावर एका बाजूला हिमालय व दुसऱ्या बाजूस राजस्थानची मरूभूमी आणि अरवलीचे डोंगर अशा मोक्याच्या भौगोलिक स्थानी ही प्राचीन व अर्वाचीन रणक्षेत्रे आहेत. हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ व दिल्ली या भारतीय राजधान्या याच आसमंतात आहेत.
माैर्य आणि गुप्त साम्राज्यांच्या आणि हर्षवर्धनाच्या काळात हा प्रदेश चांगला भरभराटलेला होता. येथील आचारविचार व भाषा प्रमाण मानली जाते. सातव्या शतकात भारतात आलेल्या ह्युएनत्संगने याला सौख्यभूमी म्हटले आहे. पुढे विशेषतः मुसलमानांच्या स्वाऱ्यांनंतर या भूमीचे माहात्म्य व महत्त्व नष्टप्राय झाले. महारथी कर्णाला स्वतः श्रीकृष्णाने जेथे अग्नी दिला, ती एका मोठ्या खडकावरील जागा अद्याप दाखविली जाते.
ओक, शा. नि. कुमठेकर, ज. ब.