क्रॅस्नोयार्स्क : रशियन सोव्हिएट फेडरल सोशॅलिस्ट रिपब्लिकच्या क्रॅस्नोयार्स्क टेरिटरीचे मुख्य ठाणे व मध्य सायबीरियातील प्रमुख व्यापारी व औद्योगिक शहर. लोकसंख्या ७,०७,००० (१९७३). हे येनिसे नदीच्या दोन्ही तीरांवर वसलेले असून १८९० मध्ये ट्रान्स सायबीरियन रेल्वे येथे पोहोचल्यानंतर ते वेगाने वाढले. दुसऱ्या महायुद्धात रशियाच्या पश्चिम भागातील बरेच कारखाने येथे आणण्यात आले. शेती, खाणी, वाहतूक यांची अवजड यंत्रे, जहाजबांधणी व दुरुस्ती, रेल्वे सामान व दुरुस्ती, सिमेंट, लाकूड, अन्नप्रक्रिया, कागद, कापड, धान्य दळणे इत्यादींचे मोठे कारखाने येथे असून वाहतुकीचेही महत्त्वाचे केंद्र आहे. क्रॅस्नीयारचा किल्ला म्हणून ते १६२८ मध्ये स्थापन झाले. एकोणिसाव्या शतकात सोन्याचा शोध व शेती उत्पन्न यांमुळे ते वाढले आणि १८२२ मध्ये प्रांताची राजधानी झाले. येनिसे नदीवर जगातील मोठ्या जलविद्युत् केंद्रांपैकी एक केंद्र आहे. विभागीय संग्रहालय, शास्त्रीय संशोधन संस्था, लाकूड-उद्योग शिक्षक प्रशिक्षण, वैद्यकीय इ. शिक्षणसंस्था आहेत.  

कुमठेकर, ज. ब.