तार्तर : (तातर, तातार, तार्तार). मध्य आशियातील एक मध्ययुगीन भटकी जमात. पूर्व मंगोलिया व पश्चिम मॅंचुरियातून आलेल्या तार्तरांच्या टोळ्यांनी चंगीझखानाच्या नातवाच्या नेतृत्वाखाली १२३७ मध्ये हंगेरीत शिरून पूर्व यूरोपचा बराच भाग व्यापला. त्यांना इतिहासात ‘गोल्डन होर्ड’ नाव आहे. त्यांनी आक्रमिलेल्या युरेशियाच्या विस्तृत प्रदेशास तार्तरी किंवा तातरी म्हणत. हा प्रदेश ३५° उ. ते ५५° उ. यादरम्यान पश्चिमेस रशियाच्या प्रमुख शहरांपासून पूर्वेस पॅसिफिकपर्यंत विस्तारलेला होता. चौदाव्या शतकात तार्तरांनी सुन्नी मुस्लिमपंथ स्वीकारला. चंगीझखानाच्या साम्राज्याच्या मोडतोडीनंतर युरोपीय तार्तरी किंवा छोटा तार्तरी म्हणजे गोल्डन होर्डच्या ताब्यातील प्रदेश व आशियाई तार्तरी वा मोठा तार्तरी म्हणजे सायबीरिया व मध्य आशिया असे स्थूलमानाने समजले जाऊ लागले. अखेर छोटा तार्तरी हे नाव क्रिमियाच्या खानाच्या प्रदेशापर्यंतच मर्यादित राहिले. तार्तर लोक पूर्वीपासून लाकूड, मृत्तिकाशिल्प, कातडी, कापड, धातू इत्यादींवरील कोरीव कलाकुसर व व्यापार यांबद्दल प्रसिद्ध होते. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत त्यांनी रशियन साम्राज्यात महत्त्वाचे स्थान मिळविले. एकूण सु. ५० लक्ष तार्तरांपैकी बरेच तार्तर लोक तार्तर स्वायत्त सोव्हिएट सोशॅलिस्ट प्रजासत्ताकात राहतात. या प्रदेशाला तातरिया वा तातरस्तान असेही म्हणतात आणि तो पूर्व मध्य रशियन सोव्हिएट सोशॅलिस्ट संघराज्यातील प्रजासत्ताक देश होय. व्होल्गा नदीखोऱ्यात मध्य भागातील आणि व्होल्गा–कामा संगमाभोवतीच्या या प्रदेशाचे क्षेत्र ६८,००० चौ.किमी. आणि लोकसंख्या ३२,६८,००० (जानेवारी १९७४) असून कझॅन ही त्याची राजधानी आहे.

बऱ्याच तार्तरांनी ब्राँझयुगापूर्वी व्होल्गा खोऱ्यात वस्ती केली. दहाव्या ते तेराव्या शतकापर्यंत तेथे ब्यूल्गारांचे सुसंपन्न राज्य होते. पुढे सोळाव्या शतकापर्यंत मंगोलांचे वर्चस्व होते. १५५२ मध्ये रशियाच्या आयव्हान (इव्हान द टेरिबल) चौथा याने हा प्रदेश जिंकला. १९२० मध्ये तार्तर स्वायत्त प्रजासत्ताक निर्माण झाले. १९७१ मध्ये निवडलेल्या २०७ लोकप्रतिनिधींपैकी ७३ स्त्रिया होत्या. लोकांपैकी ४९·१ टक्के तार्तर, ४२·४ टक्के रशियन व चूवाश, मॉर्डीव्हियन व उड्मूर्त मिळून ६·७ टक्के लोक होते. 

हा प्रदेश सामान्यतः सखल, सपाट व ऊर्मिल आहे. त्याच्या पश्चिम भागातून व्होल्गा नदी उत्तर–दक्षिण वाहत जाते व तिची सर्वांत मोठी उपनदी कामा ही प्रदेशाच्या बहुतेक भागातून पूर्व–पश्चिम जाते. व्होल्गाच्या पश्चिमेचा प्रदेश २३५ मी. पर्यंत व पूर्वेकडील प्रदेश उरल पर्वताच्या अग्रभूमीकडे उंच होत जातो तसेच आग्नेयीस तो बुगुल्माबेल्यिब्ये प्रदेशाकडे ३४३ मी. पर्यंत चढत जातो. व्ह्याट्‌का, स्व्हीयाग व ब्येलाया या कामाच्या प्रमुख उपनद्या आहेत.

येथील हवामान खंडीय स्वरूपाचे असून अल्पकालीन उन्हाळे उष्ण व दीर्घकालीन हिवाळे कडक थंडीचे असतात. वार्षिक पाऊस सु. ४२ ते ५१ सेंमी. असतो आणि तो मुख्यतः उन्हाळ्यात पडतो. बर्फाचा थर सु. ६० सेंमी. पर्यंत होतो.

बहुतेक सर्व प्रदेश स्टेप व अरण्य विभागात असून येथील मृदा दक्षिणेस काळी व उत्तरेस वनप्रदेशीय निकृष्ट प्रकारची आहे. सु. १७% प्रदेश वनाच्छादित आहे. नद्यांकाठी रुंद पूरमैदानी कुरणे आहेत. व्होल्गा आणि कामाकाठची कुरणे क्कीबिशेव्ह जलाशयाखाली गेलेली आहेत. या जलाशयाखाली या राज्यातील सु. २,८५० चौ. किमी. जमीन गेलेली आहे.

खनिज तेल, उद्योगधंदे व शेती यांवर येथील विविध स्वरूपी अर्थव्यवस्था अवलंबून आहे. खनिज तेल उत्पादनात रशियात या राज्याचा पहिला क्रमांक आहे. १९४३ मध्ये पहिली तेलविहीर खोदल्यानंतर उद्योगधंद्याची वेगाने वाढ झाली. आल्मित्येफ्‌स्कहून पूर्वेकडे व पश्चिमेकडे तेलनळ जातात. मिन्निबायेव्हो येथे नैसर्गिक वायूचे उत्पादन होते. यांशिवाय अस्फाल्ट, जिप्सम, ॲलॅबॅस्टर, फ्लॉरिडिन, फॉस्फोराइट, गंधक, तांबे व लोहयुक्त वालुकाश्म, चुनखडक, लिग्नाइट व पीट इ. खनिजे कमीजास्त प्रमाणात सापडतात. कझॅन  व मेंडेल्येफ्स्क ही रसायनी उद्योगांची केंद्रे आहेत. व्होल्गाकाठच्या कझॅन, शिल्येनडॉल्स्क, चीस्तॉपल इ. शहरी कृषी अवजारे, वैद्यकीय उपकरणे, घड्याळे, टंकलेखन यंत्रे, लेथ इ. अभियांत्रिकी कारखाने आहेत. ममादिश येथे कागद व लगदा इ. उद्योग आहेत. कृषिउत्पादनात गहू, मका, बार्ली, भरडधान्ये, कडधान्ये, बटाटे, साखर–बीट, अंबाडी, तंबाखू, सफरचंदे व इतर फळे, चारापिके, भाजीपाला, सूर्यफुले यांचा समावेश असून पशुपालन व मधुमक्षिकापालन हा महत्त्वाचा उद्योग आहे. लाकूड, बांधकाम साहित्य, कापड, कपडे, अन्न वाहने, कातडी कमावणे, आसवन्या, पीठगिरण्या हे उद्योग वाढत आहेत. १९७३ मध्ये ५६७ सामुदायिक व २१५ शासकीय शेतांचे मिळून पिकांखालील क्षेत्र ३७ लक्ष हेक्टर होते. सिंचनासाठी क्वीबिशेव्ह जलाशय विशेष उपयुक्त आहे. फळ्या कापणे, फर्निचर, जहाजबांधणी इ. वनोत्पादनाश्रित उद्योगही आहेत. मॉस्को–उरल दोन लोहमार्ग देशाच्या वायव्य आणि आग्नेय भागांतून जातात. एक दक्षिणोत्तर लोहमार्गही व्होल्गाच्या उजव्या तीराने जातो. नद्यांतून भारी मालवाहतूक होते. कझॅनपासून महत्त्वाचे महामार्ग बुगुल्मा, मेंझिल्यीन्स्ककडे व चीस्तॉपलहून नूर्लातकडे जातात.

देशात १९७३ मध्ये ३,४९२ शाळांतून ७,१०,००० विद्यार्थी, ३९ यांत्रिक महाविद्यालयांतून ५०,९०० विद्यार्थी आणि शासकीय विद्यापीठासह १२ उच्च शिक्षणसंस्थांतून ६२,५०० विद्यार्थी शिकत होते. रशियाच्या शास्त्र अकादमीची शाखा येथे असून ३९ शासकीय शास्त्रीय संशोधन संस्था आहेत. १९७३ अखेर ८,२६३ डॉक्टर व ३४,३५० खाटा रुग्णालयांतून उपलब्ध होत्या. देशात १,६०० हून अधिक ग्रंथालये, ९ नाट्यगृहे व सु. ७५ वृत्तपत्रे आहेत. तार्तर भाषेत पुष्कळ कार्यक्रम व छपाई होते.

कझॅन राजधानीशिवाय बुगुल्मा, आल्मित्येफ्‌स्क, चीस्तॉपल, झिल्येनडॉल्स्क, यिलाबूगा, अग्रिस ही येथील प्रमुख शहरे आहेत.

ओक, द. ह. कुमठेकर, ज. ब.