कोलंबाइन : (लॅ. ॲकि्कलेजिमा कुल-रॅनन्क्युलेसी). ह्या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या सु. ३० (विलिस यांच्या मते १००), ओषधीय [→ ओषधि], बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या), काटक व सुंदर वनस्पतींचा प्रसार विशेषेकरून उत्तर गोलार्धात आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभी सुंदर, मोठी, आकर्षक फुले व पुढे नाजूक पर्णसंभार यामुळे ह्या जाती आणि त्यांपासून काढलेले संकरज (दोन जातींच्या संयोगातून निर्माण झालेली संतती) फार लोकप्रिय आहेत. खोड लहान (०·६ – ०·९मी.) व शाखायुक्त असून फुले शाखांच्या टोकास येतात. पाने संयुक्त, १–३दली व दले गोलसर टोकांची असतात. फुले पंचभागी, पाकळ्या शुंडिकायुक्त, संदले पाकळ्यांसारखी, केसरदले अनेक [→ फूल] व फळ पाच पेटिकासम भागांचे व अनेकबीजी असते. ॲक्किलेजिया व्हल्गॅरिस ही जाती समशीतोष्णहिमालय, यूरोप व आशिया येथे सापडते. हिचे पांढरे, फिकट गुलाबी, अंजिरी, जांभळे, दुहेरी, किरमिजी असे विविध प्रकार लागवडीत आहेत. सर्व शोभिवंत संकरज काहीसे सावलीत किंवा उघड्यावर लावतात. निळे कोलंबाइन ॲ. सेर्यूलिया हे अमेरिकेतील संयुक्त संस्थानांतील कोलोरॅडो राज्याचे राज्य-पुष्प आहे. व्हल्गॅरिसचा सेर्यूलियाशी संकर करतात. ॲ. व्हल्गॅरिस विषारी आहे.
पहा : रॅनेलीझ
जमदाडे, ज. वि.
“