कोलंबस : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतीलओहायओ राज्याची राजधानी. लोकसंख्या ५,४०,०२५ (१९७०). हे क्लीव्हलँडच्या २००किमी. वायव्येस सायओटो नदीवर कृषिसमृद्ध प्रदेशात वसलेले असून, व्यापार व दळणवळणाचे केंद्र समजले जाते. ईअरी-ओहायओ कालवा येथून गेला आहे. येथे विमानबांधणीचा मोठा कारखाना असून, अंतराळ-उपकरणे, मोटारचे सुटे भाग, विद्युत् उपकरणे, यंत्रे, कापड, काच, पादत्राणे, अन्नपदार्थ इत्यादींचे उद्योग आहेत. येथे असलेला लष्कराचा डेपो जगात मोठा समजला जातो. ओहायओ राज्य विद्यापीठ, कॅपिटल विद्यापीठ, औद्योगिक धातू व खनिज संशोधनाची जगप्रसिद्ध बेटेल मेमोरियल संस्था इ. शैक्षणिक तसेच कलावीथी, सिंफनी ऑर्केस्ट्रा अशा अनेक सांस्कृतिक संस्था येथे आहेत.
लिमये, दि. ह.