कोर्याक : ईशान्य सायबीरियातील एक मंगोलवंशी जमात. १९६० साली त्यांची संख्या केवळ ६,३०० होती. वांशिक व भाषिक दृष्ट्या या हेक एस्किमोंना जवळचे आहेत. मासेमारी, मुख्यतःखेकडे पकडणे, रेनडिअर पाळणे आणि लोकर मिळविण्यासाठी प्राण्यांची शिकार करणे, हे त्यांचे मुख्य व्यवसाय होत. त्यांच्या प्रदेशातील तपमान हिवाळ्यात सरासरी १२° से. व उन्हाळ्यात १८° से. असते. कोर्याक रेनडिअरच्या कातडींचे कपडे वापरतात. कुत्र्याच्या किंवा रेनडिअरच्या गाडीचा मालवाहतुकीसाठी वापर करतात.
कोर्याक समाजात वर्गश्रेणी नाही. खेडेगाव व बीजात्मक कुटुंब या प्रमुख सामाजिक संस्था असून आर्थिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक जीवन त्यांवर आधारभूत असते.
कोर्याक जडप्राणवादी आहेत. शामनला यांच्या समाजात महत्त्व असते. रशियन सरकारने यांच्या प्रदेशात शाळा सुरू केल्या आहेत. तसेच त्यांना सामूहिक शेतीत सामावण्याचा प्रयत्नही चालू आहे.
एक हजार लोकवस्ती असलेले पलाना हे खेडेगाव त्यांचे राजधानीचे शहर आहे आणि कोर्याकांचा यूरोपीय लोकांशी प्रथम संबंध सतराव्या शतकात आला.
संदर्भ : Kolarz, Walter, Peoples of the Soviet Far East, New York. 1954.
मुटाटकर, रामचंद्र