गदाकवकजन्य रोग : (ॲस्परजिलोसीस). निरनिराळ्या ऊतकांत (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांत) गदाकवकाची (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित ॲस्परजिलस वंशातील सूक्ष्म वनस्पतीची) वाढ होण्यामुळे प्रामुख्याने मनुष्य व पक्षी (कोंबड्या, बदके, कबुतरे व टर्की) यांच्यामध्ये फुप्फुसाचे विकार उत्पन्न करणारा रोग. गदाकवकाच्या जातींपैकी (१) कृष्ण गदाकवक (ॲस्परजिलस नायजर) व (२) धूमित गदाकवक (ॲस्परजिलस फ्युमिगेटस) ह्या रोगोत्पादक जाती आहेत [→ ॲस्परजिलस]. ह्या जाती उष्ण पण ज्यामध्ये आर्द्रता अधिक आहे अशा हवामानात कोंदट व दमट जागी वाढतात. हवेतील गदाकवकामुळे प्रयोगशाळेत रोगजंतू वाढविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संवर्धन माध्यमामध्ये गदाकवकांची आगंतुक वाढ होते व त्यामुळे रोगजंतू शोधण्याचे काम बिकट होऊन बसते. मनुष्यात कृष्ण गदाकवकामुळे कर्णकवक रोग व धूमित गदाकवकामुळे कर्णकवक रोग आणि फुप्फुसाचा गदाकवक रोग हे रोग होतात. कर्णकवक रोग हा चिरकारी (दीर्घकालीन) चर्मरोग असून बाह्यकर्णाचा रोग आहे व फुप्फुसाचा गदाकवक रोग हा चिरकारी क्षय रोगासारखा आहे. हवेतील गदाकवक श्वासनलिकेवाटे फुप्फुसात प्रवेश करतात अगर बाह्य कर्णाच्या ऊतकात खाजविण्यामुळे अगर इतर कारणांमुळे होणाऱ्या जखमांत प्रवेश मिळवतात. फुप्फुसाचा रोग झाल्यास सर्व लक्षणे क्षयासारखी दिसतात व निदान करणे कठीण होते. कर्णकवक रोगामध्ये तीव्र खाज व चिरकारी निस्यंदीशोथ (द्रव बाहेर झिरपणारी दाहयुक्त सूज) ही लक्षणे दिसतात. फुप्फुसविकार झाल्यास शस्त्रक्रिया करूनच तो बरा करतात. परंतु कर्णकवक विकाराच्या चिकित्सेकरिता ॲसिटिक अम्‍ल आणि कवकनाशी पदार्थ (औषधे) अशी रासायनिक द्रव्ये उपयुक्त ठरतात.

पक्ष्यांमध्ये, त्यातल्या त्यात कोंबड्यांच्या पिलांमध्ये धूमित गदाकवकाच्या संसर्गाने रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने फुप्फुसामध्ये होतो व पिले मृत्युमुखी पडतात. अंडी उबविण्याची यंत्रे गदाकवकामुळे दूषित असली, तर उपजताच पिलांना रोगाची बाधा होते व थोड्याच दिवसांत ती मरतात. बुरसटलेले धान्य खाण्यात आल्यासही रोगाचा प्रादुर्भाव होतो. कष्टमय जलद श्वासोच्छ्‌वास, नाकातून चिकट व दुर्गंधीयुक्त स्राव, पायांचे सांधे सुजणे व चोच वासून बसणे, खोकला, घशामध्ये घरघरणारा आवाज ही लक्षणे रोगी कोंबड्यांमध्ये प्रामुख्याने दिसतात आणि थोडे दिवस तग धरून कोंबड्या मरतात. कवकामुळे पक्ष्यांत होणारे रोग सहसा चिरकारी असतात. परंतु पिलामध्ये होणारा रोग मात्र तीव्र स्वरूपाचा असतो. उपचार फारसे उपयोगी पडत नाहीतच परंतु अलीकडे ‘हॅमायसीन’ सारखे कवकविरोधी प्रतिजैव (अँटिबायॉटिक) उपयुक्त ठरले आहे. खुराडी हवेशीर व स्वच्छ ठेवण्याने रोगास प्रतिबंध होतो. टर्की पक्ष्यामध्ये मेंदूमध्ये विकृती होते. त्यामुळे एका बाजूस मान वळवून अडखळत चालणे हे लक्षण दिसते.

गदाकवकामुळे घोडे, गाई व कुत्रे यांमध्ये फुप्फुसाचा रोग प्रामुख्याने होतो. गाईमध्ये गर्भपातालाही गदाकवक कारणीभूत होत असल्याचे दिसून आले आहे. कुजट घास, चारा, बुरसटलेले धान्य यांतून गदाकवक उदरात व हवेतून फुप्फुस, श्वासनलिका या भागांत शिरते आणि रोग उत्पन्न होतो. कष्टमय, जलद श्वासोच्छ्‌वास, धाप लागणे अशी लक्षणे दिसतात. कुत्र्यामध्ये क्वचित आकडी येणे हे लक्षणही आढळते.यावर खात्रीचा उपचार नाही. गोठे, तबेले साफ ठेवणे घास, चारा दूषित न होईल अशी काळजी घेणे या उपायांनी रोगप्रतिबंध होतो.

खळदकर, त्रि. रं.