कौनास : सोव्हिएट राज्यसंघाच्या लिथुएनिया राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र. लोकसंख्या सु. ३,३२,००० (१९७३). हे नेमन आणि विलिया या नद्यांच्या संगमाजवळ, व्हिल्निअस शहराच्या ८८ किमी. वायव्येस आहे. १,०३० मध्ये निर्माण झालेल्या कौनासच्या जुन्या भागात अनेक चर्च आढळतात. पूर्वेकडे जाणाऱ्या मार्गावरील नाके व जलमार्गावरील ठिकाण म्हणून कौनासला इतिहासात अनेक आपत्तींतून जावे लागले. धातुकाम, शेतीची अवजारे, कापड, कागद, फर्निचर, अन्नपदार्थ इ. अनेक उद्योग शहरात असून राज्याचे विद्यापीठ, शास्त्र व पशुवैद्यक ह्यांच्या अकादमी, संग्रहालये, नाट्य आणि चित्रमंदिरे येथे आहेत.
लिमये, दि. ह.