कोयाजी, जहांगीर कुंवरजी : (११ सप्टेंबर १८७५ – ? ) भारतातील एक नामवंत अर्थशास्त्रज्ञ. शिक्षण मुंबई व केंब्रिज विद्यापीठांत झाले. त्यानंतर कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात १९१० ते १९३० पर्यंत त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. १९३१ साली ते कॉलेजच्या प्राचार्यपदावरून निवृत्त झाले व त्यानंतर १९३२ – ३५ पर्यंत ‘आंध्र विद्यापीठ आर्ट्स कॉलेज’ मध्ये त्यांनी प्राचार्य म्हणून काम पाहिले.
‘लीग ऑफ नेशन्स’ मध्ये हिंदी प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती (१९३०–३२). महामंदीच्या कारणांची मीमांसा करण्याची आवश्यकता प्रतिपादन करणारा ठराव त्यांनी तेथे मांडला. त्या ठरावावर आधारलेला द कोर्स अँड फेझिस ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमिक डिप्रेशन हा सुप्रसिद्ध अहवाल जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ प्रा. ओह्लिन यांनी तयार केला. ‘इंडियन फिस्कल कमिशन’ आणि ‘रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड एक्स्चेंज’ या दोन आयोगांचे ते सदस्य होते. लाहोर येथे भरलेल्या ‘भारतीय अर्थशास्त्रीय परिषदे’च्या तेराव्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. भारतीय अर्थकारणाचे एक जाणकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी लिहिलेले द इंडियन फिस्कल प्रॉब्लेम, इंडियन करन्सी अँड एक्स्चेंज, द इंडियन करन्सी सिस्टिम, इंडिया अँड द लीग ऑफ नेशन्स, द इकॉनॉमिक डिप्रेशन हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांचा कल्ट्स अँड लेजंड्स ऑफ एन्शंट इराण अँड चायना (१९३६) हा वेगळ्या विषयावरील संशोधनपर ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे.
भेण्डे, सुभाष
“