कॅनन, एडविन: (३ फेब्रुवारी १८६१–८ एप्रिल १९३५). इंग्रज अर्थशास्त्रज्ञ, त्याचा जन्म फूनशाल (मादीरा बेटे) येथे झाला. क्लिफ्टन आणि बेल्यल महाविद्यालयांत शिक्षण घेतल्यानंतर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’ ह्या संस्थेत तिच्या स्थापनेपासून (१८९५) त्याने अध्यापनाचे कार्य केले. १९०७ ते १९२६ पर्यंत तो लंडन विद्यापीठात अर्थशास्त्राचा प्राध्यापक होता. कॅनन सनातनवादी परंपरेचा प्रतिनिधी होता. त्याचा ए हिस्टरी ऑफ द थिअरीज ऑफ प्रॉडक्शन अँड डिस्ट्रिब्यूशन  हा ग्रंथ १८९३ मध्ये प्रसिद्ध झाला आणि ब्रिटिश आर्थिक विचारांचा एक मर्मग्राही विवेचक म्हणून त्याची ख्याती झाली. हिस्टरी ऑफ सोशल रेट्स इन इंग्‍लं(१९१२) हा त्याचा ग्रंथ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करांविषयीचा एक प्रमाणभूत ग्रंथ मानला जातो. वेल्थ ऑफ नेशन्सच्या नव्या आवृत्तीत ॲडम स्मिथच्या मागणी-पुरवठा सिद्धांताचे सोप्या शब्दांत विवरण करताना कॅननने त्या सिद्धांताची आधुनिक दृष्टिकोनातून छाननी केली. त्याने लिहिलेल्या अन्य ग्रंथांपैकी मनी  (१९१८), कोल नॅशनलायझेशन  (१९१९), वेल्थ (१९२८), ए रिव्ह्यू ऑफ इकॉनॉमिक थिअरी  (१९२९) आणि बॅलन्स ऑफ ट्रेड डिलूझन्स (१९३१) हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. कॅनन वयाच्या ७४व्या वर्षी हॅमशर परगण्यातील बोर्नमथ गावी मरण पावला.

गद्रे, वि. रा.