बंधपत्र : (बाँड). राज्यशासन केंद्रशासन त्याचप्रमाणे खाजगी व सरकारी क्षेत्रांतील कंपन्या आणि स्वायत्त सार्वजनिक निगम इत्यादींनी काढलेल्या कर्जाचे पत्र. हे पत्र एक करार दर्शविते. या करारात उल्लेखिलेल्या कर्जाच्या दर्शनी रकमेवर विवक्षित दराने रीतसर (बहुधा दर सहा महिन्यांनी) व्याज देण्याचे बंधपत्राची मुदत संपल्यावर ऋणको त्याची दर्शनी किंमत वैध चलनात फेडण्याचे वजन देतो. बाह्यतः बंधपत्र जरी वजनचिठ्ठीसारखेच असले, तरी त्याचे स्वरूप अधिक औपचारिक असते व ते साधारणातः मुद्रांकित असते. बंधपत्रांनी उभारलेले एकूण कर्ज बऱ्याच मोठ्या रकमेचे असते व बंधपत्रकांची संख्यांही मोठी असते. प्रत्येक कालखंडासाठी एक अशी व्याजाची कुपने त्याला जोडलेली असतात व ती सादर करून बंधपत्रधारकाला व्याज गोळा करता येते. बहुतेक बंधपत्रे नोंदणीकृत असतात आणि ती फक्त नोंदणीकृत धारकांनाच देय असतात. बरीचशी बंधपत्रे विमोचनयोग्य म्हणजेच सोडविता येण्याजोगी असतात त्यांच्या बाबतीत ऋणकोला मुदत संपण्यापूर्वी कर्जाऊ रक्कम आपल्या सोयी नुसार फेडण्याची मुभा असते. बंधपत्रांची मुदत साधारणतः ५, १०, २०, ३०, किंवा ९९ वर्षे असू शकते. बंधपत्राविषयीच्या संपूर्ण अटी एका खास करारनाम्यात तपशिलाने दिलेल्या असतात व त्यावर ऋणको आणि बंधपत्रधारकांचा विश्वस्त यांच्या सह्या असतात. व्याजाचा दर, मुदत, रूपांतराचे हक्क आगाऊ कर्जफेडीचे हक्क ऋणकोस कसूरदार केव्हा समाजावा इ. बाबींचा करारनाम्यात उल्लेख असतो. धारकांचा विश्वस्त बहुधा एखादी बँक असते व ऋणकोने करारनाम्यातील अटी मोडल्यास किंवा कसूर केल्यास धारकांच्या वतीने विश्वस्त बँक योग्य ती कारवाई करते. सरकारी बंधपत्रांना शासनाच्या कराधानसत्तेचा पाठिंबा असतो.

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात बंधपत्रे महसुली असू शकतात. म्हणजे त्यावरील रकमेतून उभारलेल्या प्रकल्पापासून जमा होणाऱ्या महसुलाचा त्यांना आधार असतो. कंपन्या किंवा निगम यांनी काढलेली बंधपत्रे त्यांच्या मालमत्तेवरील धारणाधिकाराने प्रतिभूत असतात. खाजगी क्षेत्रातील कंपन्याच्या अप्रतिभूत बंधपत्रांना ‘ऋणपत्रे’ असे संबोधण्याचा अमेरिकेचा प्रघात आहे. बंधपत्रांची परतफेड मुख्यतः त्याच्या रकमेतून निर्माण केलेल्या मत्तेच्या उत्पन्नातून किंवा शासनाच्या महसूल निर्मितीमधूनच केली जाते. सर्व रकमेची एकदम परतफेड करणे कंपन्यांना जड जाते. म्हणून निरनिराळी बंधपत्रे वेगवेगळ्या मुदतींनी फेडता यावीत. अशी व्यवस्था कंपन्या करतात परतफेड सोयीची व्हावी म्हणून त्या कर्जनिवारण निधी उभारतात. प्रतिवर्षीच्या उत्पन्नातून काही भाग या निधीत जमा करून त्यातून परतफेड करण्याचे धोरण आखले जाते. काही बंधपत्रांच्या बाबतीत मुदतपूर्वे परतफेड करण्याचा अधिकार कंपन्या स्वतःकडे राखून ठेवतात. व्याजदर उतरला, तर नवीन बंधपत्रे काढून त्यांपासून जमा झालेल्या रकमेतून जुन्या, अधिक व्याजदर असलेल्या बंधपत्रांची परतफेड त्यांना करता येते.

बंधपत्राचा प्रमुख प्रकार म्हणजे गहाण बंधपत्र. कंपनीची मूर्त मत्ता बंधपत्रधारकांना गहाण टाकण्यात येते. म्हणून आर्थिक आपत्तीमध्ये कंपनीची पुनर्रचना करावी लागल्यास बंधपत्रधारकांच्या हक्कास अग्रक्रम मिळू शकतो. आनुषंगिक विश्वस्त बंधपत्र हा बंधपत्राचा दुसरा प्रकार. याच्या धारकांना कंपनीच्या अमूर्त मत्तेचे (कंपनीच्या मालकीचे शेअर व बंधपत्रे यांचे) संरक्षण मिळते. काही बंधपत्रांचे रुपांतर करता येते म्हणजे त्यांच्या बदली कंपनीचे भाग विशिष्ट किंमतीस धारकांना मिळू शकतात.

अमेरिकेत काही बंधपत्रे अशीही असतात की, त्यांची मुदत निश्चित असते. परंतु कंपनीला पुरेसा नफा झाला तरच व्याज दिले जाते. काही बंधपत्रांच्या बाबतीत त्यांच्या व्याजाची  व परतफेडीची रक्कम निश्चित नसून जीवनमान निर्देशांक, किंवा एखादे परकीय चलन मूल्य यांच्याशी ती निगडित असते.

बंधपत्र या शब्दाचा वापर कायद्याच्या कक्षेतही निरनिराळ्या वैध पत्रांच्या संदर्भात करतात. त्या सर्वांचे एक सामान्य लक्षण हे की, त्यांमध्ये रक्कम देण्याचे वजन असते. बंधपत्रे अटींविरहीत किंवा अटीसहित असू शकतात. ऋणपत्रे, गहाण-बंधपत्रे, तारण बंधपत्रे, संलग्ण न्यास बंधपत्रे, प्रतिभूति-बंधपत्रे, प्राप्ति-बंधपत्रे, नगरपालिका बंधपत्रे, निष्ठा वा जमानत बंधपत्रे, अपील बंधपत्रे, जातमुचलका बंधपत्रे असे बंधपत्राचे अनेक प्रकार असतात.

शासन निगम किंवा तत्सम संस्था यांचे देय असलेले कर्जाचे बंधपत्र हे लिखित किंवा छापील असून ते एक कायदेशीर पुरावा ठरते. ‘कर्जाची फेड विशिष्ट मुदतीत व विशिष्ट हप्ताने करीन’ अशी हमी ऋणको या लेखाने धनकोस देत असतो. अशा लेखास मुद्रांकाची व साक्षीची जरूरी असते, तसेच एखाद्या इसमाचे कर्ज त्याने न फेडल्यास दुसरा इसम त्याच्यातर्फे ते कर्ज फेडण्याची हमी घेतो किंवा तशी कबुली देतो, त्यास जामीनदार म्हणतात. अशा जामिनकीच्या बंधपत्रासही मुद्रांक व साक्षीची आवश्यकता असते. जामिनकीचे बंधपत्र देऊन न्यायालयात एखाद्या कैद्याची सुटकाही होऊ शकते. ‘तारीखवार अगर हुकूम होईल त्यावेळी कैद्यास न्यायालयात हजर करीन’ असे एखादा त्रयस्थ इसम न्यायालयात लिहून देतो व कैद्याची सुटका होण्याकरिता विशिष्ट रकमेची जबाबदारी बंधपत्रानुसार पतकरतो. सरकारी क्षेत्रात, खाजगी कंपन्यांत तसेच स्वायत्त सार्वजनिक निगमांतही जबाबादारीच्या पदांवरील कर्मचाऱ्यांकडून प्रतिभूति-बंधपत्र घेतले जाते. जेथे पैसा आणि मालमत्ता यांचा संबंध येतो, तेथे अशा मालमत्तेची नासधूस, अफरातफर अथवा लबाडी होऊ नये म्हणून आवर्जून बंधपत्र घेतले जाते.

धोंगडे, ए. रा., पटवर्धन, वि. भा.