कोळीनृत्य : कोळी जमातीतील पारंपरिक नृत्यप्रकार. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून कोळीनृत्याची अनेक रूपे आढळून येतात. कोकणच्या किनाऱ्यावरील सोनकोळी लोकांत ‘कोळ्याचा नाच’ ह्या नावाने ओळखला जाणारा एक नृत्यप्रकार रूढ झाला आहे. ह्या नृत्यप्रकारात नर्तकांचे दोन गट दोन रांगांमध्ये समोरासमोर उभे राहतात. नाखवा आणि कोळीण रांगांच्या मध्यभागी असतात. कोळीण आपला डावा हात कमरेवर ठेवून उजव्या हातात रुमाल घेऊन तो नृत्यलयीनुसार हालवते. ती डाव्या-उजव्या बाजूंना शरीर झुकवते व त्यानुसार पदन्यास करते. नाखवा एका हातात दारूची बाटली व दुसऱ्या हातात पेला घेऊन कोळिणीच्या हालचालींशी सुसंवाद राखण्याचा प्रयत्न करीत मद्य पिऊन झिंगल्याचा अभिनय करतो. नर्तकांच्या दोन रांगा हातात वल्ह्यांच्या छोट्या प्रतिकृती घेऊन होडी वल्हविण्याचा अभिनय करतात. शरीरे मागेपुढे झुलवून ते समुद्राच्या लाटांवर हेलकावे घेणाऱ्या होडीचा आभास निर्माण करतात. हे सामूहिक नृत्य असल्याने हालचालींच्या एकात्मतेवर त्यांचा भर असतो. ह्या नृत्याला नावाड्यांच्या गीतांची तसेच झांज, ढोलकी आदी वाद्यांची साथ असते. मुंबईच्या जवळपास राहणारे सोनकोळी मात्र, ह्या नृत्यप्रकारातून मद्यपानाच्या अतिरिक्त प्रवृत्तीचे दर्शन घडते, म्हणून त्यास त्याज्य ठरवितात. ‘नकटा’ हा एक हास्यकारक नृत्यप्रकार आहे. त्यात कोळी, कोळीण व नकटा अशी तीन पात्रे असतात. नृत्यप्रसंगी म्हटले जाणारे गाणे ते अभिनीत करतात. नकट्याची वेषभूषा खास प्रकारची असून तो मुखवटा धारण करतो. तो प्रत्येक हालचाल अतिशयोक्त करून हास्यनिर्मिती करतो. एकवीरा व खंडोबा ही कोळी लोकांची आराध्यदैवते होत. त्यांच्या यात्राप्रसंगी तसेच गौरीगणपती, नारळी पौर्णिमा, होळी पौर्णिमा ह्या सणांच्या दिवशी, सोमवती अमावस्येला तसेच विवाहप्रसंगी नैमित्तिक विधींवर आधारलेल्या गीतरचनांना अनुसरून नृत्ये करण्याचा कोळी लोकांचा प्रघात आहे. भिन्न भिन्न उत्सवांच्या स्वरूपानुसार स्त्रीपुरुष कधी एकत्र, तर कधी वेगवेगळे नृत्य करतात. पारंपरिक उत्सवातील विशिष्ट गीताची तालबद्ध धून सनईवर वाजवतात व त्या धुनीवर गीत गात अर्थपूर्ण अंगविक्षेप करीत स्त्रीपुरुष नृत्य करतात. गीतातील शब्दार्थ लोकव्यवहारातील संकेतांनी दाखवितात. ढोलावर ‘ढा टुं मा टुं । ढा टुं टुं’ अशा प्रकारचा खेमट्याच्या अंगाचा ताल वाजवितात. स्त्रिया नृत्यप्रसंगी साडी, चोळी, ठुशी, बोरमाळ, वाली, कानात मोत्याचे काप, वाला, गाठे तर पुरुष लंगोटी, कोपरी, टोपी व कानात भिकबाळी अशी पारंपरिक वेषभूषा करतात. (चित्रपत्र २९).
पार्वतीकुमार इनामदार, श्री. दे.
“