पोल्क : पाश्चिमात्त्य नृत्यप्रकार. या प्रणयाराधनपर नृत्याचा उगम बोहीमियन लोकनृत्यात आढळतो. प्रागनजीकच्या एल्बस्टीनिट्स येथील आन्ना स्लाझॅक या ग्रामीण तरुणीने १८३० च्या सुमारास हे नृत्य प्रथम केले, असे मानले जाते. चेक भाषेत ‘पोल्क’ याचा अर्थ पोलिश मुलगी असा आहे. त्यावरून किंवा ‘पुक्ल’ म्हणजे अर्धे पाऊल, यावरून पोल्क ही नृत्यसंज्ञा रूढ झाली असावी. या जोषपूर्ण ग्रामीण नृत्याचे रूपांतर हळूहळू सुलभ व सफाईदार अशा युग्मनृत्याच्या (बॉलरूम डान्स) एका प्रकारात झाले. १८४० मध्ये पॅरिसमधील ऑदेआँ थिएटरमध्ये रंगमंचावर या नृत्याचा प्रथम प्रयोग झाला. त्यावेळी त्याचे मोठे स्वागत झाले. त्यानंतर इतर यूरोपीय देशांत त्याचा प्रसार फार झपाट्याने झाला. त्याचे ‘द ऱ्हाईनलँडर’, ‘पोल्क मझुर्क’ आणि ‘पोलिश पोल्क’ असे प्रादेशिक प्रकारही रूढ झाले. पुढे त्याचा प्रसार अमेरिकेत झाला व तेथेही ते वॉल्ट्सइतकेच लोकप्रिय ठरले. स्त्री-पुरुष एकमेकांच्या हातांत हात गुंफून वर्तुळाकार फिरत जलद गतीने हे नृत्य करतात. पोल्क हे दालनात तसेच रंगमंचावरही केले जाते. अनेक संगीतज्ञांनी पोल्कसाठी नृत्यसंगीत दिले आहे. बेडर्झिख स्मेताना या संगीतरचनाकाराच्या द बार्टर्ड ब्राइड (१८६६) व यारोमिर व्हाइनबर्गरच्या श्‍वांडा द बॅगपायपर (१९२७) या संगीतिकांमधून पोल्क रंगमंचावर सादर केले गेले. पश्चिमी समाजात हा नृत्यप्रकार अंशत: टिकून असल्याचे दिसते.

जगताप, नंदा