कोपे, फ्रांस्वा : (२६ जानेवारी १८४२–२३ मे १९०८). फ्रेंच कवी व नाटककार. तो पॅरिसमध्ये जन्मला. कारकून साहाय्यक ग्रंथपाल, अभिलेखापाल अशा विविध पदांवर त्याने काम केले. फ्रान्समधील पार्‍नॅसिअन (कलावादी) काव्य संप्रदायाचा प्रभाव त्याच्या Le Reliquaire (१८६६) ह्या पहिल्या काव्यसंग्रहावर जाणवतो. Les Intimites (१८६८) आणि Les Humbles (१८७२) ह्यांसारख्या त्याच्या काव्यसंग्रहांतून दलितांविषयीचा जिव्हाळा व सहानुभूती उत्कटपणे व्यक्त झालेली आहे. पॅरिस व त्याची उपनगरे यांत राहणाऱ्या लोकांच्या जीवनातील सुख दुःखांचे क्षण कोपेने आपल्या काव्यातून हळुवारपणे टिपलेले आहेत. Le Passant (१८६९) आणि Pour la Couronne (१८९५) ही स्वच्छंदतावादी शैलीने लिहिलेली त्याची नाटके उल्लेखनीय आहेत. द्रेफ्यूस ह्या ज्यूवंशीय फ्रेंच सेनाधिकाऱ्यावर झालेल्या खटल्याच्या संदर्भात कोपेने ज्यूविरोधी भूमिका घेतली होती. आपल्या उत्तरायुष्यात कोपे रोमन कॅथलिक पंथाचा निष्ठावंत अनुयायी झाला. La Bonne Souffrance (१८९८) ह्या त्याच्या कादंबरीवर ह्या धार्मिकतेचा खोल ठसा उमटलेला आहे.

१८८४ मध्ये फ्रेंच अकादमीवर त्याची नियुक्ती झाली. पॅरिसला तो निधन पावला.

टोणगावकर, विजया