कोपिया : उत्तर प्रदेशाच्या बस्ती जिल्ह्यातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. प्राचीन काळी हे एक सांस्कृतिक केंद्र होते. उत्खनित अवशेषांवरून त्याचा काळ स्थूलमानाने इ.स.पू. ३०० ते इ.स.५०० असा मानण्यात येतो. तेथे सापडलेले काही सूक्ष्म आकाराचे मणी त्याही आधीचे असावेत, असा तज्ञांचा कयास आहे. अनोमा नदीवरील हे टेकाड सु. १८ मी. उंच असून त्याने सु. ३ चौ.किमी. एवढा भाग व्यापला आहे. प्राचीन मल्ल जमातीची ही राजधानी असावी, असे मानतात. या गावाचे नाव अनुप्रिया असे असून पूर्वी येथील आम्रवनांत गौतमाने प्रथम राजैश्वर्याचा त्याग करून तापसवेष धारण केला, अशी माहिती परंपरेनुसार मिळते. मौर्यकाळात प्रचलित असणाऱ्या पक्क्या विटा, इ.स.पू. तिसऱ्या शतकापर्यंत प्रचलित असणारी आहत नाणी, मृण्मय मूर्ती, मृण्मय मुद्रा वगैरे या टेकड्यावरील विशेष उल्लेखनीय अवशेष होत. टेकाडाच्या पश्चिमेला एक वर्तुळाकार चौथरा आहे. त्यावर पूर्वी स्तूप असावा, असे त्याच्या रचनेवरून दिसते. मुख्य टेकाडाच्या पूर्वेला ६ मी. उंचीचे आणखी एक आयताकार टेकाड आहे. यावर विविध प्रकारचे काचेचे मणी आणि काचेचे रंगीबेरंगी ठोकळे आढळतात. त्यावरून पूर्वी येथे काचकामाची भट्टी असावी असे समजतात. यातील सूक्ष्माकार मणी सोडले, तर उर्वरित वस्तू मौर्यकाळानंतरच्या आहेत. मदनमोहन नागर यांनी कोपियातील उत्खननाचा अभ्यास एका लेखात मांडलेला असून हा लेख श्रीसंपूर्णानंद अभिनंदन ग्रंथात (१९५५) आहे.

माटे, म. श्री.